अचानक झालेलं आक्रमण. लष्करी ठिकाणांसह रहिवाशी इमारतींवर डागण्यात आलेली क्षेपणास्त्रं. बॉम्बचा वर्षाव आणि सगळीकडे धुराचे लोळ! रशियाच्या आक्रमणानंतर युक्रेनमधील अनेक शहरांत हे चित्र असून, युक्रेनमधील काही भाग अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे. सलग दहा दिवसांपासून सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे १२ लाख युक्रेनियन नागरिकांनी दुसऱ्या देशात आश्रय घेतला आहे.
ADVERTISEMENT
युक्रेनची राजधानी कीव्हसह अनेक शहरांना रशियाच्या लष्कराकडून निशाणा बनवण्यात आलं. अनेक सरकारी कार्यालये, शाळा, घरं उद्ध्वस्त झाली आहेत. रशियाच्या हल्ल्यात अनेक निप्षापांचे बळी घेतले, तर हजारो लोक जखमी झाले आहेत. रशियाने भरभराटीला आलेल्या युक्रेनचं दहा दिवसांत चित्रच बदलून टाकलं आहे आणि अजूनही युद्ध सुरूच आहे.
रशियाच्या नाटो सदस्यत्वाला विरोध करत रशियाने आक्रमण केलं. युक्रेनमध्ये सत्तांतर घडवून आणण्याचे रशियाचे प्रयत्न असून, त्यासाठी राजधानी कीव्ह मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहे. कीव्हचा पाडाव झाल्यानंतरचं हे युद्ध थांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कीव्हबरोबरच युक्रेनमधील अनेक शहरांमध्ये रशियन सैन्य दाखल झालेलं आहे. रशियाने काही भूभागावर कब्जाही मिळवला आहे.
रशियाच्या हल्ल्याने खार्किव्ह भकास
खार्किव्ह युक्रेनमधील सर्वात मोठ्या शहरांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं शहरं आहे. खार्किव्ह रशियन सैन्याने ताब्यात घेतलं आहे. मात्र, हे शहर रशियाच्या ताब्यात जाईपर्यंत प्रचंड जीवित आणि वित्त हानी झाली. रशियन सैन्याच्या बॉम्ब वर्षावात अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या. अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली. खार्किव सोव्हिएत रशिया असताना पासूनच महत्त्वाचं शहर मानलं जातं.
खेरसनवर रशियाचा कब्जा
दहा दिवसांत रशियाने खार्किव्हबरोबरच खेरसन शहरावरही कब्जा मिळवला. रशियन सैन्याकडून हा दावा केला जात आहे. रशियन सैन्याने रेल्वे स्टेशनपासून ते खेरसन नदीवर असलेल्या बंदरापर्यंत ताबा मिळवला आहे. खेरसन रशियाच्या नियंत्रणात खाली असलेल्या क्रीमिआपासून जवळच आहे.
रशियाने ज्याप्रमाणे खार्किव्हमध्ये विध्वंस घडवला. त्याचप्रमाणे चर्निहाईव्हमध्येही कहर केला. रशियाच्या हल्ल्यात ४० पेक्षा जास्त लोक चर्नीहाईव्हमध्ये मरण पावली आहेत. सुंदर आणि सुबक इमारती असलेल्या शहर रशियाच्या हल्ल्यानंतर भकास झालं आहे. चर्निहाईव्हमध्ये रशियाने क्लस्टर बॉम्बचा (५ बॉम्ब एकदाच फेकणे) वर्षाव केला.
मारियूपोलमध्येही घरांवरही बॉम्ब हल्ले
युक्रेनमधील मारियूपोलमध्येही रशियाकडून अंदाधुंद हल्ले करण्यात आले. नागरी भागात हल्ले करण्यात आले. रशियाकडून सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे अनेकांनी दुसऱ्या देशात धाव घेतली आहे. एनरहोदर शहरातही रशियन सैन्याच्या तुकड्या दिसत आहेत.
ADVERTISEMENT