परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर ईडीने केलेली कारवाई ही सूडबुद्धीने केलेली कारवाई असून शिवसेना या कारवाईने दबून न जाता कायदेशीर उत्तर देईल असे मत राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून मंत्र्यांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र अशाप्रकारे केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करणे सर्वस्वी चुकीचे असून ते करणे लोकशाहीला घातक आहे असंही त्यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशाप्रकारे कारवाई करून शिवसेनेला नामोहरम करण्याचा प्रयत्न करण्यात आला तरीही अशा प्रकारच्या दबावाला आम्ही बळी पडणार नाही. शिवसेना कधीही अशा दबावापुढे झुकली नाही आणि यापुढेही झुकणार नाही. या कारवाईला आम्ही नक्की कायदेशीर उत्तर देऊ असे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
१३ तासांच्या ईडी चौकशीनंतर अनिल परब यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….
राज्यसभा निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या दिवशीच ही कारवाई करण्यात आली असली तरीही राज्यसभेच्या निवडणुकीचे अर्ज दाखल करण्यासाठी ३१ मे ही तारीख अखेरची असून त्यानंतरच प्रत्यक्ष किती उमेदवार रिंगणात राहतात ते स्पष्ट होणार आहे. राज्यसभेच्या सहा जागासाठी शिवसेनेने आपल्या दोन्ही उमेदवारांचे उमेदवारी अर्ज आज दाखल केले असून त्यांना लागणारी मतं देखील आमच्याकडे आहेत त्यामुळे शिवसेनेचे दोन्ही उमेदवार नक्की निवडून येतील अशी ग्वाही शिंदे यांनी यावेळी बोलताना दिली.
आज ईडीच्या अधिकाऱ्यांकडून सकाळीच परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर आणि त्यांच्याशी संबंधित जागा तसंच व्यक्तींवर छापेमारी करण्यात आली. सुमारे १३ तास ही छापेमारी सुरू होती. त्यातली मुंबईतली कारवाई संपल्यानंतर अनिल परब यांनी तपास यंत्रणांना चौकशीसाठी सहकार्य केल्याचं सांगितलं.
परिवहन मंत्री अनिल परब हे एका रिसॉर्टमुळे कसे अडकत गेले? वाचा सविस्तर बातमी
काय म्हणाले अनिल परब?
आज ईडीच्या अधिकाऱ्यांनी माझ्या शासकीय निवासस्थानावर, मी राहतो त्या घरावर माझ्याशी संबंधित काही लोकांवर आज छापेमारी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून या बातम्या सतत येत होत्या. ईडीची कारवाई होणार अशा बातम्या सतत येत होत्या. यामागचा गुन्हा काय? हे लक्षात आलं की दापोलीतलं साई रिसॉर्ट. मी पहिल्या दिवसापासून सांगितलं आहे की साई रिसॉर्टचे मालक सदानंद कदम आहेत. त्याची सगळी माहिती देण्यात आली आहे.
हे रिसॉर्ट अजून बांधून झालेलं नाही, ते सुरू झालेलं नाही असं असताना पर्यावरणाची दोन कलमं लावून सांडपाणी समुद्रात जातं असा गुन्हा केंद्रीय पर्यावरण खात्याने दाखल केला. हे रिसॉर्ट सुरू नाही हे पोलिसांनी सांगितलं आहे तरीही ही कारवाई केली गेली. माझ्याविरोधात आणि साई रिसॉर्टविरोधात ही कारवाई झाली. आज ईडीने कारवाई केली, मी त्यांना सगळी उत्तरं दिली आहेत. यापूर्वीही उत्तरं दिली होती आजही सगळी उत्तरं दिली आहेत. यापुढेही मला प्रश्न विचारले गेले तर मी उत्तरं देईन असं अनिल परब यांनी स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT