ADVERTISEMENT
शिंदे गटाचे प्रमुख म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे १४ खाती घेतली आहेत. सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ ही मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडे ठेवली आहेत.
संदिपान भुमरे यांना आताच्या मंत्रिमंडळात रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन खातं मिळालं आहे, उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे हेच खाते होते.
मालेगावचे आमदार दादा भुसे यांना बंदरे व खनिकर्म हे खातं मिळालं आहे. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात ते कृषीमंत्री होते.
महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहराज्य मंत्री म्हणून जबाबदारी पार पडलेले आणि शिवसेनेविरोधात बंड करण्यात आघाडीवरती असलेले शंभुराज देसाई यांना राज्य उत्पादन शुल्क हे खातं देण्यात आलं आहे.
उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात दादा भुसेंकडे जे खातं होतं ते कृषी खातं अब्दुल सत्तार यांच्याकडे देण्यात आले आहे. उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात ते महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य या खात्यांचे राज्यमंत्री होते.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्या खांद्यावर ही जबाबदारी होती. ती जबाबदारी आता दीपक केसरकर यांच्याकडे आली आहे.
पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्यानंतर संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. शिंदे-फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात पुन्हा त्यांची वर्णी लागली आहे. अन्न व औषध प्रशासन हे खातं त्यांना देण्यात आलं आहे.
उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात पाणी पुरवठा मंत्री असलेले गुलाबराव पाटील यांच्या खांद्यावर पाणीपुरवठा व स्वच्छता या खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री असलेल्या उदय सामंत यांच्याकडे उद्योग खातं देण्यात आलं आहे. पूर्वी या खात्याची जबाबदारी शिवसेने ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्याकडे होती.
तानाजी सावंत हे उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री नव्हते. शिंदे-फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्या खांद्यावर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT