मिथिलेश गुप्ता, डोंबिवली: डोंबिवली जवळील संदप गावातील खदानीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती. या घटनेनंतर पीडित कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी आणि आर्थिक मदत जाहीर करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे संदप या गावी आले होते. पण यावेळी मंत्री आठवलेंना पीडित कुटुंबीयांच्या तीव्र रोषाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे या ठिकाणाहून काही वेळातच त्यांनी काढता पाय घेतला.
ADVERTISEMENT
डोंबिवलीमधील संदप गावातील गायकवाड कुटुंबातील तब्बल पाच जणांचा मृत्यू झाल्याने राज्यात एकच खळबळ माजली होती. याच कुटुंबाला भेटून जेव्हा रामदास आठवले यांनी 50 रुपयांची मदत जाहीर केली तेव्हा पीडित कुटुंबीयांचा अक्षरश: उद्रेक झाला.
‘मी देतो तुम्हाला 50 हजार..’
‘प्रशासन गेली पाच वर्ष पाण्याचा बंदोबस्त करतोय का? मला नको तुमचे 50 हजार.. मी देतो तुम्हाला 50 हजार..’, असं गायकवाड कुटुंबातील एका व्यक्तीने रामदास आठवले यांना सर्वांसमक्षच सुनावलं. पण यावेळी पोलिसांनी त्यांना तात्काळ बाजूला घेत फार काही बोलू दिलं आहे.
नेमकं काय झालं?
गायकवाड कुटुंबातील पाच जणांचा एकाच वेळी मृत्यू झाल्यानंतर या गावातील पाणी समस्या प्रकर्षाने समोर आली आहे. दरम्यान आज (18 मे) रामदास आठवलेंनी या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी आठवले यांनी गावाला भेडसावणाऱ्या पाणी समस्या बाबतमार्ग काढण्यासाठी आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली असल्याचे . पुढे बोलताना कुटुंबाला 50 हजारांची मदत करण्याचे आश्वासन दिलं. यावेळी या कुटुंबातील सदस्य प्रचंड संतापले.
‘पाच वर्ष बंदोबस्त करतोय तो प्रशासन? पाच वर्ष करतोय का? माझी दोन मुलं, माझी आई, बायको आणि भावजय गेली.. तुम्ही सांगता प्रशासन बंदोबस्त करेल. प्रशासन गेली पाच वर्ष पाण्याचा बंदोबस्त करतोय का? आज माझी बायको, मुलं, आई भावजय गेली.. आम्हाल नको मदत 50 हजार.. मी देतो तुम्हाला 50 हजार..’
‘आम्हाला पैसे नको, पाणी द्या. आमच्या घरातले सदस्य घेऊन पाण्यावाचून गेलेत ते भरून देणार आहात का? आमदार येतात, खासदार येतात, तुम्ही आलात मदत कसली करता पाणी द्या.’ अशा शब्दात आपला संताप व्यक्त करत त्यांनी आठवलेंनाच सवाल केला.
त्यानंतर केंद्रीय मंत्री आठवले यांनी तात्काळ या गावातील पाणी समस्या सोडविण्यासाठी मी या ठिकाणी आलोय आणि राजकारण करण्यासाठी आलेलो नाही. असं पीडित कुटुंबीयांना सांगितलं.
यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी तसेच महापालिका प्रशासनाला देखील खदानी बुजवणायच्या याबाबत सूचना केल्या आहेत. तसेच या गावाला पाणी समस्या सोडवण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना देखील दिल्या असल्याचे आठवले यांनी सांगितले.
पाणीटंचाईने घेतले एकाच कुटुंबातील पाच जणांचे प्राण
काही दिवसांपूर्वीच पाणीटंचाईमुळे खदानीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाला होता. मृतांमध्ये दोन महिलांसह तीन मुलांचा समावेश होता.
अनेक ठिकाणी वाढत्या पाऱ्याबरोबच पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहे. पाणी मिळवण्यासाठी नागरिक जीव मुठीत घेऊन धडपडत असल्याचं दृश्य ग्रामीण भागात दिसून असून, कल्याण ग्रामीणमध्येही मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई भेडसावत आहे.
‘पाच जीव गेले, आता तरी प्रशासन जागं होणार का?’; संतप्त डोंबिवलीकरांचा सवाल
पाणीटंचाईमुळे खदानीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या एका कुटुंबातील पाच जणांना जीव गमावावा लागला होता. शनिवारी (7 मे) दुपारी कपडे धुण्यासाठी आणि इतर वापरासाठी नेहमीप्रमाणे पाणी आणण्यासाठी खदानीवर गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जणांचा खदानीत बुडाल्याने मृत्यू झाला होता.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या मदतीने सर्व मृतदेह बाहेर काढून रुग्णालयात पाठविण्यात आले होते. मात्र, त्यानंतर महापालिकेच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
ADVERTISEMENT