महाराष्ट्र राज्याच्या महिला आणि बालकल्याण विभागात ८०० कोटींचा घोटाळा झाल्याची तक्रार खासदार नवनीत राणा यांनी थेट केंद्रीय महिला बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे केली. यानंतर राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह आहेत. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणांवर मानहानीचा दावा ठोकणार असल्याचं सांगितलं.
ADVERTISEMENT
“खासदार नवनीत राणा नेहमीच वायफळ बोलतात त्यांना ती सवय आहे. आपण त्यांच्याविरोधात मानहानीचा दावा ठोकणार आहोत”, अशी माहिती यशोमती ठाकूरांनी बुलढाण्यात दिली आहे. शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानचे अध्यक्ष शिवशंकर पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या परिवाराची भेट घेण्यासाठी यशोमती ठाकूर बुलढाण्यात आल्या होत्या.
नवनीत राणांनी स्मृती इराणीला दिलेल्या तक्रारीत काय म्हटलं होतं?
महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे आदिवासी शिशुंना शासनातर्फे देण्यात येणारा पौष्टिक आहार व अन्य आवश्यक वस्तू मिळाल्या नाहीत. त्यामुळे गेल्या दोन ते तीन महिन्यात मेळघाटात ४९ नवजात शिशुंचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला होता.
उच्च न्यायालयाने काळ्या यादीत टाकलेल्या व महिला बालकल्याण विभागात पुरवठा किंवा कंत्राट घेण्यास मनाई केलेल्या समृद्धी व व्यंकटेश या कंपन्यांना पळवाट शोधून कोर्टाच्या आदेशाची अवहेलना करून पुरवठा करण्याचे काम देण्यात आलं. यशोमती ठाकूरांच्या जिल्ह्यातच इतक्या बालकांचा कुपोषणाने मृत्यू होणे ही गोष्ट अत्यंत खेदजनक व लाजिरवाणी आहे.
या पुरवठा कंत्राटात प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. या प्रकरणात पालकमंत्री यशोमती ठाकूर या प्रथमदर्शनी दोषी आहेत. तसेच या योजनेत केंद्र शासन आणि राज्य शासन यांचा प्रत्येकी ५० टक्के रकमेचा निधी समाविष्ट असतो. त्यामुळे एक प्रकारे ही केंद्र शासनाची फसवणूक असून यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी जातीने लक्ष घालावे व या महाघोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोरपणे कार्यवाही करावी अशी मागणी राणा यांनी यावेळी केली होती.
ADVERTISEMENT