मुंबई: चित्रपट संगीत आणि भावगीत या दोन महत्त्वाच्या प्रवाहांना अभिजाततेचं परिमाण देत भारतीय जनमानसावर गेली आठ दशकं अधिराज्य गाजवणारा स्वर आज निमाला. गान कोकिळा लता मंगेशकर यांचं आज निधन झालं. त्या ९३ वर्षांच्या होत्या. दोन आठवड्यांपूर्वी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. कोरोनावर मात केली होती, मात्र त्रास सुरू झाल्यानं त्यांना ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
ADVERTISEMENT
लता मंगेशकर यांना 8 जानेवारीला निमोनिया झाल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर त्यांना ब्रीचकॅण्डी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यातच त्यांना कोरोनाचा संसर्गही झाला होता. मात्र, औषधोपचाराच्या मदतीने त्यांनी कोरोनावर मातही केली होती. रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्यानंतर त्यांची अचानक प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांना पुन्हा ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
लता मंगेशकरांनी संपूर्ण कारकीर्दीत 40 हजारांपेक्षा जास्त गाणी गायली आहेत. ‘आजवर इतका सुरेख आवाज ऐकलेला नाही’, असं म्हणत अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनीही गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्वराला दाद दिली होती.
लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 ला मध्य प्रदेशमधील इंदोर शहरात एका मराठी कुटुंबात झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव पंडित दीनानाथ मंगेशकर व आईचे नाव शेवंताबाई होतं. दीनानाथ मंगेशकर स्वतः शास्त्रीय गायक होते. त्यामुळे लता मंगेशकरांना आपल्या वडिलांकडून संगीताचा वारसा लाभला.
लहान असतानाच लता मंगेशकर यांनी भावासोबत शास्त्रीय संगीत शिकायला सुरूवात केली. वयाच्या पाचव्या वर्षापासून बहिणी आशा, उषा आणि मीना यांच्यासोबत संगीतसाधनेची सुरूवात केली.
संगीत साधनेच्या जोरावर लता मंगेशकरांनी असंख्य गाणी अजरामर केली. 1942 साली 13 वर्षाच्या असतानाच त्यांनी मराठी चित्रपट ‘किती हसाल’साठी पहिलं गाणं रेकॉर्ड केलं. चित्रपट प्रदर्शित झाला पण नेमकं लता मंगेशकरांनी गायलेलं गाणच चित्रपटातून वगळण्यात आलं. या घटनेमुळे लता मंगेशकर दुःखी झाल्या. त्याच वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने वडिलांचं छत्र हरवलं.
वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाच्या पालन पोषणाची जबाबदारी लता मंगेशकर यांच्यावर आली. त्यानंतर लता मंगेशकर यांनी करियरवर लक्ष्य केंद्रीत केलं. त्यानंतर नवयुग चित्रपट कंपनीचे मालक आणि लता मंगेशकर यांच्या वडिलांचे मित्र मास्टर विनायक यांनी लता मंगेशकर आणि त्यांच्या कुटुंबांची जबाबदारी घेतली. याशिवाय लता मंगेशकरांनाही गायन क्षेत्रात मदत केली.
मास्टर विनायक यांनी 1942 साली लता मंगेशकर यांना मराठी चित्रपट ‘पहिली मंगला गौर’मध्ये अभिनय करण्याची संधी दिली. या चित्रपटात त्यांनी एक गाणं देखील गायलं होतं. अशा पद्धतीने मराठी चित्रपटातून त्यांनी आपल्या करियरची सुरुवात केली.
1945 साली लता मंगेशकर मुंबईत आल्या. मुंबईत आल्यानंतर अमानत अली खान यांच्याकडून त्यांनी पुन्हा संगीताची साधना सुरू केली. 1947 मध्ये त्यांनी हिंदी चित्रपट ‘आप की सेवा मे’मध्ये पहिलं हिंदी गाणं गायलं. पहिल्या गाण्याने अपेक्षेइतकी प्रसिद्धी मिळवून दिली नाही. नंतर 1949 साली त्यांनी लागोपाठ बरसात, दुलारी, अंदाज व महल या 4 हिट चित्रपटांची गाणी गायली. त्यामुळे त्यांचा आवाज सिनेरसिकांपर्यंत पोहोचला. महल चित्रपटातील ‘आयेगा आनेवाला’ हे गाणं सिनेरसिकांना प्रचंड भावलं.
स्वरांबरोबरच लता मंगेशकरांची लोकप्रियताही वाढू लागली. 1950 मध्ये लता मंगेशकरांचं नाव प्रसिद्धीच्या झोतात आलं. संगीत दिग्दर्शक अनिल विश्वास, शंकर जयकिशन, एस डी. बर्मन, खय्याम, सलील चौधरी, मदन मोहन, कल्याणजी आनंदजी यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली.
1958 साली आलेल्या मधुमती चित्रपटातील ‘आजा रे परदेशी’ लता मंगेशकरांनी आपल्या आवाजाने अजरामर केलं. या गाण्यासाठी त्यांना ‘बेस्ट फीमेल प्लेबॅक सिंगर’ श्रेणीतील सर्वात पहिला ‘फिल्मफेअर’ अवॉर्ड मिळाला. लता मंगेशकर यांनी आजपर्यंतच्या कारकीर्दीत जवळपास 30,000 पेक्षा जास्त गाणी गायली आहेत. महत्त्वाचं म्हणजे हिंदीसोबत अनेक भारतीय प्रादेशिक भाषांमध्येही त्यांनी गायली आहेत.
Lata Mangeshkar Birthday: वयाच्या 92व्या वर्षीही लता मंगेशकर न विसरता करतात रियाज!
लता मंगेशकर यांना मिळालेले पुरस्कार
-
1958, 1962, 1965, 1969, 1993, 1994: फिल्म फेअर अवार्ड.
-
1969: पद्म भूषण.
-
1974: जगातील सर्वात जास्त गाणे गाण्याचा गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड.
-
1989: दादासाहेब फाळके पुरस्कार.
-
1993: फिल्मफेअर लाइफटाइम अचीवमेंट पुरस्कार.
-
1996: स्क्रीन चा लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्कार.
-
1997: राजीव गांधी पुरस्कार.
-
1999: एन टी आर पुरस्कार.
ADVERTISEMENT