‘आम्ही काय राहुल गांधींच्या तोंडात जाऊन बसलो होतो?’, प्रश्न विचारताच रावसाहेब दानवेंचा चढला पारा

मुंबई तक

20 Nov 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:37 AM)

सावरकरांबद्दल केलेल्या विधानावरून भाजपकडून काँग्रेस नेते राहुल गांधींना लक्ष्य केलं जात आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीही राहुल गांधींवर टीका केलीये. याचबरोबर संजय राऊत यांनी केलेल्या नेहरूंच्या आणि आदित्य ठाकरेंच्या इतिहासाबद्दलच्या विधानावरून रावसाहेब दानवेंनी सेना नेत्यांना सुनावलं. भाजपने सावरकरांचा मुद्दा घडवून आणल्याची चर्चा सुरू आहे, असं पत्रकारांनी रावसाहेब दानवे यांना विचारलं. त्यावर केंद्रीय मंत्री दानवे […]

Mumbaitak
follow google news

सावरकरांबद्दल केलेल्या विधानावरून भाजपकडून काँग्रेस नेते राहुल गांधींना लक्ष्य केलं जात आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीही राहुल गांधींवर टीका केलीये. याचबरोबर संजय राऊत यांनी केलेल्या नेहरूंच्या आणि आदित्य ठाकरेंच्या इतिहासाबद्दलच्या विधानावरून रावसाहेब दानवेंनी सेना नेत्यांना सुनावलं.

हे वाचलं का?

भाजपने सावरकरांचा मुद्दा घडवून आणल्याची चर्चा सुरू आहे, असं पत्रकारांनी रावसाहेब दानवे यांना विचारलं. त्यावर केंद्रीय मंत्री दानवे म्हणाले, “आम्ही काय राहुल गांधीच्या तोंडात जाऊन बसलो होतो? आम्ही मुद्दा घडवून आणला… ज्याला वाचन नाही. ज्याला या देशातील महापुरुषांबद्दल कल्पना नाही, त्यांच्या तोडून निघालेले हे शब्द आहेत.आम्ही कशाला सावरकरांचा मुद्दा आणावा?”, असं उत्तर दानवेंनी दिलं.

“सावरकर तर आमच्या तोंडात आहेत. सावरकर आमच्या आचरणात आहेत. सावरकर आमच्या विचारात आहेत, हे आम्ही नाकारत नाही. आणि हे आम्ही घडवून आणलं नाही. आम्ही तर त्यांच्या विचारांचे पाईक आहोत. यावर आम्हाला गर्व आहे. आम्ही काही कोणापुढे ते झाकत नाही”, अशी भूमिका रावसाहेब दानवेंनी मांडली.

शरद पोंक्षेंचं राहुल गांधींना ओपन चॅलेंज, “वीर सावरकर राहिले त्या तुरुंगात एक दिवस राहून दाखवा”

‘नेहरू नसते तर…’, संजय राऊतांच्या विधानावर दानवे काय म्हणाले?

“नेहरू नसते, तर भारताचा पाकिस्तान झाला असता’, या संजय राऊत यांच्या विधानावर रावसाहेब दानवे म्हणाले, “या देशात जे जे कुणी नेते जन्माला आलेत. त्या प्रत्येकाचं या देशासाठी योगदान राहिलं आहे. आम्ही कधीच म्हटलो नाही की, पंडित नेहरू-इंदिराजींचं काही योगदान नाही. पंडित नेहरूंबद्दल असं वक्तव्य केलं नाही, पण राहुल गांधी सावरकरांबद्दल जे बोलले तो विषय पाठीमागे टाकण्यासाठी नेहरूंचा मुद्दा पुढे केला आहे.”

आदित्य ठाकरेंना रावसाहेब दानवेंचा उलट सवाल

सावरकरांबद्दलच्या विधानावरून सुरू असलेल्या वादावर आदित्य ठाकरे म्हणाले होते की, ’40-50 वर्षांचा इतिहास उकरून काढण्यापेक्षा भविष्याचा विचार केला पाहिजे.’ यावर दानवे म्हणाले, “ज्यांच्या मांडीला मांडी लावून सरकार चालवलं आणि त्यांच्याच मित्रपक्षानं सावरकरांबद्दल अशा प्रकारचे शब्द काढले. त्यांच्यासोबत तुम्ही पुढच्या काळात राहणार आहात का? त्यांच्यापासून फारकत घेणार आहात का? हे त्यांनी सांगावं. उगाच विषय कुठल्या कुठे नेऊ नये”, असा टोला दानवे यांनी लगावला.

तुरूंगाची कल्पना नसलेले सावरकरांच्या सुटकेवर बोलतात तेव्हा…, संजय राऊतांनी राहुल गांधींना सुनावलं

“बाळासाहेब ठाकरे यांनी सावरकर यांच्याबद्दल महाराष्ट्र व देशाला त्यांचे मोठेपण समजावून सांगितलं. त्यांचे चिरंजीव, नातू त्यांच्याबद्दल अपशब्द बोलणाऱ्याच्या मांडीला मांडी लावून सरकार चालवलं, याचा खुलासा आदित्य ठाकरे यांनी करावा”, असंही केंद्रीय रावसाहेब दानवे म्हणाले.

    follow whatsapp