राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात नाशिकमधील निवृत्त RTO अधिकाऱ्याने केलेल्या तक्रारीनंतर राज्यातलं राजकारण तापायला लागलं आहे. विरोधी पक्षात असलेल्या भाजपने आपला मोर्चा आता अनिल परबांकडे वळवला असून मातोश्रीवरच्या खास माणसासाठी वेगळे नियम का लावले जात आहेत असा सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी विचारला आहे.
ADVERTISEMENT
संजय राठोडांना जर राजीनामा द्यायला लागत असेल तर मातोश्रीवरच्या खास माणसासाठी वेगळा नियम का? कॅबिनेट मंत्र्यांविरुद्ध स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी कशी होऊ शकते? या प्रकरणाचा तपास सीबीआयने करावा अशी मागणी राणे यांनी केली आहे. निल परब, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे आणि इतर काही कर्मचारी परिवहन विभागात होणाऱ्या भ्रष्टाचारात सहभागी असल्याची तक्रार गजेंद्र पाटील या निलंबीत अधिकाऱ्याने केली आहे.
Motar Vehicale Inspector म्हणून काम करणारे गजेंद्र पाटील यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर जानेवारी महिन्यापासून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. गजेंद्र पाटील यांनी आपल्या तक्रारीत परिवहन मंत्री अनिल परब, आयुक्त ढाकणे यांच्यावर लाच घेतल्याचा आणि भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. परिवहन विभागात बदल्यांसाठी लाच घेणाऱ्या Deputy RTO चं नावही पाटील यांनी आपल्या तक्रारीमध्ये नमूद केलं आहे. हा अधिकारीच या सर्व रॅकेटचा मुख्य सूत्रधार असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे.
परिवहन विभागात बदली करण्यासाठी कोट्यवधी रुपये लाच म्हणून मागितले जातात. अविनाश ढाकणे यांची परिवहन आयुक्तपदावर नेमणुक करण्यासाठी तक्रार अर्जात नाव नमूद केलेल्या मुख्य सुत्रधाराने पाच कोटींची लाच परिवहन मंत्री अनिल परब यांना दिली होती. याव्यतिरीक्त पाटील यांनी आपल्या तक्रार अर्जात दोन जिल्ह्यांमधील RTO अधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत. चेकपोस्ट हे RTO अधिकाऱ्यांसाठी भ्रष्टाचाराचं महत्वाचं कुरण बनल्याचंही पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, अनिल परब यांनी ट्विट करत आपल्यावरील आरोप चुकीचे आणि निराधार असून सुडबुद्धीने माझ्याविरोधात खोटे आरोप करुन माझी व महाविकास आघाडी सरकारची बदनामी करण्याचे षडयंत्र आखले जात असल्याचं अनिल परब यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणलं आहे.
ADVERTISEMENT