२०१४ ला शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत येणार होती का? शरद पवारांनीच दिलं उत्तर

मुंबई तक

03 Oct 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:48 AM)

काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री आणि अशोक चव्हाण यांनी एक दावा करून खळबळ उडवून दिली होती. अशोक चव्हाण यांनी असं म्हटलं होतं की २०१४ ला शिवसेना आणि भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले होते. त्यावेळी शिवसेनेकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडीचा प्रस्ताव दिला होता. जे शिष्टमंडळ आलं होतं त्यात एकनाथ शिंदे होते असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं […]

Mumbaitak
follow google news

काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री आणि अशोक चव्हाण यांनी एक दावा करून खळबळ उडवून दिली होती. अशोक चव्हाण यांनी असं म्हटलं होतं की २०१४ ला शिवसेना आणि भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले होते. त्यावेळी शिवसेनेकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडीचा प्रस्ताव दिला होता.

हे वाचलं का?

जे शिष्टमंडळ आलं होतं त्यात एकनाथ शिंदे होते असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. मात्र शरद पवार यांना याबाबत विचारण्यात आलं. शिवसेना २०१४ लाच काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत येणार होती का? या प्रश्नाचं उत्तर शरद पवारांनीच दिलं आहे.

काय म्हटलं आहे शरद पवार यांनी?

२०१४ ला शिवसेनेसोबतच्या सरकारचा कुठलाही प्रस्ताव असता तर मला समजलं असतं. अशोक चव्हाण काही बोलल्याचं मला तरी माहिती नाही. असं उत्तर शरद पवारांनी दिलं आहे. त्यामुळे शरद पवारांनी म्हटल्यानुसार २०१४ ला असा काही प्रस्ताव आला नव्हता. कारण तसा प्रस्ताव असता तर त्यावेळी त्यांना ते कळलं असतं.

आणखी काय म्हणाले आहेत शरद पवार?

“आमच्याकडे कोणी प्रस्ताव दिला नाही. राष्ट्रवादीला जर कोणी प्रस्ताव दिला असेल तर मला थोडफार तरी माहीत असेल. राष्ट्रवादीचे सगळे निर्णय घेण्याचा आमच्या अन्य लोकांना अधिकार आहे परंतु तरीही ते माझ्या कानावर घालतात. अशोक चव्हाण जे बोलले ते मी कधीही ऐकलं नाही.” असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

२९ सप्टेंबरला अशोक चव्हाण यांनी नेमका काय दावा केला होता?

२०१४ ला शिवसेना-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात राज्यात युतीचे सरकार स्थापन झाले. परंतु २०१४ मध्ये ज्यावेळी भाजप-शिवसेनेमध्ये वाद सुरु होते, त्यावेळीच शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती करण्याचा प्रस्ताव दिला होता आणि त्या शिष्टमंडळात एकनाथ शिंदे यांचा समावेश होता.

अशोक चव्हाण पुढे म्हणाले, त्यावेळी आपण या प्रस्तावाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करण्यास सुचवले होते. त्यांची संमती असेल तर आमच्या पक्षातर्फे तुमच्या प्रस्तावाचा विचार करू, असं सांगितलं होते. त्यावेळी माझ्या चर्चगेट येथील कार्यालयात शिवसेनेचं शिष्टमंडळ भेटल्याचेही चव्हाण यांनी म्हटलं होतं. मात्र असा कुठलाही प्रस्ताव आल्याचं मला माहित नाही असं आता शरद पवार यांनी म्हटलं आहे.

२०१४ मध्ये काय घडलं होतं? उद्धव ठाकरे शरद पवारांवर का चिडले होते?

२०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्यानंतर जे निकाल लागले त्यात भाजपला १२२ जागा मिळाल्या होत्या. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता मात्र त्यांना पूर्ण बहुमत मिळालं नव्हतं. त्यावेळी युतीही तुटली होती. अशात भाजप आपल्याकडेच येईल असं उद्धव ठाकरेंना वाटलं होतं. मात्र तसं घडलं नाही कारण होती ती शरद पवारांची खेळी. निकालाच्या दिवशीच शरद पवारांनी जाहीर केलं होतं की राज्याला स्थिर सरकार मिळण्यासाठी आम्ही भाजपला बाहेरून पाठिंबा द्यायला तयार आहोत. त्यामुळे शिवसेनेची बार्गेनिंग पॉवरच संपली. सुरूवातीला शिवसेना विरोधात आणि नंतर सत्तेत येऊन बसली. युतीचं सरकार पाच वर्षे धुसफूसतच चाललं. त्याचं पहिलं कारण शरद पवारांनी केलेली ही खेळी होती. शरद पवारांमुळे उद्धव ठाकरे चांगलेच चिडले होते.

    follow whatsapp