मुंबई : ‘से नो टू’ हलाल या मोहिमेवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेतील दोन बडे नेते सध्या आमने-सामने आले आहेत. मनसे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी मांडलेली भूमिका ‘से नो टू’ हलाल ही पक्षाची अधिकृत भूमिका नाही, असे मनसेचे वरिष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केले आहे. तर हीच मनसेची अधिकृत भूमिका असून राज ठाकरे यांच्याशी चर्चा करुनच ही मोहिम सुरु केली असल्याचे किल्लेदार यांनी सांगितले आहे. सोबतच ज्या बैठकीत ही मोहिम ठरली त्या बैठकीला नांदगावकर नव्हते त्यामुळे त्यांना याबाबत माहिती नाही, असेही किल्लेदार यांनी सांगितले आहे.
ADVERTISEMENT
यशवंत किल्लेदार हलाल विरोधात आक्रमक :
काल यशवंत किल्लेदार यांनी पत्रकार परिषद घेवून या मोहिमेची घोषणा केली होती. किल्लेदार म्हणाले होते, हलाल ही मुस्लिम धर्मियांकडून बकऱ्याला कापण्याची ही क्रूर पद्धत आहे. ऐवढचं नाही तर मक्क्याकडे तोंड करून त्यांची कत्तल होते. 15 टक्के मुस्लिम धर्मियांची ही पद्धत 85 टक्के लोकांवर का लादायची. हा मुद्दा फक्त धार्मिक मुद्दा नाही तर अर्थव्यवस्थेवर त्याचा होणारा परिणाम याकडे आम्ही पाहत आहोत. याचे पैसे अतिरेक्यांच्या न्यायालयील खटल्यांसाठी वापरले जातात. यासाठी जनजागृती म्हणून ‘नो टू हलाल मोहीम’ ही चळवळ उभी करणार आहोत.
MNS : हलाल विरुद्ध झटका वाद पुन्हा उफळला, यशवंत किल्लेदार आक्रमक, राज ठाकरेंचे मनसैनिकांना नवे आदेश
बाळा नांदगावकर म्हणाले ही मनसेची अधिकृत भूमिका नाही :
आमच्या एका कार्यकर्त्याने ती मागणी केली आहे, मात्र ‘से नो टू हलाल’ ही पक्षाची भूमिका नाही. जोपर्यंत पक्षप्रमुख एखादी मागणी करत नाहीत तोपर्यंत ती पक्षाची भूमिका होत नाही. त्यामुळे त्याच्यावर भाष्य करणे उचित नाही. एखादा कार्यकर्ता कुठेतरी पत्र देतो आणि त्यावर आम्ही भाष्य करणे हे उचित नाही, असेही बाळा नांदगावकर म्हणाले आहेत.
‘हलाल’ मटणविरोध ही मनसेची अधिकृत भूमिका नाही : बाळा नांदगावकरांचे स्पष्टीकरण
नांदगावकर यांना याबाबत माहिती नाही :
तर यशवंत किल्लेदार यांनी मात्र ही पक्षाची अधिकृत भूमिका असल्याचे म्हटले आहे. किल्लेदार म्हणाले, मागील एक महिन्यापासून या विषयावर आमचा अभ्यास सुरु होता. त्यानुसार हा विषय पक्षाच्या मुख्य कार्यालयात याबाबतची पत्रकार परिषद घेवून मांडला आहे आणि पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या परवानगीने तो मांडला आहे. त्यामुळे हीच पक्षाची अधिकृत भूमिका आहे. ज्यावेळी या सगळ्या गोष्टीबाबत चर्चा सुरु होती त्यावेळी बाळा नांदगावकर हे नेमके एका कौटुंबीक कार्यक्रमामध्ये होते. त्यामुळे ते बैठकीला हजर नव्हते. केवळ संवादातील आभावामुळे हा गैरसमज झाला आहे. नो हलाल ही पक्षाची अधिकृत भूमिका आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले.
ADVERTISEMENT