दिल्लीत शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली त्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. अशात आज जेव्हा याविषयी महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना विचारलं असता त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. बँकावर आरबीआयने लादलेले निर्बंध कमी करावेत या मागणीसाठी शरद पवार यांनी मोदींची भेट घेतली असल्याचं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. तसंच ईडीसंदर्भात प्रश्न विचारला असता, ED चंद्रकांत पाटील यांच्या सल्ल्याने वागतं आहे हे आता निष्पन्न झालं आहे असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. जयंत पाटील हे आज सोलापूरमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज दिल्लीत भेट झाली. सुमारे एक तासभर सुरु असलेल्या या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. तब्बल 19 महिन्यांनी पवार-मोदी भेटीमुळे राज्यातली राजकीय समीकरणं बदलतात की काय अशा चर्चा सुरु असताना या भेटीमागचा तपशील समोर आला आहे. या भेटीत कोणत्याही राजकीय विषयावर चर्चा झालेली नसल्याचं स्पष्टीकरण पवारांनी दिलं आहे.
सहकारी बँकांसाठी आरबीआयने नियमांत केलेले बदल आणि केंद्र सरकारच्या नवीन सहकार खात्यासंदर्भात चर्चेसाठी शरद पवारांनी पंतप्रधान मोदींची वेळ मागितली होती. त्यानुसारच ही भेट झाली आहे. संसदेने सप्टेंबर 2020 मध्ये बँकिंग रेग्युलेशन विधेयक मंजूर केलं होतं. यानुसार आता सहकारी बँकांवरही आरबीआयचं नियंत्रण असणार आहे.याच संदर्भात या दोन्ही नेत्यांची भेट झाली असं शरद पवार यांनी सांगितलं. त्यापाठोपाठ आता जयंत पाटील यांनीही हे कारण सांगितलं आहे.
खरंतर शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची भेट होणं ही बाब साधीसुधी नाही. त्या भेटीचे अनेक कंगोरे असू शकतात. कारण राष्ट्रपतीपदाची निवडणूकही जवळ येते आहे. एवढंच नाही तर गेल्यावेळेस झालेल्या म्हणजेच 19 महिन्यांपूर्वी झालेल्या भेटीलाही संदर्भ आहे. महाराष्ट्रात तेव्हा भाजप राष्ट्रवादी सोबत जाणार का? अशा चर्चा त्यावेळी सुरू होत्या. कारण शिवसेना आणि भाजप दूर केले होते. त्यावेळी शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची भेट झाली होती. या भेटीनंतर ती भेट थेट आज होते आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा यशस्वी प्रयोग शरद पवार यांनी करून दाखवला. त्याआधी म्हणजेच विधानसभेच्या निवडणूक प्रचाराच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारादरम्यान ‘मी पुन्हा येईन’चा नारा दिला होता. एवढंच नाही तर समोर कुस्तीचं मैदान आहे पण मला पैलवानच दिसत नाही. शरद पवार यांचं राजकारण आता संपलं आहे अशी काही वाक्यं त्यांनी वारंवार वापरली होती.
या एका गोष्टीमुळे म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेमुळे शरद पवार हे खूप दुखावले गेले असंही त्यावेळी बोललं गेलं आणि म्हणूनच राष्ट्रवादी आणि भाजप यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करायचं असेल तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी नकोत अशी अट शरद पवार यांनी मोदींना घातली होती असंही त्यावेळी चर्चिलं गेलं. आता आज एक तास या दोन नेत्यांमध्ये पुन्हा चर्चा झाली आहे. या चर्चेत सहकारी बँका हा विषय तर होताच. या विषयासाठीच त्यांची भेट झाल्याचं सांगितलंही जातं आहे. मात्र राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
ADVERTISEMENT