Dhananjay Munde Bell's Palsy : बीडमध्ये घडलेलं संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि त्यानंतर जिल्ह्यातल्या गुन्हेगारीच्या ओपन होणाऱ्या फाईल्समुळे धनंजय मुंडे हे काही महिन्यांपासून अडचणीत सापडलेले आहेत. अशातच त्यांना प्रकृतीच्या अडचणींनाही सामोरं जावं लागत असल्याचं दिसतंय. आधी डोळ्याचं ऑपरेशन आणि त्यानंतर आता बेल्स पाल्सी नावाच्या एका आजाराने ते ग्रस्त झाल्याचं समजतंय. मंत्री धनंजय मुंडे यांनी 20 फेब्रुवारी 2025 रोजी स्वत: आपल्याला 'बेल्स पाल्सी' चं निदान झालं असून नीट बोलू शकत नाहीत असं सांगितलंय. त्यामुळेच आपण कॅबिनेट बैठकांना उपस्थित राहू शकत नाहीत असंही ते म्हणालेत.
ADVERTISEMENT
बेल्स पाल्सी म्हणजे काय?
बेल्स पाल्सी हा चेहऱ्यावरील स्नायूंच्या हालचाली नियंत्रित करणाऱ्या मज्जातंतूना होणारा विकार आहे. या मज्जातंतूला फेशियल किंवा क्रॅनियल नर्व्ह म्हणतात. या मज्जातंतूला झालेल्या नुकसानीमुळे या स्नायूंमध्ये कमकुवतपणा किंवा अर्धांगवायु होतो. अर्धांगवायू म्हणजे तुम्ही तेवढ्या स्नायूंचा अजिबात वापर करू शकत नाही.
हे ही वाचा >> Sambhajinagar : शिवजयंतीमध्ये गुंड लॉरेन्स बिश्नोईचे फोटो झळकवणारा 21 वर्षीय तरूण पोलिसांच्या ताब्यात
बऱ्याचदा बेल्स पाल्सीची लक्षणं सुरू होण्याच्या काही दिवसांपूर्वीच तुम्हाला सर्दी होऊ शकते. लक्षणं बहुतेकदा अचानक सुरू होतात, पण ती लक्षणं दिसण्यासाठी 2-3 दिवस लागू शकतात. त्यानंतर ते लक्षणं तीव्र होत जातात. बऱ्याचदा ही लक्षणं एकाच बाजूला दिसतात.
धनंजय मुंडेंना काय त्रास होतोय?
"माझ्या दोन्ही डोळ्यांवर पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. पद्मश्री डॉ. टी.पी. लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या. साधारण दहा दिवस त्यांनी डोळ्यांची काळजी विशेषत: तीव्र प्रकाश, धूळ आणि उन्हा पासून काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. त्याच दरम्यान मला Bell's palsy नावाच्या आजाराचे निदान झाले. त्याच्यावरील उपचाराचे निदान सध्या रिलायन्स हॉस्पिटल मधील प्रसिद्ध डॉ. अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या आजारामुळे सध्या मला सलग दोन मिनिटही व्यवस्थित बोलता येत नाही. त्यामुळे सध्या एक-दोन कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आले नाही. याबाबत मी मुख्यमंत्री आदरणीय श्री.देवेंद्र फडणवीस साहेब तसेच आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय श्री. अजितदादा पवार यांना कल्पना दिलेली आहे. लवकरच या आजारावर मात करून मी पुन्हा जनसेवेच्या कामात रुजु होईल..."
ADVERTISEMENT
