यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शासकीय उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टरची एका अज्ञात युवकाने गोळ्या झाडत हत्या केली आहे. उमरखेड येथील श्री. राजाराम प्रभाजी उत्तरवार शासकीय रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. हनुमंत धर्मकारे यांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. संध्याकाळी ५ वाजल्याच्या दरम्यान रुग्णालयाच्या समोरच ही घटना घडली आहे.
ADVERTISEMENT
आरोपीने डॉ. धर्मकारे यांच्यावर चार गोळ्या झाडल्या. या घटनेमुळे सध्या उमरखेड शहरात तणावाचं वातावरण पहायला मिळत आहे.
डॉ. धर्मकारे हे गेल्या ७ वर्षांपासून जिल्हा रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत होते. याशिवाय उमरखेड येथील बसस्थानकाच्या समोर त्यांचं खासगी बाल रुग्णालयही आहे. गेल्या ७ वर्षांपासून डॉ. धर्मकारे यांची कारकिर्द सर्वसमावेशक राहिली आहे. प्रत्येक वेळी रुग्णाला मदतीसाठी तत्पर असणाऱ्या डॉ. धर्मकारे यांचं नाव आतापर्यंत एकाही वादात आलेलं नव्हतं. अशा डॉक्टरांवर हल्ला करुन त्यांची हत्या करण्यात आल्यामुळे उमरखेडमध्ये विविध चर्चांना उधाण आलं आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या समोरच असलेल्या गोरखनाथ हॉटेल येथे चहा पिण्यासाठी डॉ. धर्मकारे नेहमी जायचे. आज संध्याकाळी पाच वाजल्याच्या दरम्यान मोटार सायकलवरुन आपल्या खासगी दवाखान्याकडे जात असताना अज्ञात युवकाने त्यांच्यावर बंदूक रोखत गोळ्या झाडल्या. यावेळी आजुबाजूला असलेल्या लोकांनी या मारेकऱ्याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतू आरोपीने आपल्या गाडीवरुन पळ काढला. डॉ. धर्मकारे यांना रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी उमरखेड शहरात बंदोबस्त वाढवला असून कायदा-सुव्यवस्थेबद्दल नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.
ADVERTISEMENT