महाराष्ट्र सरकारची लायकी फक्त पोस्टर लावण्यापुरतीच आहेत. आम्हाला भाजपचा मुख्यमंत्री हवा आहे लगान सिनेमाची टीम नको आहे असं म्हणत नारायण राणे यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे. जिल्हा बँकेतील निवडणुकीतल्या विजयानंतरच्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
ADVERTISEMENT
‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बँक निवडणुकीत माझ्या विरोधात महाविकास आघाडीचे तीनही पक्ष एकत्र आले. पण मी त्यांनी पुरुन उरलो. जिल्हा बँक निवडणुकीनंतर आता राज्याकडे लक्ष असून राज्यात भाजपची सत्ता आणणार. आम्हाला आम्हाला मुख्यमंत्री भाजपचा हवाय, ‘लगान’ची टीम नको.’
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपची सत्ता आली असून 11 जागा जिंकत भाजपनं सत्ता मिळवली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला आहे. महाविकास आघाडीला आठ जागांवर विजय मिळवता आला आहे. भाजपच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या या निवडणुकीमध्ये विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत व विद्यमान उपाध्यक्ष सुरेश दळवी यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दुसरीकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला आहे.
या निवडणुकीत मिळवलेल्या विजयाबाबत बोलताना नारायण राणेंनी विरोधी पॅनलवर अर्थात महाविकास आघाडीवर खोचक शब्दांत निशाणा साधला. भाजपची सत्ता आली आहे. माझी नाही. या जिल्ह्यातल्या देवदेवता आणि जनता यांच्या आशीर्वादामुळे ही सत्ता आली आहे. माझे सर्व कार्यकर्ते आणि त्यांच्या सोबत नितेश राणेनं घेतलेली मेहनत, त्याला निलेश राणे आणि जिल्हाध्यक्ष राजन तेली या सगळ्यांनी दिलेली साथ यामुळे हा विजय मिळाला”, असं राणे म्हणाले. विजय मिळवताना अकलेचा वापर झाला, अक्कल ज्यांना आहे, त्यांच्या ताब्यात आमच्या देवदेवतांनी जिल्हा बँक दिली आहे’, असं नारायण राणे यावेळी म्हणाले.
अमित शाह यांची भेट घेणार
‘सगळ्यांना पुरून एवढी वर्ष उरलोय आणि आता केंद्रापर्यंत पोहोचलोय. मधे थांबलो नाहीये मी. त्यामुळे माझ्याविरोधात चौकशा लावल्या तरी मला फरक पडत नाही’ असं नारायण राणे म्हणाले. ‘अमित शाह यांना इथे घडलेल्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे. इथे पोलीस यंत्रणा कशा काम करतात, कोर्ट कचेऱ्या कशा होतात, हे सगळं त्यांना भेटून सांगणार आहे’ असंही राणे म्हणाले.
ADVERTISEMENT