ज़का खान :
ADVERTISEMENT
वाशिम : माळी समाजाबद्दल सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट व्हायरल करणाऱ्या तरुणाचा पोलिसांनी छडा लावला आहे. मंगेश इंगोले असं पोस्ट व्हायरल करणाऱ्या तरुणाचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तसंच वैयक्तिक वादातून हे कृत्य केल्याचं त्यानं मान्य केलं आहे. यामुळे जिल्ह्यातील तणावपूर्ण झालेलं वातावरण काहीसं शांत झालं आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
१४ जानेवारीला माळी समाजाबद्दल इंस्टाग्रामवरुन फेक अकाऊंटचा वापर करुन वादग्रस्त पोस्ट व्हायरल करण्यात आली होती. यानंतर या घटनेत मुस्लिम समाजाला गृहीत धरुन हिंदू संघटनांकडून रोष व्यक्त केला जात होता. चार दिवसांपासून जिल्ह्यात तणाव निर्माण झाला होता. संबंधित व्यक्तीविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी होत होती. यासाठी शिरपूर, मालेगांव, रिसोड या शहरांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता. आज वाशिम शहरही बंद ठेवण्यातं आलं होतं.
मात्र वाशिम पोलिसांनी आता खऱ्या आरोपीला अटक केली आहे. वैयक्तिक वादातून आपण या पोस्ट व्हायरल केल्याचं संशयित आरोपी मंगेश इंगोले याने कबूल केलं आहे. मात्र या तरुणाच्या वैयक्तिक वादामुळे संपूर्ण जिल्ह्यात वातावरण तापलं होतं. अनेक हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या. मात्र, पोलिसांनी वेगाने तपास केल्याने सत्य परिस्थिती समोर आली आहे.
सुरुवातीला याप्रकरणी एका मुलाला १४ जानेवारीच्या मध्यरात्री ताब्यात घेण्यात आले होते. १५ जानेवारीला पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये एक बैठकही घेतली. बैठकीमध्ये त्यांनी लवकरच मुख्य आरोपीचा शोध घेतला जाईल, असे सांगितले होते. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून पोलिसांचा कसून तपास सुरू होता. अखेर संबंधित तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
ADVERTISEMENT