भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी वीर सावरकरांबाबत एक वक्तव्य केलं. ज्यामध्ये ते असं म्हणाले की वीर सावरकरांनी महात्मा गांधी यांच्या सांगण्यावरूनच ब्रिटिश सरकारकडे दया याचिका केली होती. राजनाथ सिंह यांनी केलेल्या वक्तव्यानंतर नवा वाद निर्माण झाला आहे.
ADVERTISEMENT
या प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांनीही भाजपवर टीका केली आहे. वीर सावरकर यांनी कधीच माफी मागितली नव्हती ही आमची भूमिका होती. भाजपही आमच्यासोबत होता मात्र आता भाजपच्या नेत्यांनीच हे मान्य केलं आहे की वीर सावरकरांनी माफी मागितली होती. वीर सावरकरांना बदनाम करण्यासाठी हे सगळं सुरू आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. अशात आता इंदिरा गांधी यांनी वीर सावरकरांविषयी लिहिलेलं एक पत्र व्हायरल होतं आहे.
भारताच्या दिवंगत पंतप्रधान यांनी काय म्हटलं होतं पत्रात?
इंदिरा गांधींनी 1980 मध्ये सावरकरांची स्तुती केली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर नॅशनल मेमोरियल सोसायटीचे सचिव पंडित बखले यांना लिहिलेल्या पत्रात इंदिरा गांधींनी सावरकरांच्या जन्मशताब्दीच्या योजना यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. त्याच वेळी, त्यांनी सावरकरांचे फक्त भारताचे प्रतिष्ठीत पुत्र म्हणून वर्णन केले नाही तर ब्रिटिश सरकारशी त्यांच्या निर्भय संघर्षाचे स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासात स्वतःचे महत्त्वाचे स्थान आहे, असेही म्हटले होते. सावरकरांवर ‘द ट्रू स्टोरी ऑफ फादर ऑफ हिंदुत्वा’ हे पुस्तक लिहिणारे लेखक वैभव पुरंदरे यांनीही काही वर्षांपूर्वी या पत्राच्या विश्वासार्हतेची पुष्टी केली होती.
राहुल गांधी काय म्हणाले होते वीर सावरकरांबाबत?
मेरा नाम राहुल सावरकर नहीं है.. मेरा नाम राहुल गांधी है.. असं म्हणत 2019 मध्ये राहुल गांधी यांनी वीर सावरकरांवर टीका केली होती. तसंच काँग्रेसचा माणूस कधीही कुणालाही घाबरत नाही असंही ते म्हणाले होते. तेव्हा देखील इंदिरा गांधी यांनी लिहिलेलं हे पत्र चांगलंच व्हायरल झालं होतं. आता पुन्हा एकदा हे पत्र व्हायरल झालं आहे.
वीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर काय म्हणाले?
भारतासारखा देशाला एक राष्ट्रपिता असू शकत नाही. देशाच्या निर्मितीसाठी हातभार लावणारे हजारो लोक असतील, जे आता विस्मृतीत गेले असतील. या देशाला पाच हजार वर्षांपेक्षा जास्त मोठा इतिहास आहे. त्यामुळ एक कुठलीही व्यक्ती देशाची राष्ट्रपिता होऊ शकत नाही. मला असं वाटत नाही की महात्मा गांधी राष्ट्रपिता आहे. मला राष्ट्रपिता ही संकल्पनाच मान्य नाही. आपला देश 40-50 वर्षे जुना नाही. आपल्या देशाला पाच हजार वर्षांची संस्कृती आहे. मला राष्ट्रपिता ही संकल्पनाच मान्य नाही. त्यामुळे सावरकरांना राष्ट्रपिता करण्याचा मुद्दाच उपस्थित नाही असंही रणजीत सावरकर यांनी म्हटलं आहे.’ ANI ला दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी हे रोखठोक भाष्य केलं.
राजनाथ सिंह नेमकं काय म्हणाले
‘सावरकरांनी ब्रिटिश सरकारपुढे अनेक दया याचिका दाखल केल्या हे सातत्याने सांगितले जाते. पण सावरकरांनी सुटकेसाठी याचिका दाखल केल्या नाहीत. पण साधारणपणे कैद्याला दया याचिका दाखल करण्याचा अधिकार असतो. तुम्ही दया याचिका दाखल करा, असे महात्मा गांधी म्हणाले होते. गांधीजींच्या या सूचनेनंतरच त्यांनी दया याचिका दाखल केली होती. त्यावेळी महात्मा गांधींनी सावरकरांना ब्रिटिशांना सोडून द्यावं असं आवाहनही केलं होतं. तेव्हा गांधीजींनी असंही म्हटलं होतं की, ज्याप्रकारे आम्ही शांततेने स्वातंत्र्याची चळवळ चालवत आहोत तशाच पद्धतीने सावरकर देखील स्वातंत्र्य चळवळ सुरु ठेवतील. पण त्यांना असं बदनाम केलं जातं की, सावरकरांनी दया याचिका दाखल केली होती, क्षमायाचना केलेली किंवा आपल्या सुटकेची मागणी केली होती.’
काय म्हणाले मोहन भागवत?
दरम्यान, याच कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत हे देखील उपस्थित होते. त्यांनीही सावरकरांच्या टीकाकारांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, ‘सावरकर मुस्लिमांचे शत्रू नव्हते. त्यांनी उर्दू भाषेत अनेक गझल लिहिल्या होत्या. त्याचवेळी भागवत यांनी फाळणीच्या वेळी पाकिस्तानात जाणाऱ्या मुस्लिमांविषयी सावरकरांनी विचार मांडले होते.’ असं मोहन भागवत यावेळी म्हणाले होते.
दरम्यान या सगळ्यावरून वाद निर्माण झालेला असतानाच आता इंदिरा गांधी यांनी लिहिलेलं पत्रही व्हायरल झालं आहे. या पत्रात इंदिरा गांधी यांनी वीर सावरकर यांची स्तुती केली आहे.
ADVERTISEMENT