मुंबई: २२ वर्षीय टिकटॉक स्टार पूजा चव्हाण हिच्या आत्महत्याप्रकरणात नाव आलेले वनमंत्री संजय राठोड राजीनामा देणार का? यावरुन पुन्हा चर्चांना उधाण आलेलं आहे. १ मार्चपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशनात विरोधीपक्षात असलेला भाजप सरकारला पूजा राठोड आत्महत्या प्रकरणावरुन घेरत संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी दबाव टाकण्याची शक्यता आहे. शिवसेनेतला एक गटही राठोड यांच्याविरोधात नाराज आहे, त्यामुळे राजीनामा न घेतल्यास विरोधी पक्ष सरकारला घेरण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
अवश्य वाचा – अरूण राठोडने दिलेला तो नंबर कुणाचा? चित्रा वाघ यांचा सवाल
शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना नेत्यांची वर्षा निवासस्थानावर बैठक पार पडली. या बैठकीला एकनाथ शिंदे, अनिल परब यांच्यासह महत्वाचे शिवसेना नेते हजर होते. या बैठकीत संजय राठोड यांचा राजीनामा घेतला जाईल असा अंदाज बांधला जात होता. परंतू इकडे संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यासाठी दबाव वाढवला जात आहे. शनिवारी भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येऊन राठोड यांच्याविरोधात निदर्शनंही केली. अशा परिस्थितीत अधिवेशनात विरोधी पक्षाला वरचढ होऊ न देण्यासाठी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राठोड यांचा राजीनामा घेऊन डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंकडून केला जाईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
अवश्य वाचा – उद्धव ठाकरे ‘सत्यवादी’, Pooja Chavan ला न्याय मिळणारच-संजय राऊत
७ फेब्रुवारीला पुण्यात पूजा चव्हाणने आत्महत्या केली. या प्रकरणात पूजा चव्हाणच्या काही ऑडीओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या. या ऑडीओ क्लिपमध्ये एक आवाज हा संजय राठोड यांच्याशी मिळताजुळता असल्याच्या चर्चेला सुरुवात झाली. त्यातच संजय राठोड आणि पूजा चव्हाण यांचे एकत्र फोटो समोर आल्यानंतर विरोधकांनीही महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली. संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाही जवळपास १५ दिवस राठोड लोकांसमोर आले नव्हते.
काही दिवसांपूर्वी बंजारा समाजाचं देवस्थान असलेल्या पोहरादेवी संस्थानाच्या एका कार्यक्रमात संजय राठोड यांनी सपत्नीक हजेरी लावली होती. यावेळी संजय राठोड यांना पाठिंबा देण्यासाठी हजारो समर्थक पोहरादेवी संस्थानाच्या परिसरात हजर होते. एक दिवस आधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना राज्यात कोरोनाच्या केसेस वाढत असून घराबाहेर पडताना लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचं भान पाळावं असं आवाहन केलं होतं. तसेच राजकीय व धार्मिक कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली होती. परंतू राठोड यांनीच मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला हरताळ फासत पोहरादेवी गडावर शक्तीप्रदर्शन करुन हजारोंचा जमाव गोळा केल्यामुळे राज्य सरकार तोंडघशी पडलं होतं. त्यामुळे राठोडांबद्दल महाविकासआघाडी सरकार नेमकं काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT