हिंदी सिनेसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते अरूण बाली यांचं निधन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. आज पहाटे ४.३० च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. अरूण बाली यांचं निधन झालं तेव्हा ते ७९ वर्षांचे होते. ANI या वृत्तसंस्थेने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.
ADVERTISEMENT
प्रसिद्ध सिनेमांमध्ये झळकले होते अरूण बाली
चाणक्य, स्वाभिमान या मालिका तसंच केदारनाथ, पानिपत, पीके, बर्फी यांसारख्या सुमारे ४० हून अधिक सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं होतं. चरित्र भूमिकांसाठी अरूण बाली ओळखले जात होते. न्युरोमस्कुलर नावाच्या एका दुर्मिळ आजाराने त्यांना ग्रासलं होतं. प्रकृती बिघडल्यानंतर अरूण बाली यांना मुंबईतल्या हिरानंदानी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारांच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
करीअरची सुरूवात केली ९०च्या दशकात
ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात ९० च्या दशकात केली होती. यानंतर त्यांनी राजू बन गया जंटलमन, फूल और अंगारे, खलनायक, ३ इडियट्स आणि पानिपतसह अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याशिवाय टीव्ही शो ‘बाबुल की दुआन लेती जा’ मालिकेमुळे त्यांना विशेष ओळख मिळाली.
प्रसिद्ध चित्रपटांमध्ये साकारल्या भूमिका
अरुण बाली यांनी बॉलिवूड सिनेमांमध्ये अनेक लोकप्रिय भूमिका साकारल्या. त्यांनी ‘सौगंध’, ‘यलगार’, ‘राजू बन गया जेंटलमन’, ‘खलनायक’, ‘राम जाने’, ‘पोलिसवाला गुंडा’, ‘सबसे बडा खिलाडी’, ‘सत्या’, ‘शिकारी’, ‘हे राम’ या सिनेमांमध्ये काम केलं. तसंच ‘आँखे’, ‘जमीन’, ‘अरमान’, ‘लगे रहो मुन्ना भाई’, ‘३ इडियट्स’, ‘बर्फी’, ‘ओह माय गॉड’, ‘पीके’, ‘एअरलिफ्ट’, ‘बागी’, ‘केदारनाथ’, ‘पानिपत’ आणि ‘लाल सिंग चड्ढा’ सारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या.
ADVERTISEMENT