महाराष्ट्रात झालेला सत्तासंघर्ष सगळ्या महाराष्ट्राने अनुभवला. महाविकास आघाडीची निर्मितीही महाराष्ट्राने पाहिली आणि दोन महिन्यापूर्वी झालेलं एकनाथ शिंदे यांचं बंड त्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळणं तसंच एकनाथ शिंदे आणि भाजप यांचं सरकार आलेलंही राज्याने पाहिलं. शिवसेना दुभंगली आहे. शिवसेनेत दोन गट पडले आहेत. एक गट आहे उद्धव ठाकरे गट दुसरा आहे एकनाथ शिंदेंचा गट. या सगळ्यात आता अशाही चर्चा सुरू झाल्या आहेत की एकनाथ शिंदे शिवसेना प्रमुख होणार का? कारण ते पक्षावरही दावा सांगू शकतात अशी चर्चा सुरू झाली आहे. याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एक उदाहरण देत भाष्य केलं आहे.
ADVERTISEMENT
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुंबईत आज एक मेळावा पार पडला. यामध्ये त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसंच आपण किती आंदोलनं उभी केली आणि ती कशी पूर्णत्वास नेली हेदेखील सांगितलं. मात्र चर्चा होते आहे ती त्यांनी दिलेल्या पेशव्यांच्या उदाहरणाची
नेमकं काय म्हणाले आहेत राज ठाकरे पेशव्यांचं उदाहरण देत?
वारसा कुठला असतो तर तो वास्तूचा नसतो तो विचारांचा असतो. कोण कुठल्या वास्तूमध्ये आहे त्यावरून वारसा ठरत नाही. वारसा विचारांचा पुढे घेऊन जावा लागतो. आमच्या शिवछत्रपतींनी जो विचार दिला तो पेशव्यांनी अटोक किल्ल्यापर्यंत नेला. अटोक किल्ला आत्ता पाकिस्तानात आहे. महाराजांचा विचार पोहचवला कुणी? पेशव्यांनी. पण यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली होती? पेशव्यांच्या हातामध्ये संपूर्ण सत्ता होती. या पेशव्यांनी कधीही स्वतःला छत्रपती नाही म्हणवून घेतलं. छत्रपती तेच, आम्ही त्यांचे नोकर असं त्यांचं म्हणणं होतं. छत्रपती तेच, गादी तीच फक्त त्यांचा विचार पोहचवतो आहोत.
माझ्या आजोबांचा आणि माननीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेतोय
माझ्या आजोबांचा, माननीय बाळासाहेबांचा जो विचार आहे तो विचार मला पुढे न्यायचा आहे. माझ्याकडे निशाणी असली काय आणि नसली काय? मला काही फरक पडत नाही. माझ्याकडे विचार आहेत. सगळ्यात मौल्यवान गोष्ट आहे माझ्याकडे ती म्हणजे हे विचार. बाकीचं सगळं सोडा पण विचारांच्या बाबतीत मी श्रीमंत आहे. या महाराष्ट्रात ज्या लोकांनी, ज्या महापुरूषांनी जे विचार पेरले ते ऐकणं, बोध घेणं ही गोष्ट प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्याविषयीचं सूचक भाष्य कसं?
एकनाथ शिंदे हे आता शिवसेनेवर दावा सांगतील अशीही चर्चा आहे. कोर्टातली लढाई नेमकी कोणत्या दिशेला जाते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र धनुष्यबाण या शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर एकनाथ शिंदे हे संख्याबळाच्या जोरावर दावा करू शकतात. असं झालं आणि ही गोष्ट जर निवडणूक आयोगाकडे गेली तर हे चिन्ह गोठवलंही जाऊ शकतं. एकनाथ शिंदे यांनी सातत्याने हे म्हणणं की आम्ही सगळे बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे घेऊन जात आहोत. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना पुढे घेऊन जात आहोत त्यातून एकनाथ शिंदेंनाही हेच सुचवायचं आहे की ते बाळासाहेबांचा विचार पुढे नेत आहेत. अशात राज ठाकरेंनी नेमकं याच बाबत भाष्य करणं आणि निशाणी असली काय आणि नसली काय? हे म्हणणं हे एकनाथ शिंदेबाबतचं केलेलं सूचक वक्तव्य आहे. कुठेतरी त्यांना हेच सुचवायचं आहे की विचार पुढे नेत असाल तर चिन्हाची पर्वा करू नका.
उद्धव ठाकरेंना पर्याय म्हणून राज ठाकरे स्वतःला पुढे करत आहेत का?
महाराष्ट्रात जे राजकीय बंड झालं त्यानंतर राज ठाकरेंनी एक ट्विट केलं होतं. स्वतःच्या नशिबालाच जो माणूस स्वतःचं कर्तृत्व समजतो त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरू होतो. असं ट्विट राज ठाकरेंनी केलं होतं. हे ट्विट अर्थातच उद्धव ठाकरेंना उद्देशून होतं. अशात आज झालेल्या भाषणात राज ठाकरेंनी मी प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पुढे घेऊन जातो आहे असं म्हटलं आहे त्यासाठी मला निशाणीचीही गरज नसल्याचंही ते म्हणाले आहेत. ज्यामुळे जी काही अवस्था सध्या शिवसेनेची झाली आहे त्यात उद्धव ठाकरे यांच्या ऐवजी राज ठाकरे हे स्वतः पर्याय म्हणून उभे राहात आहेत का? अशाही चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
ADVERTISEMENT