शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक सरकारने ताब्यात घ्यावं अशी मागणी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन १७ नोव्हेंबरला होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक स्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जाणार आहेत. अशात बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक सरकारने ताब्यात घ्यावं अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली आहे.
ADVERTISEMENT
भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी काय म्हटलं आहे?
बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक हे महाराष्ट्राचं स्वाभिमान स्मारक आहे. माझ्या दृष्टीने तरी हेच नाव मी त्याला देऊ इच्छितो. महाराष्ट्राचं गौरव स्मारक ज्याला म्हणता येईल असं ते बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक आहे. ते स्मारक कुठल्याही वैयक्तिक खानदानाचं किंवा व्यक्तीचं नाही. ते राज्य सरकारचं स्मारक आहे. ती जमीन राज्य सरकारची आहे. त्याच्यावरचा निधी राज्य सरकार लावतो आहे. त्यामुळे मी मागणी करतो आहे की हे स्मारक राज्य सरकारने ताब्यात घेतलं पाहिजे. कौटुंबिक लोकांना त्यांचा आदर म्हणून समितीवर सदस्य म्हणून ठेवावं पण ते स्मारक राज्य सरकारने ताब्यात घेतलं पाहिजे.
बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक ताब्यात घेतलं पाहिजे अशी मागणी प्रसाद लाड यांनी का केली आहे?
बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक हे देशाला प्रेरणा देणारं आहे. बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व, त्यांचं कार्य या स्मारकाच्या माध्यमातून देशभरात पोहचलं पाहिजे. उद्धव ठाकरे काय विसरले? ते त्यांच्या सोयीनुसार विसरले असतील. मात्र बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक सरकारने निर्माण केलं आहे. भारतातल्या प्रत्येक हिंदूला हे स्मारक काय आहे ते कळलं पाहिजे म्हणून मी ही मागणी करतो आहे की सरकारने हे स्मारक ताब्यात घ्यावं असं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत यांना प्रसाद लाड यांचं उत्तर
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाला भेट द्यायची असेल तर खंजीर बाजूला ठेवून यावं असं संजय राऊत म्हणाले होते. या टीकेवरही प्रसाद लाड यांनी उत्तर दिलं आहे. प्रसाद लाड म्हणाले की या महाराष्ट्राचा इतिहास सांगतो की खंजीर कुणी कुणाच्या पाठीत खुपसला. देवेंद्र फडणवीस यांनीही हे सांगितलं आहे. मला वाटतं आहे की संजय राऊत यांनी आधी जाऊन उद्धव ठाकरेंना सांगावं की तुमचा खंजीर बाजूला ठेवा. खंजीर एकनाथ शिंदे यांनी खुपसला नाही ते मर्दासारखे लढले आहेत. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला. एकनाथ शिंदे यांनी गद्दारांना त्यांची जागा दाखवली असं म्हणत प्रसाद लाड यांनी संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT