मुंबईसह महाराष्ट्रात एकीकडे कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वारंवार वाढ होताना दिसत आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने पुन्हा एकदा लॉकडाउन लावण्याची तयारी केली आहे. याचसोबत राज्य सरकार लसीकरणाचा वेग देखील वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठीच आज रविवारी मुंबईतील सर्व लसीकरण केंद्र सुरु ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
ADVERTISEMENT
१ एप्रिलपासून देशभरासह राज्यात लसीकरणाचा चौथा टप्पा सुरु झाला आहे. या टप्प्यात ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींना लस दिली जाणार आहे. दरम्यान काल, मुंबईत दिवसभरात ९ हजार ९० नव्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची भर पडली आहे. दिवसभरात ५ हजार ३२२ लोक कोरोना मुक्त झाले आहेत. तर २७ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. आज घडीला मुंबईत ६२ हजार १८७ अॅक्टिव्ह केसेस आहेत. आत्तापर्यंत मुंबईत कोरोनाची लागण झालेल्या एकूण ३ लाख ६६ हजार ३६५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर मुंबईत आत्तापर्यंत एकूण ११ हजार ७५१ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
मुंबईचा डबलिंग रेट अर्थात रूग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण हे ४८ वरून ४४ दिवसांवर आलं आहे २७ मार्च ते २ एप्रिल या कालावधी रूग्ण वाढीचा दर हा १.५४ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. मुंबईतील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ८३ टक्के झाला आहे. अशीही माहिती मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
ADVERTISEMENT