कट्टर विरोधी असलेला CPI ही शिवसेनेसोबत आल्याने उद्धव ठाकरेंना कसा फायदा होणार?

मुंबई तक

• 03:27 PM • 13 Oct 2022

शिंदेंच्या बंडानं ठाकरे ब्रँडला मोठा झटका बसला. डोळ्यादेखत ठाकरेंचे विश्वासू लोक शिंदे गोटात गेले. सत्ता नाही आणि बोटावर मोजण्याइतकेच आमदार, खासदार सोबत असताना ठाकरेंना पहिल्या लिटमस टेस्टला सामोरं जावं लागणार आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत ही लिटमस टेस्ट होणार आहे. उद्धव ठाकरेंच्या साथीला CPI उमेदवार कोण यावरून घोळ सुरू असतानाच मातोश्रीची पॉवर वाढलीय. ५० वर्षांपूर्वी पोटनिवडणुकीनेच शिवसेना […]

Mumbaitak
follow google news

शिंदेंच्या बंडानं ठाकरे ब्रँडला मोठा झटका बसला. डोळ्यादेखत ठाकरेंचे विश्वासू लोक शिंदे गोटात गेले. सत्ता नाही आणि बोटावर मोजण्याइतकेच आमदार, खासदार सोबत असताना ठाकरेंना पहिल्या लिटमस टेस्टला सामोरं जावं लागणार आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत ही लिटमस टेस्ट होणार आहे.

हे वाचलं का?

उद्धव ठाकरेंच्या साथीला CPI

उमेदवार कोण यावरून घोळ सुरू असतानाच मातोश्रीची पॉवर वाढलीय. ५० वर्षांपूर्वी पोटनिवडणुकीनेच शिवसेना नावाचा इतिहास घडला. पण आता हेच दोन कट्टर प्रतिस्पर्धी अंधेरी निवडणुकीनं एकत्र आणलेत. शिंदेंच्या बंडानं अडचणींच्या कात्रीत सापडलेल्या ठाकरेंसाठी हा पाठिंबा टॉनिक ठरेल का, या पाठिंब्याचा अर्थ काय? हे आपण जाणून घेणार आहोत.

अंधेरी पोटनिवडणूक लिटमस टेस्ट

शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या अकाली निधनामुळे मुंबईतील अंधेरी पूर्व मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झालीय. शिंदे बंडानंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातल्या सेनेसाठी ही पहिली लिटमस टेस्ट असल्याचं मानलं जातंय. पण पहिल्या अग्निपरीक्षेला सामोरं जाताना ठाकरे चहुबाजूंनी अडचणी सापडलेत. बीएमसीमध्ये कार्यरत लटकेंच्या पत्नी ऋतुजा लटकेंना उमेदवारी जाहीर केली. पण त्यांचा राजीनामाच मंजूर होताना दिसत नव्हता. प्रकरण हायकोर्टात गेलं होतं. हायकोर्टाने लटकेंचा राजीनामा मंजूर करण्याचा आदेश दिलाय. हा दिलासा मिळालेला असतानाच ठाकरेंसाठी आणखी एक दिलासादायक गोष्ट घडली आहे.

ठाकरेंसाठी सीपीआयचा पाठिंबा मिळणं मोठी गोष्ट

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीनं ठाकरेंना बिनशर्त पाठिंबा दिलाय. एवढंच नाही, तर आता गेल्या ५० वर्षांपासून शिवसेनेशी हाडवैर असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पार्टीनंही ठाकरेंना पाठिंबा जाहीर केलाय. भाकपचे मुंबई सचिव मिलिंद रानडे, कॉ. प्रकाश रेड्डी, प्रकाश नार्वेकर, बाबा सावंत, विजय दळवी आणि बबली रावत यांनी बुधवारी मातोश्रीवर ठाकरेंची भेट घेतली. मुंबईत आता डाव्या पक्षांचा तेवढा प्रभाव नाही. पण ठाकरेंसाठी हा पाठिंबा मनोबल वाढवणारा असल्याचं म्हटलं जातंय. कारण याला पन्नास वर्षांपूर्वीच्या अशाच एका पोटनिवडणुकीचा इतिहास आहे.

काय घडलं होतं ५० वर्षांपूर्वी?

तर त्याचं झालं, असं होतं, की जवळपास ५० वर्षांपूर्वी १९७० मध्ये मुंबईत लालबाग परळच्या आमदाराची हत्या झाली. कॉम्रेड कृष्णा देसाई असं या आमदाराचं नाव. या हत्याकांडाचा उल्लेख आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासातली पहिली राजकीय हत्या असा केला जातो. आणि ही हत्या शिवसैनिकांनी केल्याचा आरोप झाला. या हत्याकांडानंतर लालबाग परळमध्ये पोटनिवडणूक झाली. कम्युनिस्टांचा तेव्हा मुंबईच्या समाजकारण, राजकारणात मोठा दरारा, दबदबा होता. पण मिल कामगारांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेनं आपल्या इतिहासातला पहिला विजय मिळवला. वामनराव महाडिक आमदार झाले. कम्युनिस्ट आणि शिवसेना हाडवैरी म्हणून ओळखले जाऊ लागले. आणि इथूनच पुढे मुंबईच्या राजकारणात शिवसेना नावाचं चॅप्टर सुरू झालं. आता पन्नास वर्षांनी हे दोन कट्टर विरोधक एकत्र आलेत आणि तेही पोटनिवडणुकीच्या निमित्तानं. पोटनिवडणूक ते पोटनिवडणूक असं एक चक्र पूर्ण झालं. महाराष्ट्राच्या राजकारणातली एक ऐतिहासिक गोष्ट म्हणूनही या घडामोडीकडे बघितलं जातंय.

    follow whatsapp