उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरी ईडीची धाड पडते, त्यांच्या बहिणींच्या घरी ईडीची धाड पडते. तर मग सुप्रिया सुळेंच्या घरी धाड कशी पडत नाही? असा प्रश्न राज ठाकरेंनी ठाण्यातल्या उत्तर सभेत विचारला होता. या प्रश्नाला आज शरद पवार यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाले शरद पवार?
शरद पवार चिडून म्हणाले ”अहो हा काय प्रश्न आहे का? अजित पवारांच्या घरी रेड पडते आणि सुप्रियाच्या घरी पडत नाही. तुम्हाला काय म्हणायचं आहे? मी आणि अजित पवार वेगळे आहोत का? राज ठाकरे यांनी पोरकटपणे हा आरोप केला आहे. त्यांना फारसं गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही. प्रत्येकाच्या घरी ईडी गेल्यावरच भूमिका योग्य असते असं म्हणायचं आहे तुम्हाला? काल काहीतरी पोरकटपणा करत भाषण केलं. त्याचा काय उल्लेख केला. मी आणि अजित पवार वेगळे आहोत का? ते कुणी तिसरे आहेत का? सुप्रिया आणि अजित हे काही बहीण भाऊ नाहीत का? हा काय राजकीय आरोप आहे का? हा पोरकट आरोप आहे.” असं शरद पवार यांनी सुनावलं आहे.
साधी सरळ गोष्ट आहे की भारतीय जनता पार्टीचं जे काही मार्गदर्शन राज ठाकरेंना झालं आहे ते भाषणाच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं. आता भाषणात ते म्हणाले शरद पवारच मोदींना सांगतात कुणावर कारवाई करा.. मी संसदेचा सदस्य आहे. मी पंतप्रधान किंवा केंद्रीय मंत्र्यांना भेटू शकत नाही? मी बोलणं केलं मोदींशी. देशात अनेक प्रश्न आहेत. महाराष्ट्राच्या राज्यपालांनी १२ आमदारांची यादी अजून जपून ठेवली आहे स्वतःकडे त्याबाबत ते काही निर्णय घेत नाहीत. मग हा विषय मी बोलू शकत नाही का? पंतप्रधानांकडे मी हे म्हणणं मांडलं.
सुप्रिया सुळेंचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे-राज ठाकरे
सिल्वर ओकवर जो हल्ला झाला त्याबाबत विचारलं असता शरद पवार म्हणाले की, “एसटी कर्मचाऱ्यांना मी फारसा दोष देणार नाही. ते कामगार आहेत. त्यांच्या काही मागण्या असतील. त्यांच्या मागण्यांसाठी ते महिनोनमहिने बसले होते. त्यांना चुकीचं नेतृत्व लाभलं. चुकीच्या नेतृत्वाने ज्या पद्धतीची भाषणं आणि टीका टिपण्णी केली त्यात त्यांच्या टीकेचा रोख एक व्यक्ती होता. हा प्रश्न राज्य सरकारकडे होता. त्यांच्यावर टीका केली गेली नाही. माझं नाव घेऊन सातत्याने एक प्रकारची टीका करून कष्टकरी कामगारांच्या डोक्यात काहीतरी भरवलं गेलं त्याचा हा परिणाम आहे. या सगळ्या प्रकारात मी कामगारांना दोष देणार नाही. जे घटक त्यांना इथपर्यंत घेऊन गेले त्यांची चौकशी झाली पाहिजे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT