हिवाळी अधिवेशन पहिल्या दिवसापासून चांगलंच तापलं आहे. भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केल्यानंतर भाजपने राडा घातला. पहिला दिवस त्यामध्ये गेल्यानंतर आता दुसरा दिवस महत्त्वाचा ठरला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे. सभागृहात मास्क न घालून येणाऱ्या सदस्यांवर अजित पवार चांगलेच संतापले. लॉकडाऊनबाबतही महत्त्वाचं भाष्य अजित पवारांनी केलं आहे.
ADVERTISEMENT
हिवाळी अधिवेशन: ‘मी महाराष्ट्राच्या इतिहासात एवढं भित्रं सरकार पाहिलेलं नाही’, फडणवीसांची तुफान टोलेबाजी
काय म्हणाले अजितदादा?
‘कोरोनाचं संकट अजूनही गेलेलं नाही. ओमिक्रॉन या व्हायरस व्हेरिएंटचा धोका आहेच. अजून एक कुणीतरी त्याचा भाऊ असलेला विषाणूही आलाय म्हणतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोरोनाच्या व्हायरस व्हेरिएंची गंभीर दखल घेतली आहे. वेळ पडली तर राज्यसह देशभर रात्रीचा लॉकडाऊन लावण्यासंबंधीचा विचार सुरू आहे.’ असं महत्त्वाचं वक्तव्य अजितदादांनी आज सभागृहात केलं आहे.
आणखी काय म्हणाले अजित पवार?
अनेक आमचे सदस्य, विरोधी पक्षातले लोक सगळ्यांना मी इथे पाहतोय. अनेकजण मास्क लावतच नाहीत. आपल्या सगळ्या गोष्टी, व्हीडिओ, ऑडिओ बाहेर जातात. चॅनलला प्रक्षेपण केलं जातं. कितीही कुणीही प्रयत्न केला तरीही संकट गेलेलं नाही. कोरोनाचा व्हेरिएंट समोर असताना प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी. अनेकांना मास्क लावून बोलताना अडचण वाटते. मग किमान बोलून झाल्यावर तरी मास्क लावा. सभागृहात मास्क न लावता येणं हे लोकप्रतिनिधी म्हणून आपण लोकांना काय सांगत आहोत? बाहेरच्या देशांमध्ये दीड दिवसाला दुप्पट रूग्ण वाढत आहेत तशी परिस्थिती येऊ द्यायची नसेल तर प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर ज्यांनी मास्क लावला नसेल त्यांना बाहेर काढा. उद्या मी जरी मास्क न लावता आलो तर मलाही बाहेर काढा असंही अजित पवार म्हणाले.
अजित पवार यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर सभापती नरहरी झिरवळ यांनी सगळ्यांना तातडीने मास्क लावण्याच्या सूचना दिल्या. तसंच बोलताना अडचण येत असल्यास मास्क काढा मात्र बोलून झाल्यानंतर मास्क लावा असंही सांगितलं आहे.
मुंबईसह राज्यातील रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत असली तरी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आलेख घसरताच आहे. या महिन्यात जवळपास पाच दिवस मुंबईत एकाही मृत्यूची नोंद नाही. राज्यात 14 डिसेंबर ते 20 डिसेंबरदरम्यान सक्रिय रुग्णसंख्या 9 टक्क्यांनी वाढली. हा आकडा 7,093 पर्यंत केला. यापूर्वीच्या आठवड्यात ही संख्या 6,481 एवढी होती. राज्य आजार सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणतात, रुग्णांमधील ही वाढ अगदी कमी प्रमाणात असून ती शहरापुरती मर्यादित आहे.
अशी सगळी स्थिती असली तरीही ओमिक्रॉनमुळे संकट गहिरं होऊ शकतं. त्यामुळे देशपातळीवर रात्रीचा लॉकडाऊन लावण्याचा विचार सुरू आहे अशी माहिती आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिली.
ADVERTISEMENT