Corona चे रूग्ण देशभरात झपाट्याने वाढत आहेत. कोरोनाची दुसरी लाट भारतात आली आहे. डिसेंबर-जानेवारी महिन्यात हे प्रमाण बरचंसं कमी झालं होतं मात्र फेब्रुवारीचा मध्य, मार्च आणि एप्रिल महिन्यात हे प्रमाण चांगलंच वाढलं आहे. याबाबत CSIR चे DG शेखर मांडे यांनी त्यांची भूमिका सविस्तरपणे मांडली.
ADVERTISEMENT
CSIR चे DG शेखर मांडे म्हणतात..
कोरोना वाढण्याची अनेक कारणं असू शकतात. सप्टेंबर 2020 या महिन्यानंतर पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या कमी होऊ लागली होती. त्यावेळीही दसरा, दिवाळी हे सण साजरे झाले होते. त्यामुळे आत्ताच सण उत्सवांमुळेच कोरोना वाढतो आहे असं म्हणता येणार नाही. कोरोना देशभरात पसरण्याची अनेक कारणं आहेत.
1) लोकांचा निष्काळजीपणा : कोरोना रूग्णांचं प्रमाण कमी झालं आणि लॉकडाऊनचे निर्बंध शिथील होऊ लागले तसा लोकांमध्ये निष्काळजीपणा वाढू लागला. लोकांनी कोरोना प्रतिबंधाची जी काळजी कोरोनाच्या काळात घेतली होती तशी ती नंतर घेतली नाही. मास्क न घालणे, गर्दी करणे या गोष्टी केल्या त्यामुळे कोरोनाचा फैलाव झाला.
2) व्हेटिंलेशन म्हणजेच मोकळाढाकळा सूर्यप्रकाश येणं किंवा जागेमध्ये हवा खेळती असणं या गोष्टी जिथे नाहीत तिथेही कोरोनाचा फैलाव झाला. मोकळ्या हवेत कोरोना बंदिस्त जागांच्या तुलनेत कमी प्रमाणात पसरतो. लोकांनी पार्टीज वगैरे सुरू केल्या असतील म्हणजे लग्नानंतरची पार्टी असेल किंवा इतर काही समारंभ असतील या जर बंदिस्त जागेत घेण्यात आल्यानेही कोरोनाचा फैलाव झाला
3) कोरोना प्रतिबंधाचे महत्त्वाचे दोन नियम आहे एक तर सोशल डिस्टन्सिंग आणि दुसरं म्हणजे मास्क लावणं या दोन सवयींकडे लोकांनी सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचं दिसून आलं. बिहारमध्येही निवडणूक पार पडली होती.. मात्र त्यावेळी एवढी रूग्णसंख्या वाढली नव्हती. चाचण्या कमी झाल्याने कोरोना काही ठिकाणी वाढलाच नाही असं म्हणणं योग्य ठरणार नाही. चाचण्या बऱ्या प्रमाणात सुरू आहेत.
4) व्हायरसमध्ये आलेलं म्युटेशन हेदेखील एक महत्त्वाचं कारण आहे. कधी कधी असे म्युटेशन असतात की जे वेगाने पसरतात. युकेमध्ये जो व्हेरिएंट आहे ज्याला आपण V117 म्हणतो तो कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरवतो. डबल म्युटंटची चर्चा आज घडीला चांगलीच सुरू आहे. मात्र त्यामध्ये कोरोना वेगाने पसरतो की नाही हे आपल्याला अद्याप समजायचं आहे. मात्र याबाबत तज्ज्ञ अभ्यास करत आहेत.
आरोग्य सेतू अॅपही महत्त्वाचं
आरोग्य सेतू हे अॅप आज घडीलाही महत्त्वाचं आहे. माझ्या ऑफिसच्या शेजारी एकजण पॉझिटिव्ह आला. ज्यानंतर माझ्या आरोग्य सेतू अॅपवर मला तातडीने त्यासंदर्भातली माहिती मिळाली. दोन लोक हाय रिस्क आहेत असंही माझ्या अॅपवर आलं त्यानंतर आम्ही त्या दोघांनीही क्वारंटाईन केलं. काँटॅक्ट ट्रेसिंगसाठी हे महत्वाचं आहे लोकांनी ते अॅप अजूनही डाऊनलोड केलं नसेल तर ते करावं आणि त्यातून माहिती घ्यावी.
देशात ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागल्यानंतर देहरादून या ठिकाणी त्यांनी हवेतून ऑक्सिजन निर्मिती सुरू केली आहे. त्यासाठीची संमतीही आम्हाला मिळाली आहे असंही शेखर मांडे यांनी सांगितलं. जर ऑक्सिजनची कमतरता भासत असेल तर आमच्याशी संपर्क साधावा असंही आवाहन त्यांनी केलं आहे.
मुंबईसह महाराष्ट्रात कर्फ्यू लागला आहे तर दिल्लीत वीक एन्ड कर्फ्यू लागला आहे. राज्यांशी आमची चर्चा सुरू आहे. महाराष्ट्र सरकारच्या अधिकाऱ्यांशीही आमची चर्चा सुरू आहे असंही शेखर मांडे यांनी सांगितलं आहे.
ADVERTISEMENT