नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन कल्चरल सेंटरमध्ये नीती आयोगाच्या सातव्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक घेतली. जुलै 2019 नंतर गव्हर्निंग कौन्सिलची ही पहिली वैयक्तिक बैठक होती. नीती आयोगाच्या बैठकीच्या अजेंड्यामध्ये तेलबिया आणि कडधान्ये तसेच कृषी-समुदायांमध्ये स्वयंपूर्णता प्राप्त करणे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि पीक विविधीकरण यासह इतर गोष्टींचा समावेश आहे. या गव्हर्निंग कौन्सिलमध्ये सर्व राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे लेफ्टनंट गव्हर्नर आणि अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते. महाराष्ट्राच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. बैठक झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
ADVERTISEMENT
फ्रेंडशिप-डे च्या प्रश्नावरती काय म्हणाले एकनाथ शिंदे?
आज फ्रेंडशिप-डे आहे आणि तुमचे सर्व आमदार असं म्हणत आहेत की लवकरच एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी मैत्री होणार आहे. तुम्ही उद्धव ठाकरे यांना फ्रेंडशिप-डेच्या शुभेच्छा देणार का? या प्रश्नावर एकनाथ शिंदे गप्प राहिले. ते म्हणाले “फ्रेंडशीप डे सर्वांसाठी असतो, माझ्या सर्वांना शुभेच्छा आहेत”, असं म्हणून शिंदे यांनी वेळ मारून नेली.
निती आयोगाच्या बैठकीत प्रामुख्याने कशावर झाली चर्चा?
* सिंचन क्षेत्रावर भर राहणार आहे.
* सेंद्रीय शेतीकडे लक्ष देणार आहे.
* डाळ उत्पादनात आत्मनिर्भर होण्याकडे कल.
* बागायती क्षेत्रात वाढ होणार.
* जलयुक्त शिवार अभियान राबवणार.
भाजपच्या मिशन- 48 वरती एकनाथ शिंदे म्हणाले..
भाजप मिशन 48 राबवत आहे ही चांगली गोष्ट आहे. मिशन 48 हे भाजप आणि शिवसेनेचं मिळून आहे. आम्ही युतीत आहोत. आम्ही राज्यात मजबुतीनं काम करु असे एकनाथ शिंदे म्हणाले. मंत्रिमंडळ विस्तार ही लवकर होईल. कोर्टाचा आणि सरकार स्थापनेचा काही संबंध नाही, त्यामुळे विस्तार लवकरच होईल असे शिंदे म्हणाले.
शाळेत झळकणार गुरुजींचे फोटो
नीती आयोगाच्या बैठकीत शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवून आणण्यावरही चर्चा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शिक्षणामध्ये शिक्षकांचं मोठं योगदान आहे. ‘आमचे गुरुजी’ ही संकल्पना शाळेत राबवणार आहोत. या संकल्पनेनुसार जे शिक्षक शिकवतात त्यांचे फोटे शाळेत लावले जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT