केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मंगळवारी केलेल्या या वक्तव्यानंतर त्याचे पडसाद राज्यभरात बुधवारी उमटले. शिवसेनेने नारायण राणेंच्या विरोधात एल्गार पुकारला. ज्या ठिकाणी भाजपची कार्यालयं फोडण्यात आली त्या ठिकाणी भाजप आणि शिवसेना कार्यकर्तेही भिडले. नारायण राणेंना अटक करण्यात आली. आता प्रश्न उरतो आहे तो म्हणजे नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेचं काय होणार हा प्रश्न कायम आहे. नारायण राणे यांना जामीन मिळाला आहे. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदही घेतली. आता हा प्रश्न का आहे ते जाणून घेऊ.
ADVERTISEMENT
नारायण राणे यांनी जामीन मिळाल्यानंतर जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी हे सांगितलं की परवापासून (शुक्रवार) जन आशीर्वाद यात्रा सुरूच राहणार. मी कुणालाही घाबरत नाही. मोदी सरकारची कामं सरकारपर्यंत पोहचवणं हा त्यामागचा उद्देश आहे. न्यायालयाने 17 सप्टेंबरपर्यंत त्यांच्या यात्रेवर कारवाई करू नये असं म्हटलं आहे.
अडसर क्रमांक 1
नारायण राणे यांनी जरी हे म्हटलं असलं की यात्रा सुरू होणार तरीही त्यांना दिलासा एका ठिकाणच्या म्हणजेच नाशिकच्या प्रकरणात मिळाला आहे. पुणे, ठाणे, रायगड या ठिकाणीही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे त्या प्रकरणांचं काय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे त्याचा अडसर जन आशीर्वाद यात्रेत आहे.
अडसर क्रमांक 2
नारायण राणेंनी सिंधुदुर्ग या ठिकाणाहून यात्रा सुरू होईल पुन्हा असं सांगण्यात आलं आहे. मात्र सिंधुदुर्गमध्ये 7 सप्टेंबरपर्यंत निर्बंध आहेत. सिंधुदुर्गामध्ये मनाई आदेश आहेत, जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश काढले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गातून यात्रा पुन्हा सुरू करण्यासाठी हा मोठा अडसर आहे.
अडसर क्रमांक 3
नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा पुन्हा सुरू झाली आणि त्यांनी पुन्हा काही वक्तव्य केलं तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. कारण नारायण राणे यांनी एक वक्तव्य केलं आणि दोन दिवस राडा झाला. अशात नारायण राणेंनी पुन्हा एकदा शिवसेनेबाबत किंवा उद्धव ठाकरेंबाबत काही वक्तव्य केलं आणि त्यातून राडा झाला तर पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
अडसर क्रमांक 4
जनआशीर्वाद यात्रेचे संयोजक प्रमोद जठार यांच्या विरोधात तक्रार दाखल कऱण्यात आली आहे. ही तक्रार शिवसेनेने दाखल केली आहे. प्रमोद जठार यांनी असं म्हटलं होतं की नारायण राणेंना अटक करण्यात आली ती सुडबुद्धीने करण्यात आली असं म्हटलं होतं. तसंच छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने अटक केली आणि त्यानंतर त्याचं राज्य गेलं होतं असंही म्हटलं होतं. हा मुद्दा उपस्थित करत छत्रपती संभाजीराजे आणि नारायण राणे यांची तुलना केल्याची तक्रार राजन साळवी यांनी केली आहे. त्यामुळे ही तक्रारही जनआशीर्वाद यात्रेमधला अडसर ठरू शकतो.
अडसर क्रमांक 5
योगी आदित्यनाथ यांना जोडे मारण्याची भाषा उद्धव ठाकरे यांनी एका दसरा मेळाव्यात केली होती. यावरूनही भाजपने यवतमाळ आणि नाशिकमध्ये काही तक्रारी दाखल केल्या आहेत. एवढंच नाही तर यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. जन आशीर्वाद यात्रा सुरू झाली तर अर्थातच या रोषाचं रूपांतर राड्यात होऊ शकतं त्यामुळे हा पाचवा अडसर नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेत ठरू शकतो.
महाराष्ट्रात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरू झाली तशीच इतर मंत्र्यांनीही यात्रा काढली. पण नारायण राणे यांची यात्राच चर्चेत राहिली कारण नारायण राणे यांनी थेट शिवसेनेला शिंगावर घेतलं. त्याआधीही पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी नारायण राणे जेव्हा महाराष्ट्रात आले होते तेव्हा त्यांनी सीएमबीएम गेला उडत असं वक्तव्य केलं होतं. जेव्हा नारायण राणे यांनी स्वातंत्र्याचा हिरक महोत्सव आहे की अमृत महोत्सव हे मुख्यमंत्र्यांना माहिती नाही का? असा प्रश्न उपस्थित करून मी असतो तर कानाखाली खेचली असती असं वक्तव्य केलं तेव्हा मात्र शांत असलेली शिवसेना आक्रमक झाली. शिवसेनेकडून अत्यंत संतप्त प्रतिक्रिया पाहण्यास मिळाल्या.
मी सगळ्यांना पुरून उरलोय, शिवसेनेने विसरू नये-नारायण राणे
शिवसेनेला जशास तसं उत्तर भाजपकडूनही देण्यात आलं. तरीही भाजपचे राज्यातील प्रमुख नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सावध भूमिका घेत नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेलं वक्तव्य योग्य नाही त्या पदाचा सन्मान राखला पाहिजे असं सांगितलं आणि नारायण राणेंच्या पाठिशी आम्ही आहोत अशीही ग्वाही दिली. एवढंच नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणेंना अटक झाली तरीही जनआशीर्वाद यात्रा सुरू राहिल असं सांगितलं होतं. तसं ते दिसलं नाही. अटकनाट्यानंतर नारायण राणेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जनआशीर्वाद यात्रा शुक्रवारपासून सुरू होईल असं स्पष्ट केलं आहे. एवढंच नाही तर मी सगळ्यांना पुरून उरलोय हे कुणी विसरू नये असंही शिवसेनेला सुनावलं आहे. अशात आपण पाहिलं की त्यांच्या यात्रेत हे पाच प्रमुख अडसर आहेत. त्यामुळे त्यांच्या जनआशीर्वाद यात्रेचं काय होणार हा प्रश्न कायम आहे.
ADVERTISEMENT