राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दोन दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं होतं. त्यात ते म्हणाले होते की प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधण्याची गरज नाही. त्यांच्या या वक्तव्याची चांगलीच चर्चा झाली होती. अशात आता एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी मोहन भागवत यांच्या या वक्तव्याला उत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाले ओवेसी?
मोहन भागवत यांचं वक्तव्य प्रक्षोभक आणि दुर्लक्षित केलं जाऊ नये. एखादी गोष्ट लोकप्रिय नसते तेव्हा त्यापासून स्वतःला दूर सारायचं आणि ती लोकप्रिय झाल्यावर स्वीकारयची आणि संघाचा जुना डाव आहे.
बाबरी मशिदीच्या आंदोलनातही आधी आम्ही सर्वोच्च न्यायालयाचं पालन करू असं संघाने म्हटलं होतं. ही आठवण ओवेसी यांनी करून दिली. तसंच कोणत्याही संवैधानिक पदावर नसणाऱ्या मोहन भागवत आणि जे. पी. नड्डांसाख्या व्यक्तींऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपली भूमिका स्पष्ट करावी आणि १९९१ च्या धर्मस्थळांच्या संदर्भातल्या कायद्याच्या आधारे स्पष्ट संदेश द्यावा अशी मागणी ओवेसी यांनी केली आहे.
भारतात इस्लाम धर्म व्यापारी आणि बुद्धिजिवींमुळे आला आहे. हे सगळे इस्लाम धर्म मुस्लिमांनी या भूमिवर आक्रमणांच्या फार पूर्वीच घेऊन आले होते. आजच्या मुस्लिमांचे पूर्वज कुठून आलेत हे फारसं महत्त्वाचं नाही. जरी त्यांचे पूर्वज हिंदू असले तरी भारतीय संविधानानुसार हे भारतीयच आहेत. भागवत यांच्या पूर्वजांनी बळजबरीमुळे बौद्ध धर्मामधून धर्मांतर केलं असं कुणी म्हणू लागलं तर ते काय उत्तर देणार? असाही सवाल ओवेसी यांनी विचारलं आहे.
तिरंगा हा आपला राष्ट्रवाद आहे याचा ठाकरे सरकारला विसर पडला आहे का?-ओवेसी
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत ओवेसी म्हणाले की विश्व हिंदू परिषदेच्या स्थापने आधी अयोध्येचा मुद्दा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अजेंड्यावर नव्हता. १९८९ च्या पालनपूरमधल्या ठरावानंतर अयोध्या हा संघाच्या अजेंड्याचा भाग झाला. संघाने राजकीय विषयावर एकाचवेळी दोन वेगवेगळ्या भूमिका घेण्यात प्रावीण्य मिळवलं आहे. काशी, मथुरा, कुतूबमिनार यासंदर्भातले विषयांवर बोलणाऱ्या सगळ्या विदूषकांचा थेट संबंध संघाशी आहे असाही दावा ओवेसी यांनी केला आहे.
संघाचे गुंड हे आता मोहन भागवत यांचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचंही ऐकत नाहीत. दोघांनीही मॉब लिचिंगचा विरोध दर्शवला होता, मात्र पुढे काय झालं? हे प्रकार थांबले नाही उलट रामनवमीच्या दिवशी काय घडलं ते देशाने पाहिलं आहे. याचा अर्थ हे पुढेही घडणार आहे. विरोध दर्शवणं हे ढोंग आहे असाही आरोप ओवेसी यांनी केला.
मोहन भागवत यांनी काय म्हटलं होतं?
प्रभू रामचंद्रांचं मंदिर उभं राहावं यासाठी जे आंदोलन उभं राहिलं त्यात संघ होताच, आम्ही ती बाब नाकारलेली नाही. मात्र त्यावेळी संघाने आपली मूळ वृत्ती बाजूला ठेवत त्या आंदोलनात हिस्सा घेतला होता. आता भविष्यात संघ कुठल्याही आंदोलनाचा भाग असणार नाही. इतिहास कधी बदलता येत नाही. ज्ञानवापीचा आपला मुद्दा आहे, तो हिंदू मुस्लिमांशी जोडणं योग्य होणार नाही.
मुस्लिम राज्यकर्ते हे बाहेरून आले होते. प्रत्येक मंदिरात शिवलिंग शोधण्याची गरज नाही. काही गोष्टी या श्रद्धास्थान असू शकतात. पण प्रत्येक मुद्द्यावर लढाई करणं, वाद वाढवणं योग्य नाही. देशातल्या कुठल्याही दोन समुदायांमध्ये लढाई होणं, वाद होणं योग्य नाही. भारत विश्वगुरू कसा होईल याकडे आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि जगाला शांततेचा संदेश द्यायला हवा.
ADVERTISEMENT