राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे त्यांच्या बाळासाहेब ठाकरे यांच्याशी असलेल्या मैत्रीबद्दल नेहमी सांगतात की, बाळासाहेब हे त्यांचे राजकीय विरोधक होते पण राजकीय शत्रू नव्हते. राजकारणात मतभेद असावेत पण मनभेद होऊ नये. अशी भूमिका त्यांनी अनेक लोकांबद्दल घेतली. शरद पवार यांचं नेहमी म्हणणं असतं की, प्रमोद महाजन असतील किंवा बाळासाहेब असतील हे माझे राजकीय विरोधक होते पण शत्रू नव्हते. पण महाराष्ट्राचं सध्याचं राजकारण आपण जे बघतोय ते पाहता आता या गोष्टीवर विश्वास ठेवणं कठीण आहे.
ADVERTISEMENT
ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचे दोन मंत्री यांना अटक झालीए, विविध नेत्यांवर इतर तपास यंत्रणांकडून छापेमारी सुरु आहे. यातून महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी असा आरोप केला आहे की, भाजप हे द्वेषाचं राजकारण करत आहे. भाजप बदल्याचं राजकारण करत आहे आणि केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन महाविकास आघाडी सरकारला पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा पद्धतीचे आरोप महाविकास आघाडीच्या नेतृत्वाकडून केले जात आहेत.
दुसरीकडे भाजपने सुद्धा एक स्टिंग ऑपरेशन करुन हा आरोप लावण्याचा प्रयत्न केला आहे की, भाजपच्या नेत्यांना वेगवेगळ्या आरोपांमध्ये गुंतविण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं हेच आहे की, आकसाचं राजकारण सुरु आहे. पण या पार्श्वभूमीवर एक संबंध पाहिला तर तो सगळ्यांना बुचकळ्यात टाकणारा आहे.
हो.. जे तुमच्या मनात आहे तेच.. आपण इथे चर्चा करणार आहोत. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या संबंधांबद्दल. खरं तर या दोघांमधील नातं हे महाराष्ट्राच्या राजकारणाला बुचकळ्यात पाडणारं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात नोव्हेंबर 2019 मध्ये जे राजकीय नाट्य घडलं. त्यामध्ये सगळ्यात न सुटलेला कोणता प्रश्न असेल तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अचानक जाऊन घेतलेली शपथ. त्यांचं सरकार काही फार टिकलं नाही. पण त्याच्यानंतर जे काही आपण बघतोय त्यातून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंध अजूनही चांगले आहेत आणि महाविकास आघाडीवर एकामागून एक संकटं येत असताना सुद्धा अजित पवारांच्या प्रतिक्रिया या खरोखरच प्रश्न उपस्थित करणाऱ्या आहेत.
अजित पवारांचा या पद्धतीच्या प्रतिक्रिया देण्यामागचा हेतू काय हे मात्र अद्यापही कोणालाही समजलेलं नाही. खरं तर देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई Tak ला दिलेल्या एका मुलाखतीत अशी गोष्ट सांगितलेलं की त्या शपथविधीबाबत त्यांना आजही खेद वाटतो आहे. मात्र तरी सुद्धा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या संबंधाबाबत जी चर्चा चालू आहे तीच मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे.
महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि भाजपचा खरा रोख हा शिवसेनेच्या विरोधात आहे असंच वाटत होतं. ठाकरे परिवार असेल किंवा शिवसेनेतील इतर नेते यांच्यावर भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कडवट टीका केली होती. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच दोन महत्त्वाचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना अटक झालेली आहे. यांच्या अटकेवरुन राष्ट्रवादी अत्यंत कठोर अशी भूमिका घेतली आहे.
नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यायला सुद्धा राष्ट्रवादीने नकार दिला. हे सगळं चालू असताना अजित पवारांच्या प्रतिक्रिया मात्र या सरकारच्या पूर्णपणे विपरित किंवा वेगळ्या वाटाव्यात अशा पद्धतीच्या होत्या.
उदा. अनिल देशमुख यांच्याबाबत जे प्रकरण विधानसभेत निघालं तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सचिन वाझेची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला होता. भाजप त्यांना जाणूनबुजून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करतंय अशी भूमिका त्यांनी घेतली होती. अर्थात त्यामुळे त्यांना काहीसा पश्चाताप करावा लागला कारण त्यानंतर वाझेला अटक झाली आणि ते प्रकरण वेगळ्याच दिशेला गेलं. पण या सगळ्या काळात परमबीर सिंग यांनी लिहलेल्या पत्रावर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ज्या प्रतिक्रिया येत होत्या त्यावेळेस अजित पवारांकडून या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.
यासोबतच नवाब मलिक यांनी आर्यन खान प्रकरणात NCB च्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. एका मागून एक पत्रकार परिषदा घेऊन NCB आणि समीर वानखेडेंची कारवाई ही कशा पद्धतीने दूषित आहे आणि त्यामध्ये वापरण्यात आलेले साक्षीदार यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावेळेस NCP चे नेते अगदी शरद पवार देखील हे नवाब मलिक यांच्या पाठीशी होते. त्यावेळेस देखील अजित पवार यांनी या संदर्भात कोणतंही वक्तव्य केलं नव्हतं.
जेव्हा नवाब मलिक यांना अटक झाली तेव्हा अजित पवारांची प्रतिक्रिया ही अटकेच्या दुसऱ्या दिवशी आली. दोनच दिवसांपूर्वी अजित पवार यांनी जी प्रतिक्रिया दिली ती तर अधिकच बुचकळ्यात टाकणारी होती.
त्यावेळी अजित पवार असं म्हणालेले की, ‘एकमेकांबद्दल आपल्या हातात असणाऱ्या यंत्रणांचा वापर राजकीय भूमिकेतून एकमेकांना संपविण्याकरिता कधीही आपल्या महाराष्ट्रात झाला नव्हता. परंतु अलीकडच्या काळात आपण बघतो अनेकदा कोण काय वक्तव्य करतं. कोणाच्या बद्दल अशी वक्तव्य करतात. ज्यांच्याबद्दल वक्तव्य करतात त्यांच्याबद्दल बोलण्याची वक्तव्य करण्याची योग्यता तरी आहे का? काही कोणी बघत नाही. उचलली जीभ लावली टाळ्याला.. त्यामध्ये दोन्ही बाजूचं चुकतंय.’
‘मी असं म्हणणार नाही की, एकाच बाजूची चूक आहे. दोन्ही बाजूची चूक आहे. टाळी एका हाताने वाजत नाही. ही गोष्ट आपण लक्षात घ्या.’
म्हणजे नवाब मलिक यांनी जर केंद्रीय यंत्रणांवर आरोप लावले नसते तर नवाब मलिक यांच्यावर अशा पद्धतीची कारवाई झाली नसती असं अजित पवारांना म्हणायचंय का? हा प्रश्न जर कोणी उपस्थित केला तर त्यात काहीही चूक ठरणार नाही.
दुसरीकडे नवाब मलिक यांचा राजीनामा घेऊ नये असं महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत ठरलं त्यावर जेव्हा अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला त्यावेळची त्यांची प्रतिक्रिया ही तर अत्यंत बुचकळ्यात टाकणारी होती. त्यांनी तेव्हा असं म्हटलेलं की, ‘कोणाचा राजीनामा स्वीकाऱ्याचा किंवा नाही स्वीकाऱ्याचा याच निर्णय सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा असतो. मागच्या वेळेस दोन मंत्र्यांचा राजीनामा स्वीकारण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला होता. त्यासंबंधीची कारणं कदाचित वेगळी असतील. यावेळेस कारण वेगळं वाटलं त्यामुळे राजीनामा घेण्यात आला नाही.’
म्हणजे अजित पवार यांच्या मनात असं होतं का? त्यावेळेस राजीनामा घेतला त्यामुळे नवाब मलिक यांनी सुद्धा राजीनामा घ्यायला हवा होता जी मागणी भाजप, देवेंद्र फडणवीस सतत करत आहे.
दरम्यान, ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी नोटीस दिली होती त्यावेळेस अजित पवार यांनी ताबडतोब प्रतिक्रिया दिली होती. यावेळी प्रतिक्रिया देताना त्यांनी स्पष्ट सांगितलं की, ‘ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. अशा पद्धतीने नोटीस देणं हे अयोग्य आहे.’ अशा पद्धतीची भूमिका जाहीरपणे अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांसाठी घेतली. म्हणजे कुठे तरी फडणवीस यांना नोटीस दिली हे चुकीचं झालं अशी भूमिका अजित पवारांची होती.
आता आपण सरकारची भूमिका काय आहे ते बघूया. गृहमंत्र्यांनी सभागृहात उत्तर देताना सांगितलं की, केंद्रीय यंत्रणा जेव्हा नेत्यांना नोटीस देतात तेव्हा भाजपचे नेते काय म्हणतात की, तुम्ही कायद्याचं पालन करा नोटीस आली आहे तर त्याला समोर जा. काही केलं नसेल तर घाबरण्याचं काही कारण नाही. देवेंद्र फडणवीस त्यांना मिळालेल्या नोटीसबाबत एवढा गजहब का करतायेत? असं स्टेटमेंट दिलीप वळसे पाटील हे देतात तर दुसऱ्या बाजूला अजित पवार जे महाराष्ट्र सरकारचे उपमुख्यमंत्री आहेत ते मात्र म्हणतात की, फडणवीस यांना अशाप्रकारची नोटीस पाठवणं हे सर्वस्वी चूक आहे.
अर्थात अजित पवारांविरुद्ध केंद्रीय यंत्रणांच्या कारवाया सुरु नाहीएत असं अजिबातच नाही. अजित पवारांशी संबंधित असलेल्या जरंडेश्वर साखर कारखाना हा ईडीने जप्त केला आहे. अजित पवारांच्या नातेवाईकांवर आयकर विभागाने धाडी देखील टाकल्या. यासंदर्भात अजित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की, जे काही लढायचं आहे ते आमच्याशी लढा आमच्या परिवाराशी लढू नका. पण तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत असणारा त्यांचा सॉफ्ट कॉर्नर हा काही लपून राहिलेला नाही.
नवाब मलिक ज्या वेळेस फडणवीस आणि केंद्रीय यंत्रणांबाबत आरोप लावत होते त्यावेळेस अजित पवारांनी त्यांना नमतं घ्यायला सांगितलं होतं. अशा पद्धतीची चर्चा ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच रंगली होती.
दुसऱ्या बाजूला आता आपण देवेंद्र फडणवीस यांची अजित पवारांबाबत काय भूमिका असते ते पाहूयात.
खरं तर 2009 ते 2014 पर्यंतचं जे काँग्रेस-राष्ट्रवादी सरकार होतं त्या सरकारमधला सगळ्यात मोठा व्हिलन हा विरोधी पक्षाने कोणाला केलं होतं तर ते अजित पवार यांना. सिंचन घोटाळ्यावरुन अजित पवारांना भाजपने जंग-जंग पछाडलं होतं. त्यामध्ये आघाडीवर कोण होते तर विनोद तावडे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे हे या सगळ्यात आघाडीवर होते. त्यांनी अजित पवारांनी सिंचन घोटाळा केला अशा पद्धतीचे एका मागून एक सतत आरोप केले होते. व्यथित होऊन अजित पवारांनी दोनदा राजीनामा दिला. एकदा उपमुख्यमंत्री पदाचा आणि त्यानंतर त्यांनी आमदारकीचा देखील राजीनामा दिला होता. अत्यंत भावूक होऊन त्यांनी पत्रकार परिषद देखील घेतली होती. असं असताना यावेळच्या सरकारमध्ये मात्र, अजित पवार यांच्यावर एकाही भाजप नेत्याने शिंतोडा सुद्धा उडवलेला नाही. किरीट सोमय्यांचं उदाहरण आपण थोडसं बाजूला ठेवू.
इतर भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या अजित पवार यांच्याकडे त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे. अजित पवारांच्या नातेवाईकांवर आयकर विभागाच्या धाडी पडतात त्याच्याबद्दल भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया येत नाही. अजित पवारांचा जरंडेश्वर कारखाना ईडीकडून जप्त केला जातो आणि त्या संदर्भात ईडीकडून जे प्रेस रिलीज येतं त्यात थेट अजित पवार आणि त्यांच्या पत्नी यांच्यावर आरोप ठेवला जातो. त्याबद्दलही भाजपचे नेत्यांकडून फार काही प्रतिक्रिया येत नाही.
अजित पवार अर्थसंकल्प मांडतात त्यावेळी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात देवेंद्र फडणवीस हे त्यांच्यावर आरोप-प्रत्यारोप करतात. भाजपचं पूर्ण टार्गेट हे शिवसेना आहे आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसमधलेच महत्त्वाचे नेते मग त्यात शरद पवार सुद्धा आहेत. अगदी अनिल देशमुख यांच्यावर आरोप करुन त्यांना अटक झाली. नवाब मलिक यांच्यासारख्या नेत्याला एका रात्रीत अटक झाली. तरी सुद्धा अजित पवार यांच्याबाबतीत मात्र भाजपचे नेते कोणत्याही पद्धतीची प्रतिक्रिया देत नाहीत. देवेंद्र फडणवीस सुद्धा फार काही बोलत नाहीत.
अशाच पद्धतीची चर्चा ही धनंजय मुंडे प्रकरणात देखील झाली होती. त्यावेळेस त्यांच्यावर एका महिलेने आरोप लावला होता. त्यावेळी भाजपचने इतर नेते आरोप लावत होते पण देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया मात्र मावळ होती. तुम्हाला आठवत असेल तर ज्यावेळेस अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला त्यावेळेस धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर त्या सगळ्या आमदारांना बोलवण्यात आलं होतं.
कारण तेव्हा ते विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते होते. त्यावेळी राष्ट्रवादीच्या आमदारांची जमवाजमव ही धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर झाली होती. धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या अत्यंत जवळचे समजले जातात आणि त्यावेळी शरद पवार यांनी त्या बंडानंतर आमदारांची बैठक बोलावली तर त्या बैठकीला सगळ्यात शेवटी येणार कोण होते तर ते धनंजय मुंडे होते.
या पार्श्वभूमीवर जर आपण विचार केला तर अजूनही कुठे तरी भाजपला, देवेंद्र फडणवीस यांना अजित पवारांबद्दल सहानुभूती आहे. तीच सहानुभूती हीच अजित पवारांना देखील आहे. कारण असं म्हटलं जात होतं की, राष्ट्रवादी काँग्रेसच्य अंतर्गत बैठका चालू होत्या महाविकास आघाडी सरकार बनविण्यासाठी त्यावेळेस भाजप बरोबर आपण सरकार बनवलं पाहिजे शिवसेना आणि काँग्रेस असं कडबोळ्याचं सरकार चालू शकणार नाही. अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत मांडणारे दोनच नेते होते. त्यातले सगळ्यात प्रमुख नेते हे अजित पवार होते. ही गोष्ट सुद्धा लपून राहिलेली नाही.
खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे बंड झालं आणि अजित पवार-देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी झाला त्यानंतर ज्यावेळेस अजित पवारांना पुन्हा एकदा राष्ट्रवादीत घेतलं गेलं आणि त्यांना उपमुख्यमंत्री बनवलं गेलं त्या काळात शरद पवार यांनी या संदर्भात का अजित पवारांना घेतलं आणि कसे अजित पवार परत आले याविषयी अनेकदा भूमिका मांडल्या.
शरद पवारांनी याबाबत सारवासारव करण्याचा प्रयत्न देखील केला की, अजित पवारांना वाईट वाटलं, त्यांचं चुकलं आणि त्यांनी हा निर्णय फक्त आणि फक्त ज्या पद्धतीने काँग्रेसच्या नेत्यांनी आघाडीच्या बैठकीमध्ये शरद पवारांवर आरोप लावले त्यातून व्यथित होऊन, चिडून त्यांनी ही भूमिका घेतली.
अशा पद्धतीची सारवासारव सुद्धा शरद पवारांनी केली. पण तरी सुद्धा आत्ताच्या अजित पवारांच्या भूमिका या पक्षाशी नाही तर महाविकास आघाडीच्या धोरणाशी पूर्णपणे विसंगत आहे. हे स्पष्टपणे दिसतं आहे. उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार किंवा मंत्री म्हणून सरकारचं पूर्ण काम करत आहेत.
सतत अशी चर्चा असते की, अजित पवार सकाळी सात वाजताच मंत्रालयात येऊन बसतात. दिवसभर लोकांसाठी उपलब्ध असतात. सतत दौरे करत असतात.. वैगरे, वैगरे… पण तरी सुद्धा राजकीय भूमिकांच्या बाबतीत अजित पवारांची भूमिका ही महाविकास आघाडीची किंबहुना शरद पवारांच्या भूमिकेपेक्षा पूर्णपणे वेगळ्या आहेत. हेच सतत बाहेर दिसतं आहे.
तुम्हाला परदेस सिनेमा आठवत असेल त्यातलं एक गाणं पण तुम्हाला नक्कीच आठवत असेल ते म्हणजे.. ‘दो दिल मिल रहे है… मगर चुपके चुपके..’ या गाण्यातून तुमच्या लक्षात येईल की, अजूनही देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे संबंध महाराष्ट्राच्या राजकारणात कसे आहेत.
ADVERTISEMENT