शिरीष कणेकर, ज्येष्ठ लेखक
ADVERTISEMENT
लाखो,करोडोंमध्ये एक असा आवाज असतो जो पुन्हा ऐकायला मिळत नाही किंवा तो होऊ पण शकत नाही. लता मंगेशकर यांचाही असाच आवाज होता आणि अशीच गायकी होती. ही गायकी मुळात पहिल्यापासून आहे तशीच होती अगदी शेवटपर्यंत. त्यात ना कोणता बदल झाला ना आपल्या कानांना तो बदल जाणवला. इतका लताचा स्वर दैवी होता.. जो या सम हाच अश्याच प्रकारचा आहे.
लता मंगेशकर यांच्याशी बोलताना मुळातच खूप टेन्शन यायचं. अहो मला सांगा इतकी मोठी व्यक्ती आपण काय बोलणार हिच्याशी… आपल्याला गाणी आवडतात म्हणून त्यावर लता मंगेशकर यांच्याशी चर्चा करायची हेच मला मुळात टेन्शन आणण्यासारखं होतं. पण जशीजशी माझी त्यांच्यासोबत ओळख वाढत गेली तेव्हा एक जाणवलं की लता मंगेशकर पण जर आपण बाजूला ठेवलं तर त्यांचं हसणं,वागणं,बोलणं हे अतिशय साधं होतं. आपण लता मंगेशकरांशी बोलतोय असं मुळातच वाटायचं नाही.. इतकं साधेपण त्यांनी जपलं होतं. अगदी शेवटपर्यंत.
व्हेंटिलेटरवर असताना लता मंगेशकर यांनी मागवला होता इयरफोन, जाणून घ्या काय होतं यामागचं कारण..
जी गाणी आपण ऐकतो त्या कंठाच्या मालकीणीशी आपण बोलतोय याचंच अप्रूप मला जास्त होतं. एकदा मी त्यांच्याशी बोलताना सांगितलं की दीदी मला तुमच्याशी बोलताना खूप टेन्शन येतं. त्यांनी माझं सगळं बोलणं ऐकलं आणि म्हणाल्या कणेकर तुम्ही असं करा मी तुम्हांला फोन करते तुम्ही मला टेन्शन द्या.. आणि खळखळून हसल्या.. आता आपण बापुडे काय बरं बोला यावर…
असंच एकदा मी त्यांच्या गाण्याच्या रिहर्सलला गेलो होतो. आणि एके ठिकाणी बसलो होतो. तर मला म्हणाल्या कणेकर तुम्ही तिकडे बसू नका..मी म्हटलं का? तर म्हणाल्या अहो कणेकर तिकडे कोरस गाणारे बसतात. तुम्ही तिथे बसलात तर गावं ही लागेल तुम्हांला. मी पण म्हणालो अहो दीदी मग काय त्यात मी घाबरतो की काय गायला.. तर लागलीच माझी फिरकी घेत म्हणाल्या की अहो तुम्ही भीत नाही हो तुमचं गाणं ऐकून बाकी भितील त्याचं काय…
असंच एकदा मी त्यांना म्हटलं होतं की दिदी तुम्ही इतक्या लोकांसोबत गाता, माझ्यासोबतपण गा की कधीतरी.. आपण जाहीर करू की लता मंगेशकर आणि शिरीष कणेकर एकत्र गाणं गात आहेत. त्यावर पुन्हा माझी टोपी उडवत म्हणाल्या की हो हो का नाही गाऊया की एकत्र अहो कणेकर तुमच्यामुळे कळेल तरी जगाला की सुरात कसं गायचं ते.. मला खरंतर सणसणीत शाब्दिक चपराकच हाणली होती त्यांनी…
लता मंगेशकर अतिशय खेळीमेळीने राहायच्या मी विचार करतो तेव्हा मला जाणवतं की आमच्यातला जर काही समान दुवा असेल तर गाणी,संगीत आणि मिश्कीलपणा असेल. मुळात त्या माणसांना फार चाचपून घ्यायच्या. आलं मनात कोणी आलं, त्यांना भेटलं. आणि त्यांनी कोणावर विश्वास टाकला असं मुळातच त्यांच्याबाबतीत व्हायचं नाही. त्या प्रत्येक माणसाला पारखायच्या आणि एकदा का त्यांचा विश्वास बसला की हा माणूस विश्वास ठेवण्यास पात्र आहे. की मग झालं तर त्यानंतर कोणीही तुमच्याबद्दल त्यांना काही उलटसुलट सांगू दे, नाहीतर बोलू दे, दींदीच्या विश्वासातील माणसाला ना कधी त्यांनी दुखावलं आहे ना कधी दूर केलंय.
लता मंगेशकरांच्या मी इतक्या मुलाखती छापल्या आहेत. पण आजपर्यंत एकदाही त्यांनी विचारलं नाही की हे का लिहीलं आहेस, हे नको यायला हवं होतं, ही गोष्ट छापली नसतीस तर बरं झालं असतं. असं कधीच व्हायचं नाही. एकदा त्यांची मी मुलाखत छापून आल्यानंतर त्यांना प्रश्न विचारला होता की काय हो दीदी आवडली का मुलाखत तुम्हांला, सगळे मुद्दे आले ना व्यवस्थित त्यावर त्या दिलखुलासपणे म्हणाल्या होत्या.. अहो कणेकर लिहा हो टरकून कोण विचारतंय तुम्हांला.. मी म्हटलं काय हे ही काय कॉम्पिलीमेंट झाली का? त्यावर त्या मस्तपैकी हसल्या.. इतका त्यांचा गोड स्वभाव होता.. कदाचित मी भेटत राहिलो,भेटत राहिलो या भेटीमधूनच त्यांचा माझ्याबद्दलचा स्नेह, विश्वास खुलत गेला असणार.
माझ्या यादों की बारात या पुस्तकाला त्यांनी प्रस्वातना लिहीली होती. पण त्याआधी दीदी तुम्ही माझ्या पुस्तकाला प्रस्तावना लिहाल का? अशी विचारायची हिंमतही झाली नव्हती. त्यांना कोणीतरी त्यांच्या परिचितांनी सांगितलं की लतादिदी कणेकरांची अशी इच्छा आहे.. की त्यांच्या नवीन पुस्तकाला तुम्ही प्रस्तावना लिहावी.. त्यांनी तात्काळ मला फोन लावला, काय हो कणेकर तुम्हांला माझ्याकडून काही लिहून हवं आहे का? माझी फोनवरच ततपप झाली होती.. पण त्यांनी मोठ्या प्रेमाने मला प्रस्तावना लिहून दिली होती.. मग मला त्यांनी विचारलं होतं की कशी झालीय प्रस्तावना.. मी काय बोलू शकलो असतो तेव्हा अरे दीदी मी कोण तुम्हांला सांगणारा की प्रस्तावना कशी झालीय ती.. त्यापुढे त्या एक वाक्य म्हणाल्या की कणेकर आपलं पुस्तक गेलं पाहिजे.. मी चपापलोच आपलं पुस्तक.. दीदी आपलं पुस्तक म्हणाल्या.. कोण कुठला मी शिरीष कणेकर त्याच्या पुस्तकाला साक्षात दिदी म्हणतायत की आपलं पुस्तक,,, मी भारावून गेलो होतो तेव्हा.. अशी विलक्षण आपुलकी त्यांची होती. ३० वर्षांपेक्षा जास्त त्यांची आणि माझी ओळख .. मला अगदी शेवटचं आठवतंय त्या एकदा मला म्हणाल्या होत्या..कणेकर मी तुम्हांला अगदी जवळचं मानते हा.. मला सांगा अहो अजून काय पाहिजे हो आपल्याला …
‘पुन्हा लता मंगेशकर म्हणून जन्म नको कारण… ‘ दीदींच्या निधनानंतर ‘तो’ व्हीडिओ व्हायरल
कालच मी त्यांनी गायलेली सर्वोत्तम अशी १५ गाणी निवडत होतो. मला कळत नव्हतं कशी निवडू ते अहो अवीट गोडीची अमाप गाणी आहेत त्यांची निवडायची तरी कशी हो.. त्यांनी मला हा प्रश्न विचारला होता की कणेकर तुम्ही सांगा तुमचा आवडता संगीतकार कोण? मी चाचपडत म्हटलं माझा आवडता संगीतकार मदन मोहन.. मग म्हणाल्या.. का रोशन,अनिल ह्यांच्यावर तुमचा विश्वास नाही. मी म्हटलं नाही हो असं नाही.. त्यावर त्यांनी पुन्हा मला प्रश्न केला आणि मग सज्जाद शामसुंदर आणि सलील चौधरी, शंकर जयकिशन हे पण नाही आवडत का? माझ्या थोड्यावेळाने लक्षात आलं की त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला मी हो हो करत होतो. आणि माझी अवस्था पाहून त्यांना चांगलंच हसू फुटत होतं.. आणि नंतर त्या म्हणाल्या .. अहो कणेकर म्हणून मी आवडती गाणी कोणती हे निवडत बसत नाही.. अहो कोणती गाणी घ्यायची असा खरंच प्रश्न पडतो… किमान ५०० गाणी निवड़ा असं जर कोणी सांगितलं तर मी प्रत्येक संगीतकारांच्या गाण्यांना न्याय देऊ शकते.. १० ते १५ गाणी निवडाल तर कोणा ना कोणावर अन्याय होणारच ना, म्हणून मी त्या वाट्याला जातच नाही.
मला आठवतंय त्यांचा माझ्याशी चांगला स्नेह होता. त्या आजारी असूनही माझ्या यादो की बारातच्या प्रकाशनला तेव्हा आल्या होत्या. मला खूप आनंद झाला होता.. थिएटरच्या पायऱ्या चढत असताना तिथे असलेल्या एका बाईने दीदींना सांगितलं .. दीदी मला तुमची गाणी,तुमचा आवाज खूप आवडतो.. मी त्या बाईची फिरकी घेण्यासाठी म्हणालो काय सांगताय.. तुम्हांला दीदींचा आवाज आवडतो. म्हटलं आम्हांला नाही आवडत हा त्यांचा आवाज.. त्यावर त्या बाईंना काय बोलावं हेच सुचत नव्हतं, आणि दीदी खळखळून हसत हसत थिएटरमध्ये पोहचल्या देखील..
त्या माझ्या घरी नियमीत यायच्या माझ्या घरचं खिमा पँटीस,कटलेट त्यांना भयंकर आवडायचं. एकदा त्या घरी आल्या होत्या तेव्हा त्यांची तब्येत बरी नव्हती..मी त्यांना म्हटलं आज तुम्ही नाही खाणार ना कटलेट,खिमा पँटीस तुम्हांला बरं नाहीये ना, त्यावर त्या म्हणाल्या नाही हो आता आले ना तुमच्या घरी झाले मी बरी.. खाण्यावर त्यांचं प्रचंड प्रेम होतं.
त्या मेंहदी हसनची गाणी सतत एेकायच्या .. एकदा त्यांचं रेकॉर्डिंग मोहम्मद रफींसोबत होतं. तेव्हा रफीसाहेब त्यांना म्हणाले .. लताजी आप मेंहदी हसन मुंबई मैं आये हे, जायिये जायिये मिल लिजीये उनको.. त्यांचा तो तोरा पाहून लतादिदी हसतच म्हणाल्या रफीसाहब मुझे आपका भी गाना बहुत पसंद है आौर मेंहदी हसनजी का भी आपको उसको इतनी दिक्कत क्यूँ है?
अशा दिलखुलास जगावेगळ्या होत्या लता मंगेशकर .. बघा ना आपल्याला तो आवाज माहित असतो. तो चेहरा माहित नसतो.. लताचा आवाज रेडिओ,टीव्ही, जिथे पाहिजे तिथे आपल्या कानांवरती पडत असतो.. आणि म्हणूनच मेरी आवाज ही पहचान है. हो आवाजच त्यांची पहचान आहे. अत्युच्च स्थानी बसलेली बाई अतिशय नॉर्मल आहे हो… त्या हॉस्पिटलमध्ये अँडमिट होण्यापूर्वीची ही गोष्ट आहे. एकदा मी घरात बसलो होतो. लताचं एक गाणं ऐकत होतो. उडनखटोला सिनेमातलं मोरे सैयाजी उतरेंगे पार रे.. मी त्यांना लागलीच फोन केला की दीदी अहो हे गाणं ऐकत होतो तुमचं ,काय गायलात हो तुम्ही हे गाणं कमाल एकदम, त्या जरा संकोचल्या म्हणाल्या काय हो कणेकर किती ते कौतुक करता माझं .. आणि लगेच पुढे त्या ते गाणं गायला ही लागल्या.. अहो वयाच्या ९२ व्या वर्षीही त्याच आर्त स्वरात त्या गाणं गात होत्या, अहो आणि हे ऐकणारा मी एकटाच होतो, अहो किती अद्भूत आहे हे, अजून काय हवं हो आपल्याला.. काय त्या ताना, घेतलेल्या मुरक्या आहाहाहा जबरदस्त .
म्हणूनच असा आवाज ,अशी गायिकी पुन्हा होणे नाही. निव्वळ अशक्य आहे हे… आणि असा दैवी आवाज केवळ एकच .. लता मंगेशकरांचा .. फक्त लता मंगेशकरांचा
ADVERTISEMENT