पुण्यात वास्तव्य करणाऱ्या पूजा चव्हाण या मुलीने आत्महत्या केली. त्यानंतर तिच्या आत्महत्येचं प्रकरण सोशल मीडिया, प्रसारमाध्यमं सगळीकडेच गाजू लागलं आहे. पूजा चव्हाण ही सोशल मीडियावर बरीच Active होती कारण ती टिकटॉक स्टार होती. तिच्या मृत्यूनंतर ऑडिओ सुमारे 12 ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आणि त्यानंतर भाजपने संजय राठोड यांच्यावर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. पूजाचा मृत्यू 7 फेब्रुवारीला झाला. त्या दिवसापासून आजपर्यंत काय काय घडलं जाणून घ्या.
ADVERTISEMENT
जाणून घ्या पूजा चव्हाण आहे तरी कोण?
पूजा चव्हाण ही टिकटॉक आणि सोशल मीडियावर फेमस असलेली मुलगी होती. 22 वर्षांची पूजा चव्हाण ही मूळची परळीची होती. पुण्यात ती शिकण्यासाठी आणि इंग्लिश स्पिकिंगचा कोर्स करण्यासाठी आली होती. तिच्या भावासोबत ती पुण्यातल्या हडपसर भागात वास्तव्य करत होती. मागील रविवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास तिने सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. पुण्यातल्या हेवन पार्क या इमारतीत ती वास्तव्य करत होती याच इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून तिने उडी मारली. जखमी अवस्थेतल्या पूजाला रुग्णालयात नेत असतानाच तिचा मृत्यू झाला. पूजाच्या आत्महत्येनंतर कोणतीही सुसाईड नोट अथवा मेसेज असं सापडल्याची माहिती अद्याप पोलिसांनी दिलेली नाही.
सोशल मीडियावर काय चर्चा रंगण्यास सुरूवात झाली?
पूजा चव्हाणच्या मृत्यूची बातमी पसरताच सोशल मीडियावर तिच्या आत्महत्येचा आणि विदर्भातील एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सुरू झाली. फक्त चर्चाच सुरू झाली नाही तर अरूण राठोड या व्यक्तीशी बोलणाऱ्या एका कथित मंत्र्याच्या 12 ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या. कथित मंत्र्याचं नाव संजय राठोड असल्याचं भाजपने म्हटलं आहे कारण व्हायरल झालेल्या क्लिपमधल्या बड्या नेत्याचा आवाज हा त्यांचाच आहे असा दावा भाजपने केला. तसंच यावरून भाजपने संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली.एवढंच नाही तर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जावी अशीही मागणी केली.
देवेंद्र फडणवीस यांचं पोलीस महासंचालकांना पत्र
पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी वन मंत्री संजय राठोड यांचं नाव समोर आल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलं आणि या प्रकरणी सखोल चौकशी केली जावी अशी मागणी केली. तसंच भाजपचे नेते संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करतच होते.
संजय राठोड नॉट रिचेबल
पूजा चव्हाणने आत्महत्या केल्याची बातमी समोर आल्यापासून आणि कथित ऑडिओ क्लिपमध्ये संजय राठोड यांचं नाव आल्यानंतर संजय राठोड हे नॉट रिचेबल आहेत असा आरोपही भाजपच्या नेत्यांनी केला.
ऑडिओ क्लिप्समध्ये असलेला अरूण राठोड कोण?
ऑडिओ क्लिपमध्ये कथित मंत्री ज्या तरूणाशी संवाद साधत आहेत तो अरूण राठोड कोण असेही प्रश्न विचारले जाऊ लागले. अरूण राठोड हा मूळचा बीडचा आहे. पुण्यात तो पूजासोबत रहात होता. परळी येथील दारावती तांडा इथला तो रहिवासी आहे. ऑडिओ कॉलमध्ये अरूण जे काही पूजाबद्दल सांगतो आहे त्यावरून त्याला पूजाचा स्वभाव कसा आहे ते पूर्णपणे माहित होतं हेच दिसून येतं आहे. पूजा थोडी सर्किट आहे असाही उल्लेख त्याने केला आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
“पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची व्यवस्थित आणि सखोल चौकशी होईल.त्यानंतर गरज असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. सत्य जनतेसमोर आणलं जाईल यात काहीही शंका नाही. गेले काही दिवस, काही महिने असंही लक्षात आलं आहे की आयुष्यातून उठवण्याचाही प्रयत्न केला जातो आहे. असा प्रयत्न होऊ नये आणि सत्यही समोर आलं पाहिजे यासाठी योग्य जे काही असेल ते केलं जाईल.”
देवेंद्र फडणवीस रविवारी काय म्हणाले?
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप्स काळजीपूर्वक ऐकाव्यात. जेणेकरून त्यांना या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात येईल. मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घ्यावं” असाही सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
पूजाचे वडील काय म्हणाले ?
“पूजा ही खूप चांगली मुलगी होती. लोकं जे बदनाम करत आहेत तसं काहीही नाही. कोणतंही राजकारण नाही. लोकं म्हणतात राजकारणाखाली दबून तुम्ही बोलत नाही का? तर तसं काहीही नाही. आमच्यावर काहीही दबाव नाही. आम्ही ज्यावेळेस पुण्याला गेलो रात्री तिथे जेव्हा आम्ही विचारपूस केली. तिच्यासोबत जो मुलगा राहत होता त्याने स्पष्टपणे सांगितलं की, ती गॅलरीवर बसली होती आणि दीडच्या सुमारास ती खाली पडली. मी म्हणालो ती कशी काय पडली? तर ती चक्कर येत असल्याचं सांगत होती आणि तोवर ती खाली पडली. त्याचं म्हणणं असं आलं आहे. त्यामुळे मी कुणावर आरोप करु? मी कुणाचं नाव घेऊ?”
असं सगळं असलं तरीही भाजपने या प्रश्नावरून संजय राठोड यांचा राजीनामा मागितला आहे. तसंच पूजा चव्हाण आत्महत्येची सखोल चौकशी करावी अशीही मागणी केली आहे. त्यामुळे आता हे प्रकरण काय काय वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT