नांदेडच्या मराठा क्रांती मूक मोर्चामध्ये अशोक चव्हाण यांनी गैरहजेरी होती. त्यावरून संभाजीराजे यांनी अशोक चव्हाणांवर तिखट शब्दांमध्ये टीका केली. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मराठा क्रांती मोर्चा निघाला. त्यावेळी त्या जिल्ह्यांचे पालकमंत्री आले. आज अशोक चव्हाण का आले नाहीत? कुठे आहेत नांदेडचे पालकमंत्री? अशोक चव्हाण दिल्लीत सगळ्यांना भेटले पण मला भेटायला त्यांच्याकडे वेळ नव्हता असं म्हणत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अशोक चव्हाणांवर टीका केली आहे.
ADVERTISEMENT
अशोक चव्हाण यांच्याकडे उत्तर नाही त्यामुळे ते इथे आले नसावेत. आमच्या आंदोलनात सगळे आले पण अशोक चव्हाण आले नाहीत का? दिल्लीत मी सांगितलं होतं मला या प्रश्नावर आमच्या समाजाची बाजू मांडायची आहे. तिथे मला सांगण्यात आलं होतं बोलायचं नाही. पण मी बोललो दिल्लीतही एक गोष्ट समजली की भांडल्याशिवाय काहीच मिळत नाही. शिव छत्रपती आणि शाहूंचा वारसा चालवणारे आपण आहोत आम्ही गप्प बसणारे नाहीत हे लक्षात असू द्यावं असंही संभाजीराजेंनी सुनावलं आहे. औरंगबजेबाने दिल्ली दरबारात छत्रपती शिवरायांना बोलावलं होतं तेव्हा त्यांना शेवटच्या रांगेत उभं करून औरंगजेबाने अपमान केला. त्यावेळी महाराज दरबार आणि औरंगजेबाचं निमंत्रण धुडकावून बाहेर पडले होते. मी पण ठरवलं होतं मला संसदेत बोलू दिलं नसतं तर खासदारकी सोडून दिली असती.
119 वर्षांपूर्वी शाहू महाराजांनी मराठा आरक्षण का दिलं होतं त्याचा एक भन्नाट किस्सा!
ज्या शाहू महाराजांनी पहिल्यांदा आरक्षण दिलं त्यांचा वारसा चालवणाऱ्या मला बोलू देणार नसाल तर माझा काय उपयोग असा प्रश्न मी विचारला. सुप्रीम कोर्टाने आपल्याला सांगितलं आहे आपला मराठा समाज पुढारलेला आहे फॉर्वर्ड क्लास आहे. सामाजिक दृष्ट्या मागास नाही. त्यामुळे आरक्षण रद्द केलं आहे. आरक्षण रद्द केल्यानंतर पुढे काय करायचं? राज्य सरकार केंद्राची जबाबदारी आहे. केंद्र सरकार म्हणतंय आम्ही राज्यांना जबाबदारी दिली आहे. केंद्राचं आणि राज्याचं भांडण काय आहे आम्हाला घेणंदेणं नाही. आम्हाला आरक्षण मिळवणं हे आमचं लक्ष्य आहे.
आणखी काय म्हणाले संभाजीराजे?
आपल्या मराठा समाजाने 58 मोर्चे काढले, शांततेत मोर्चे निघाले. समाज बोलला, समन्वयक बोलले आता लोकप्रतिनिधींनी बोललं पाहिजे म्हणून आपण हे आंदोलन सुरू केलं आहे. आंदोलनात जे सहभागी झाले आहेत त्या सगळ्या नागरिकांनी शांत रहावं. लोकांनी जर रोष व्यक्त केला तर मीडियाला आव्हान करेन की तो त्यांनी जरूर दाखवावा म्हणजे आमच्या भावना लोकांपर्यंत पोहचतील. आपला आवाज आता दिल्लीत घुमला पाहिजे. आपल्याला आरक्षण पुन्हा मिळवायचं असेल तर मागासलेपण सिद्ध करावं लागेल. आज महाराष्ट्रातले मंत्री अशोकराव चव्हाण कुठे दिसत नाहीत. त्यांनी आपल्या समाजाचा मागासलेपणा सिद्ध करण्याची जबाबदारी घ्यायला हवी अशीही अपेक्षा संभाजीराजेंनी व्यक्त केली.
ADVERTISEMENT