प्रत्येक वर्षीच्या नियमाप्रमाणे मान्सूनने यंदाही मुंबईला ब्रेक लावला आहे. हवामान विभागाने पुढचे ४ दिवस मुंबईसाठी महत्वाचे सांगितले असून या काळात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान सलग तिसऱ्या दिवशी मुंबईत पावसाची संततधार कायम असून आजही अनेक रस्ते जलमय आहेत.
ADVERTISEMENT
मुंबईच्या अंधेरी भागातला मिलन सब-वे आणि अनेक भागांमध्ये पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलेलं पहायला मिळालं.
याव्यतिरीक्त गांधी मार्केट सायन, समता नगर, चुनाभट्टी, किंग्ज सर्कल, दादर यासारख्या भागांमध्येही आज पावसामुळे पाणी साचलं.
मुंबईत गुरुवारी ९ तासांमध्ये २२१ मि.मी. पावसाची नोंद झाली. सांताक्रुझ वेधशाळेत २३१ मि.मी पावसाची नोंद झाली, ज्यानंतर रात्री काही वेळ पावसाने उसंत घेतली होती. मान्सून मुंबईत दाखल झाल्यानंतर पहिल्या काही दिवसांमध्येच इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची गेल्या काही वर्षांमधली ही पहिलीच वेळ मानली जात आहे. जुन महिन्याच्या पहिल्या १० दिवसांमध्ये मुंबईत ४२६.९ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. एरवी ही आकडेवारी ८९ मि.मी एवढी असते.
हवामान विभागाच्या माहितीनुसार ११ ते १५ जून या कालावधीत मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, पालघर, अलिबाग या भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचसोबत कोकण किनारपट्टी भागातील सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी तर साताऱ्यातील महाबळेश्वर भागातही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबईत पाणी साचू नये यासाठी महापालिकेचे कर्मचारी प्रयत्न करत असले तरीही पावसाने त्यांच्या सर्व प्रयत्नांवर पाणी फिरवलं आहे. त्यामुळे महापालिकेने मुंबईकरांना गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नका असं आवाहन केलंय.
ADVERTISEMENT