‘आजची सकाळ धक्का देणारी’; विनायक मेटेंच्या निधानाने राजकीय वर्तुळ हळहळले

मुंबई तक

14 Aug 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 10:53 AM)

शिवसंग्राम पक्षाचे नेते आणि आमदार विनायक मेटे यांचं रविवारी पहाटे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघाती निधन झालं. विनायक मेटे यांच्या निधनाने कुटुंबियांसह कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, राजकीय वर्तुळातही हळहळ व्यक्त होतं आहे. विनायक मेटे गेले, यावर माझाही विश्वास बसला नाही -एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामोठे येथील रुग्णालयात जाऊन माहिती घेतली. त्यानंतर बोलताना ते […]

Mumbaitak
follow google news

शिवसंग्राम पक्षाचे नेते आणि आमदार विनायक मेटे यांचं रविवारी पहाटे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघाती निधन झालं. विनायक मेटे यांच्या निधनाने कुटुंबियांसह कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, राजकीय वर्तुळातही हळहळ व्यक्त होतं आहे.

हे वाचलं का?

विनायक मेटे गेले, यावर माझाही विश्वास बसला नाही -एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामोठे येथील रुग्णालयात जाऊन माहिती घेतली. त्यानंतर बोलताना ते म्हणाले, “अतिशय दुर्दैवी आणखी दुःखद बातमी सकाळी मला कळली. खरं म्हणजे माझाही विश्वास बसला नाही. शिवसंग्रामचे नेते, माजी आमदार विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सातत्यानं संघर्ष करणारा नेते मेटे होते.”

“मराठा समाजाला न्याय मिळवून आणि आरक्षण मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलनं केली. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचेही ते अध्यक्ष होते. जेव्हा जेव्हा ते मला भेटले, मला त्यांची तळमळ जाणवली. गेल्याच आठवड्यात भेटले होते. त्यांचा एकच ध्यास होता. ते म्हणत होते की, तुम्ही दोघे आहात, तर आता मराठा समाजाला आरक्षण मिळेल. ती बैठक आज होती, पण दुर्दैवानं त्यांचं निधन झालं. सरकार त्यांच्या कुटुंबासोबत आहेत. हे दुःख पचवण्याची शक्ती कुटुंबियांना मिळो, हीच प्रार्थना”, असं मुख्यमत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

विनायक मेटे अपघाती निधनाची चौकशी करण्याचे निर्देश -देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “आजचा दिवस अतिशय दुःख अशा घटनेनं सुरू झाला. सकाळी ६.३० वाजता मेसेज आला की, विनायक मेटेंचा अपघात झालाय. त्यांची गंभीरता पूर्णपणे लक्षात आलेली नव्हती, त्यामुळे मी माहिती घेत होतो. मुख्यमंत्र्यांशीही बोललो. इथे आल्यानंतर डोक्याला मार लागल्यानं त्यांचा मृत्यू झाला, असं प्राथमिक कारण सांगितलं जात आहे. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.”

विनायक मेटे हे संघर्षशील नेते होते. अतिशय गरिबीतून वर येऊन स्वतःच्या भरोशावर उभं राहिलेलं हे नेतृत्व होतं. सुरुवातीपासून त्यांनी मराठा आरक्षणासाठी लढा दिला. पाठपुरावाही त्यांनी केला. मराठा आरक्षणासंदर्भात त्यांचा प्रचंड अभ्यास होता. ते माझ्या जवळचे सहकारी होते. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात बैठक बोलावली आहे. त्याला मी येतोय असंही त्यांनी मला मेसेज करून सांगितलं होतं. त्यांच्या कुटुंबांच्या पाठिशी आम्ही उभे आहोत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

विनायक मेटेंचं निधन अतिशय दुःखद घटना- सुप्रिया सुळे

“शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले.ही घटना अतिशय दुःखद आहे.हे दुःख सहन करण्याची शक्ती मेटे परिवाराला मिळावी ही प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली”, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी श्रद्धांजली अर्पण केलीये.

‘आजची सकाळ ही धक्का देणारी’ -शरद पवार

“आजची सकाळ ही धक्का देणारी सकाळ आहे. सकाळी उठल्यानंतर टीव्ही लावला, तर विनायक मेटेंची ही बातमी मिळाली. गेल्या अनेक वर्षांपासून विशेषतः मराठवाड्याच्या सामाजिक जीवनात विशेष कामगिरी विनायकरावांनी केली आणि ते करत होते. सामाजिक प्रश्नांसंदर्भात त्यांच्या काही भूमिका होत्या. सामाजिक प्रश्नांची मांडणी शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्याच्या प्रयत्न त्यांचा शेवटपर्यंत होता.”

“ज्यावेळी ते सामाजिक प्रश्नांची मांडणी करायचे, तेव्हा समाजातील इतर घटकांसंबंधी त्यांनीही यत्किंचितही वैमनस्य वा कटुता येणार नाही, याची ते खबरदारी घ्यायचे. एकेकाळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी आमच्यासोबत काम केलं. आम्हा लोकांच्या वतीने महाराष्ट्राच्या विधीमंडळात त्यांनी काम केलं. नंतर ते स्वतःच्या पक्षाचं काम अखंडपणाने शेवटपर्यंत करत होते. अपघातील निधनाने ते आपल्यातून निघून गेलेत. हा एक मोठा धक्का महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसाला बसणारा आहे. मी विनायकरावांच्या कुटुंबियांच्या, कार्यकर्त्यांच्या दुःखात अंतःकरणापासून सहभागी आहे”, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विनायक मेटे यांना श्रद्धांजली अर्पण केली.

विनायक मेटेंच्या निधनाचं वृत्त धक्कादायक -राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

“शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाचं वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. त्यांचं सामाजिक कार्य तसेच उपेक्षित समाज घटकांच्या विकासातील योगदान मोठं आहे. दिवंगत मेटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली”, अशी श्रद्धांजली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अर्पण केलीये.

राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी -चंद्रशेखर बावनकुळे

“शिवसंग्रामचे नेते माजी आमदार विनायकजी मेटे यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतीव दुःख झाले. त्यांच्या अकाली निधनाने राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या परिवारास दुःख सहन करण्याची शक्ती देवो. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली”, अशा भावना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केल्या.

    follow whatsapp