बाळासाहेब ठाकरेंच्या लाडक्या अनिल परबांना भाजपकडून टार्गेट का केलं जातं आहे?

मुंबई तक

• 07:50 AM • 07 Jun 2021

महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आणि बाळासाहेब ठाकरे यांचे लाडके तसंच उद्धव ठाकरे यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक अशी ओळख असलेले अनिल परब सध्या पुन्हा एकदा चर्चेत आहेत. यावेळी कारण आहे ते म्हणजे त्यांच्या दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणामुळे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर आरोप केले आहेत. त्यानंतर रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या इंदुराणी जख आणि दापोलीचे प्रांताधिकारी […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आणि बाळासाहेब ठाकरे यांचे लाडके तसंच उद्धव ठाकरे यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक अशी ओळख असलेले अनिल परब सध्या पुन्हा एकदा चर्चेत आहेत. यावेळी कारण आहे ते म्हणजे त्यांच्या दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणामुळे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर आरोप केले आहेत. त्यानंतर रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या इंदुराणी जख आणि दापोलीचे प्रांताधिकारी यांनी ही चौकशीचे आदेश दिले आहेत. एवढंच नाही तर रत्नागिरीचे अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनीही या चौकशीचे आदेश दिले आहेत. भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्या विरोधात केलेल्या लेखी तक्रारीनंतर हे आदेश दिले गेले आहेत.

हे वाचलं का?

माझ्याविरोधातली तक्रार पूर्णपणे निराधार ! भ्रष्टाचाराच्या आरोपांवर अनिल परबांचं स्पष्टीकरण

सोमय्या यांनी काय आरोप केला आहे ?

परिवहन मंत्री अनिल परब यांनी लॉकडाऊन दरम्यान रत्नागिरी येथील दापोली येथे १० कोटींचा बेकायदेशीर साई रिसॉर्ट बांधला. त्याचा तपास करण्यासाठी दिल्लीहून विशेष टीम जाणार आहे. ED, CBI, आयकर विभाग, महसूल कडे ही मी तक्रार केली आहे.

साई रिस़ॉर्टचं बांधकाम बेकायदेशीर असल्याचा आरोप करत बांधकामादरम्यान CRZ चं उल्लंघन, फसवणूक, दस्तावेजात खाडाखोड, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष इत्यादी तक्रारी नमूद करत सोमय्यांनी रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. यावेळी मंत्री अनिल परब यांनी आपल्या पदाचा दुरुपयोगही केल्याचं सोमय्या यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. किरीट सोमय्यांची तक्रार दाखल झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत. आता या प्रकरणात काय घडतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मे महिन्यातही परब यांच्या विरोधात तक्रार

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नाशिकच्या निवृत्त RTO अधिकाऱ्याने परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात तक्रार केली.ज्यानंतर भाजप पुन्हा आक्रमक झाल्याचं पाहण्यास मिळालं होतं. Motar Vehicale Inspector म्हणून काम करणारे गजेंद्र पाटील यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यानंतर त्यांनी एक तक्रार दाखल केली. या तक्रारीत त्यांनी अनिल परब, आयुक्त ढाकणे यांच्यावर लाच घेतल्याचा आणि भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला. परिवहन विभागात बदल्यांसाठी लाच घेणाऱ्या Dep. RTO चंही नाव पाटील यांनी त्यांच्या तक्रारीत नोंदवलं. परिवहन विभागात बदली करण्यासाठी कोट्यवधी रूपये लाच म्हणून मागितले जातात असा गंभीर आरोप गजेंद्र पाटील यांनी केला होता. या घटनेनंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीची मागणी केली होती. नितेश राणे यांनीही अनिल परब यांचा उल्लेख Blue eyed boy असा केला होता आणि त्यांच्यावर टीका करत त्यांच्यासाठी वेगळा न्याय का असाही प्रश्न विचारला होता. दरम्यान हे सगळे आरोप अनिल परब यांनी फेटाळले आहेत.

रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परबांच्या अडचणीत वाढ? साई रिसॉर्ट बांधकाम प्रकरणाची चौकशी सुरु

मे आणि जून महिन्यात आलेल्या या दोन बातम्या अनिल परब चर्चेत येण्यासाठी पुरेशा ठरल्या असल्या तरीही अनिल परब हे भाजपच्या टार्गेटवर आत्तापासून नाहीत. तर मार्च महिन्यात पार पडलेल्या अधिवेशनापासून आहेत. हे सगळं का घडतंय भाजपने पद्धतशीरपणे हे सगळं का चालवलं आहे हे आपण जाणून घेऊ.

मार्च महिन्याच्या अधिवेशनाच्या आधी वन मंत्री संजय राठोड यांची विकेट पडली. पूजा चव्हाण या मुलीच्या आत्महत्येप्रकरणी त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर समोर आलं ते अँटेलिया प्रकरण. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अँटेलिया या मुकेश अंबानींच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली कार ठेवण्यात आली होती. सचिन वाझे प्रकरण सगळ्या महाराष्ट्राला कळलं. या सगळ्या प्रकरणात माजी गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुख यांचं नाव पुढे आलं. कारण परमबीर सिंग यांची बदली झाल्यानंतर त्यांनी जो तीन दिवसातच लेटर बॉम्ब टाकला त्यामध्ये त्यांनी अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले होते. पहिला आरोप होता तो म्हणजे पोलीस खात्यांच्या बदल्यांमध्ये अनिल परब ढवळाढवळ करतात. दुसरा आरोप होता तो म्हणजे अनिल देशमुख यांनी सचिन वाझे आणि त्यांच्या एका सहकाऱ्याला महिन्याला 100 कोटी रूपये वसूल करण्याचं टार्गेट दिलं होतं. अधिवेशनात आणि अधिवेशनानंतर या प्रकरणात आरोपांची राळच भाजपकडून उठवली गेली. त्यावेळी अनिल परब हे जेव्हा सभागृहात उत्तरं देत होते तेव्हा तर देवेंद्र फडणवीस यांनी हा देखील प्रश्न विचारला की महाराष्ट्राच्या गृहमंत्री पदी नेमकं कोण आहे अनिल देशमुख की अनिल परब? एप्रिल महिन्यात हे सगळं प्रकरण कोर्टात गेलं. कोर्टाने अनिल परब यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपांची दखल घेऊन हे प्रकरण प्राथमिक तपासासाठी सीबीआयकडे सोपवलं. ज्यानंतर अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला.

महाविकास आघाडी सरकारमधल्या दोन मंत्र्यांची विकेट गेल्यानंतर तिसरा नंबर आणखी एका मंत्र्याचा आहे आणि तो लवकरच लागणार आहे असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं. त्यांचा रोख अनिल परब यांच्याकडे होता तरीही त्यांनी तसं नाव घेतलं नाही. मात्र या वक्तव्यानंतर दोन ते तीन दिवसात समोर आलं ते मनसुख हिरेन आणि अँटेलिया प्रकरणात अटक असलेल्या सचिन वाझे यांचं. सचिन वाझे यांनी अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप करत एक पत्र न्यायालयाला लिहिलं होतं. ते NIA कोर्टाने स्वीकारलं नाही मात्र ते पत्र प्रसारमाध्यमांना मिळालं.

बाळासाहेब आणि माझ्या मुलींची शपथ घेऊन सांगतो वाझेने केलेले आरोप धादांत खोटे: अनिल परब

सचिन वाझेंच्या पत्रात काय?

पत्रात सचिन वाझेंनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब आणि दर्शन घोडावत यांच्यासह अजित पवारांची नावं घेतली आहेत. अजित पवारांचं नाव घेऊन दर्शन घोडावत यांनी आपल्याला कोट्यवधींची वसुली करण्यास सांगितल्याचं या पत्रात सचिन वाझेंनी म्हटलं आहे. तसंच अनिल देशमुख आणि अनिल परब या दोन्ही मंत्र्यांनीही आपल्याला कोट्यवधींच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचंही सचिन वाझे यांनी आपल्या कथित पत्रात म्हटलं आहे. ही घटना आहे 7 एप्रिलची अनिल देशमुख यांनी 5 एप्रिलला त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच चंद्रकांत पाटील यांनी एक प्रतिक्रिया दिली होती ज्यामध्ये त्यांनी हे म्हटलं होतं की आणखी एका मंत्र्याची विकेट पडणार.

अनिल परब यांचं स्पष्टीकरण

दरम्यान सचिन वाझेंचं पत्र समोर आल्यानंतर तातडीने पत्रकार परिषद बोलवून अनिल परब यांनी आपल्यावर झालेले सगळे आरोप धादांत खोटे आहेत असं सांगितलं. त्यासाठी त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आपल्या मुलींची शपथही घेतली होती. तसंच सगळे आरोप फेटाळून लावले होते.

सचिन वाझेंचं शिवसेनेशी असलेलं कनेक्शन, त्यानंतर संजय राठोड आणि अनिल देशमुख यांचे झालेले राजीनामे आणि आता अनिल परब यांना टार्गेट करत असलेलं भाजप या सगळ्या गोष्टींची साखळी एकमेकांशी जोडली तर सरकार मधल्या मंत्र्यांना बदनाम करून त्यांना राजीनामा द्यायला लावायचा आणि पर्यायाने उद्धव ठाकरेंना आव्हान द्यायचं असा भाजपचा मनसुबा दिसतो आहे. सचिन वाझे यांचा शिवसेनेशी घनिष्ठ संबंध आहे. हे कनेक्शनही भाजपनेच लक्षात आणून दिलं होतं. मार्च ते जून चारही महिन्यांमध्ये अनिल परब यांच्यावर विविध प्रकारचे आरोप झाले आहेत. जुलै महिन्यात अधिवेशन आहे त्याआधीही काही प्रकरणं बाहेर येण्याची शक्यता आहे.

अनिल परब हे बाळासाहेब ठाकरे यांचे लाडके नेते मानले जातात. त्यांचा कायद्याचा अभ्यास दांडगा आहे. नारायण राणे यांना शिवसेनेतून काढून टाकण्यात आल्यानंतर ष्णमुखानंद या ठिकाणी जी सभा बाळासाहेब ठाकरेंनी घेतली होती त्या सभेत त्यांनी अनिल परब यांच्या नावाचा विशेष उल्लेख केला होता. तसंच महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतरही अनिल परब हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचे आहेत हे समोर आलं होतं. एवढंच काय ज्यावेळी अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला त्यावेळी गृहमंत्रीपद मिळवण्यासाठी अनिल परबही इच्छुक होते अशाही चर्चा रंगल्या होत्या. आता अशा बाळासाहेब ठाकरे यांच्या लाडक्या आणि उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या असलेल्या अनिल परब यांना भाजपकडून टार्गेट केलं जातं आहे. पुढे आणखी काय काय घडतं आणि कशा वळणावर राज्य नेऊन ठेवतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp