डोंबिवलीच्या सागाव परिसरात एका निर्माणाधीन इमारतीच्या लिफ्टसाठी खणलेल्या खड्ड्यात पडून १० वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ८ माळ्याची ही निर्माणाधीन इमारत अनधिकृत असल्याचं समोर आलं असून २१ जानेवारीला कल्याण-डोंबिवली महापालिका ही इमारत पाडणार आहे.
ADVERTISEMENT
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मानपाडा पोलिसांनी या इमारतीच्या बिल्डरवरही कारवाई केली जाणार असल्याचं सांगितलं. मुलाचा मृतदेह पाहिल्यानंतर मौर्य कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीही या प्रकरणाची तात्काळ दखल घेत विकासकाला इमारत अनधिकृत असल्याची नोटीस बजावली आहे.
या प्रकरणानंतर कल्याण-डोंबिवली शहरातील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी महापालिकेने ही इमारत अनधिकृत असल्याची नोटीस विकासकाला बजावली होती. परंतू यानंतर पालिकेने या इमारतीकडे लक्षच दिलं नाही. अपघातात एका मुलाचा जीव गेल्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांना जाग आल्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. किती लोकांचे जीव गेल्यानंतर महापालिकेला जाग येणार आहे असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
डोंबिवली पुर्वेकडील सागाव परिसरात राहणारे राजकुमार मौर्य हे एका भंगारच्या दुकानात काम करतात. पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी अस त्यांचं कुटुंब आहे. मंगळवारी संध्याकाळी राजकुमार यांचा १० वर्षाचा मुलगा सत्यम खेळण्यासाठी बाहेर गेला. जवळपास दोन तास मुलगा घरी न आल्याने कुटुंबियांनी त्याचा शोध सुरू केला.
तासभर शोध घेतल्यानंतरही सत्यम सापडला नाही त्यामुळे मौर्य कुटुंबाने घराजवळच सुरु असलेल्या एका निर्माणाधीन इमारतीत त्याचा शोध घेतला असता, लिफ्टसाठी खणलेल्या खड्ड्यात सत्यमचा मृतदेह आढळून आला.
ADVERTISEMENT