Why I Killed Gandhi? नावाच्या लघुपटात अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे ही भूमिका साकारली आहे. अमोल कोल्हे यांनी 2017 मध्ये ही भूमिका केली आहे. मात्र त्याचा ट्रेलर नुकताच युट्यूबवर रिलिज झाला आहे. ज्यामुळे वाद निर्माण झाला आहे. अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत. त्यांच्या या भूमिकेला जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केला आहे. या सगळ्या वादावर अमोल कोल्हे यांचं काय म्हणणं आहे हे मुंबई तकने जाणून घेतलं आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाले अमोल कोल्हे?
‘मी सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो, या सिनेमाचं चित्रीकरण 2017 मध्ये झालं आहे. त्यावेळी एक कलाकार म्हणून अमोल कोल्हेची वेगळी परिस्थिती होती. एक कलाकार म्हणून वेगळ्या परिस्थितीतून मी स्वतः जात होतो. कारण 2008-2009 या वर्षात राजा शिवछत्रपती ही मालिका संपली. त्या मालिकेला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. त्यानंतर शंभूराजे या नाटकाचेही प्रयोग मी करत होतो. त्यानंतर कलर्स हिंदीवर वीर शिवाजी नावाची एक मालिका केली मात्र अफझल खान वधाच्या वेळी ती मालिका बंद झाली. त्यानंतर अमोल कोल्हे कलाकार म्हणून टाइपकास्ट होणार का? अशीही चर्चा सुरू झाली होती. त्यावेळी वेगवेगळे प्रयत्न मी करत होतो. ऑन ड्युटी चोवीस तास, मराठी टायगर्स असे सिनेमा मी केले. शिवपुत्र संभाजी हे महानाट्यही मी केलं. त्याच दरम्यान 2016 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करण्याची संधी मला एका वाहिनीने दिली. त्याच वर्षी जानेवारी महिन्यात आम्ही त्या मालिकेचं चित्रीकरण सुरू केलं. त्यानंतर 11 दिवसांनीच ती मालिका बंद पडली.’
NCP खासदार अमोल कोल्हे नथुराम गोडसेच्या भूमिकेत, चर्चांना उधाण
‘माझ्यासाठी कलाकार म्हणून हा फार मोठा धक्का होता. 2009 नंतर त्या तोडीची भूमिका करण्यासाठी मी जवळपास आठ वर्षे प्रयत्न करत होतो. कलाकार म्हणून ती माझी एक गरज होती. त्यामुळे पुढे काय? हा माझ्यापुढे प्रश्न होता. त्याचवेळी माझ्यासमोर why i killed gandhi या हिंदी सिनेमाची ऑफर आली. हिंदीतला प्लॅटफॉर्म मिळणं ही मला मोठी गोष्ट वाटली. त्यांनी मला जेव्हा सांगितलं की मला नथुराम साकारायचा आहे तेव्हा माझ्या मनात काहीसा संभ्रम निर्माण झाला होता. दिग्दर्शक अशोक त्यागी यांच्याशी मी चर्चा केली. त्यांनी मला हे सांगितलं की जी कोर्ट ट्रायल झाली त्यात नथुरामने जी भूमिका मांडली ती तुम्हाला करायची आहे. त्यांना त्यावेळी मी स्पष्ट सांगितलं होतं की नथुरामचं उदात्तीकरण होईल अशी भूमिका मी कधीही घेतलेली नाही. महात्मा गांधी यांच्या हत्येचं समर्थन करणं हे धादांत न पटणारी गोष्ट आहे. कारण कोणत्याच हत्येचं समर्थन होऊ शकत नाही. त्यांनी मला तेव्हा सांगितलं की तुम्ही फक्त ही भूमिका एक कलाकार म्हणून साकारत आहात.’
‘त्यांनी मला हे सांगितल्यानंतर मी विचार केला की अनेकदा वैचारिक भूमिका वेगळी असतानाही कलाकार विविध भूमिका साकारत असतात. रावणाचीही भूमिका केली जाते, कंसाचीही भूमिका केली जाते, गँगस्टरचीही भूमिका केली जाते. याचा अर्थ तो कलाकार त्या विचारधारेशी सहमत असतो का? तर तसं नाही. त्यामुळे एखादी भूमिका साकारली म्हणजे त्या विचारधारेचा शिक्का कुणा कलाकारावर मारला जावा हे योग्य नाही. निळू फुले, प्रभाकर पणशीकर यांनी अनेक खलनायक अजरामर करून ठेवले आहेत. विचारधारा पटत नसतानाही त्यांनी य़ा भूमिका साकारली. त्यानंतर दिग्दर्शक आणि निर्माते यांच्यात काही वाद झाले आणि हा सिनेमा रिलिज होणार नाही असं मला तेव्हा कळलं होतं.’
‘या सगळ्यानंतर परवाच्या दिवशी मला समजलं की why i killed gandhi हा सिनेमा बहुतेक रिलिज होतो आहे. त्यानंतर काल माध्यमांमध्ये याच्या बातम्या आल्या. त्याचा संबंध मी राष्ट्रवादी काँग्रेसचं लोकसभेत प्रतिनिधीत्व करतो आहे त्याच्याशी जोडण्यात आला. मात्र 2017 मध्ये कलाकार अमोल कोल्हेनी भूमिका स्वीकारली तेव्हा सगळी परिस्थिती वेगळी होती. तेव्हा मला स्वप्नातही माहित नव्हतं की मी 2019 ला खासदारकीची निवडणूक लढवणार आहे. आज अचानक हा वाद उद्भवला आहे. सोशल मीडियावर जी टीका होते आहे त्यावर मी इतकंच सांगेन की प्रत्येकाला व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आहे आणि माझा त्यावर काही आक्षेप नाही. 2017 मध्ये मी अडचणीत होतो. त्यावेळी मला जे मदत करायला आले होते ती माणसं मला जवळची आहेत. त्यांच्यापैकी कुणीही मला फोन केलेला नाही. माझ्या विचारधारेवर जे लोक प्रश्न उपस्थित करत आहेत ते मला अगम्य वाटतं’ असं अमोल कोल्हे यांनी मुंबई तकशी बोलताना सांगितलं.
ADVERTISEMENT