बाळासाहेबांची शिवसेना आता राहिली नाही म्हणणाऱ्यांना उद्धव ठाकरेंचं खणखणीत उत्तर

मुंबई तक

• 12:54 PM • 22 Jun 2022

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या राजकीय भूकंपावर सविस्तर भाष्य केलं. शिवसेनेची ताकद वापरून शिवसेनेवर वार करू नका. माझ्या समोर या, चर्चा करा मला सांगा तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री म्हणून नकोत मी आत्ता पद सोडतो असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. आज आपल्या भाषणातून उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदार, नेत्यांना तसंच शिवसैनिकांना भावनिक साद घातली आहे. बाळासाहेबांची शिवसेना […]

Mumbaitak
follow google news

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या राजकीय भूकंपावर सविस्तर भाष्य केलं. शिवसेनेची ताकद वापरून शिवसेनेवर वार करू नका. माझ्या समोर या, चर्चा करा मला सांगा तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री म्हणून नकोत मी आत्ता पद सोडतो असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. आज आपल्या भाषणातून उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदार, नेत्यांना तसंच शिवसैनिकांना भावनिक साद घातली आहे. बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही असं म्हणणाऱ्यांनाही उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं.

हे वाचलं का?

माझ्या फेसबुक लाइव्हनंतर अनेकजण टीका करतील की मुख्यमंत्र्यांचा चेहरा पडला होता, आवाज जड झाला होता, अशी टीका करतील. मात्र सकाळीच माझी कोव्हिड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे हे सगळं झालं आहे बाकी कशाचाही परिणाम माझ्यावर झालेला नाही असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

ही शिवसेना बाळासाहेबांची आहे का? शिवसेनेने हिंदुत्व सोडलंय का? मुख्यमंत्री भेटत का नाहीत? असे सगळे प्रश्न गेल्या काही दिवसांमध्ये उपस्थित झाले आहेत.

शिवसेना हिंदुत्वापासून दूर जाऊ शकत नाही म्हणून आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे सगळे अयोध्येला गेले. हिंदुत्वावर विधानसभेत बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री आहे. ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना नाही अशीही बातमी पसरवण्यात आली. त्यात काहीही तथ्य नाही. २०१४ ला ६३ आमदार निवडून आले तेदेखील हिंदुत्वाच्या मुद्द्यावर. शिवसेना बाळासाहेबांचीच आहे.. पण मधल्या काळात जे मिळालं ते याच शिवसेनेमुळे.

शिवसेना आणि हिंदुत्व हे दोन एकमेकांमध्ये गुंफलेले शब्द आहे. हिंदुत्व हा आमचा श्वास आहे हे शिवसेना प्रमुखांनाही सांगितलं होतं. हिंदुत्वासाठी कुणी काय केलं हे बोलण्याची आत्ताची वेळ नाही. शिवसेना बाळासाहेबांची नाही असं भासवण्याचा प्रयत्न काही लोकांकडून झाली आहे. त्या आणि आत्ताच्या शिवसेनेत काय फरक आहे? मी बाळासाहेब ठाकरेंचेच विचार पुढे नेतो आहे. २०१४ ला आपण एकटे लढलो होतो.

२०१४ लाही आपण हिंदूच होतो आजही आहे, उद्याही राहणार. २०१४ ला ६३ आमदार निवडून आले त्यानंतर जे मंत्री झाले ती शिवसेनाही बाळासाहेब ठाकरेंच्या नंतरचीच शिवसेना होती. त्यानंतरची आत्तापर्यंतची वाटचाल पाहा. आत्ता मी स्वतः मुख्यमंत्री आहे. माझ्यासोबत जे काही सहकारी मंत्रिमंडळात आहेत तेदेखील त्याच बाळासाहेबांचे सहकारी आहेत. बाळासाहेबांचीच शिवसेना हवी असं म्हणणाऱ्यांनी जे काही मधल्या काळात मिळालं ते बाळासाहेबांनंतरच्या शिवसेनेने दिलं हे लक्षात ठेवा असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही माझ्यावर विश्वास दाखवला. अशात मी माझ्या लोकांना म्हणजेच शिवसेनेतल्याच लोकांना मी नको असेन तर काय करायचं? उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी नकोत असं सांगितलंत तर मी आत्ता राजीनामा द्यायला तयार आहे. तुमचा विश्वास नसेल तर मी आजच माझा मुक्काम वर्षा निवासस्थानावरून मातोश्रीवर हलवतो. जे काही बोलायचं आहे ते समोर येऊन बोला, आडून आडून का बोलायचं आहे. असे प्रश्न आज उद्धव ठाकरे यांनी विचारले आहेत

    follow whatsapp