चहा बनवून देण्यास पत्नीने नकार दिल्याने एका महिलेच्या पतीने तिच्या डोक्यात हातोडा घालून तिचा खून केला. या प्रकरणात आरोपी असलेल्या पतीला मुंबई उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. पत्नी ही पुरूषाची मालमत्ता किंवा मालकीची वस्तू नाही असं म्हणत पतीला कोर्टाने चांगलंच झापलं आहे. एवढंच नाही तर त्याने केलेला अर्ज हायकोर्टाने फेटाळूनही लावला आहे.
ADVERTISEMENT
काय आहे हे प्रकरण?
२०१३ मध्ये पंढरपूरमध्ये राहणाऱ्या एका माणसाने त्याच्या पत्नीने चहा बनवून दिला नाही या रागातून पत्नीची डोक्यात हातोडा घालून हत्या केली. ज्यानंतर पंढरपूरच्या या माणसावर पत्नीच्या हत्येप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. जुलै २०१६ मध्ये या प्रकरणात त्याला दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. या विरोधात आरोपीने अपील दाखल केलं होतं. हे अपील फेटाळून लावत असतानाच न्यायमूर्ती रेवती मोहिते यांनी त्याला झापलं आहे. ट्रायल कोर्टाने या प्रकरणातली मुलीची साक्ष गृहीत धरलेली नाही. तसंच पोलिसांनी छोट्या पुराव्यांच्या आधारे गुन्हा नोंदवला आहे असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला होता. मात्र या आरोपीला दिलासा देण्यास नकार देऊन कोर्टाने त्याला तिखट शब्दांमध्ये सुनावले आहे.
डिसेंबर २०१३ मध्ये आरोपीने त्याच्या पत्नीकडे चहा मागितला. मी बाहेर जाते आहे त्यामुळे चहा बनवू शकत नाही असं या आरोपीची पत्नी म्हणाली. पत्नीचे बाहेर प्रेम प्रकरण सुरु असल्याचा संशय बळावल्याने दोघांमध्ये खटके उडाले आणि मग रागाच्या भरात मुलीसमोरच आरोपीने पत्नीच्या डोक्यात हातोडा घातला. तिला जखमी अवस्थेत सोलापूर रूग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने तिचा त्यात मृत्यू झाला.
ADVERTISEMENT