धनंजय साबळे, प्रतिनिधी, अमरावती
ADVERTISEMENT
दिवाळी सुरू असतानाच अकोल्यात एका घरातला तरूण मुलाचा मृत्यू झाला. मनावर दगड ठेवून नातेवाईकांनी अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू केली. तिरडी बांधण्यात आली. त्यानंतर या तरूणाचा मृतदेह तिरडीवर ठेवला. तिरडी घेऊन लोक स्मशानात निघाले आणि तेवढ्यात तो तरूण उठून बसला. अकोल्यातल्या पातूर तालुक्यात विवरा गावात ही घटना घडली आहे. फिल्मी वाटावी अशीच ही घटना आहे.
नेमकी काय घडली घटना?
प्रशांत मेशरे हा तरूण होम गार्ड विभागात कामाला होता. गेल्या काही दिवसांपासून तो आजारी होता. त्यानंतर त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आलं. बुधवारी त्याची प्रकृती जास्त खालावली आणि त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. प्रशांतची नस चोक झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
यानंतर काय घडलं?
प्रशांतच्या कुटुंबीयांसाठी हा धक्काच होता. त्यानंतर त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली तिरडी बांधून त्यावर प्रशांतचा देह ठेवण्यात आला. तिरडी घेऊन लोक निघालेले असतानाच प्रशांत उठून बसला ज्यामुळे गावकऱ्यांचा थरकाप उडाला.
गावकऱ्यांनी प्रशांतला मंदिरात ठेवलं
यानंतर घाबरलेल्या गावकऱ्यांनी गावातल्या एका मंदिरात प्रशांतला नेलं. तिथे तो बोलायला लागल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी गावकऱ्यांनीही दिली. या तरूणाला पाहण्यासाठा गावात मोठी गर्दी झाली होतीय. त्यानंतर गावात येत पोलिसांनी प्रशांतसह त्याच्या वडिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. पोलीस पोहोचले असून ते चौकशी करत आहेत. काही लोक याला दैवी चमत्कार समजत आहेत. तर काही वैद्यकीय चूक समजत आहेत. प्रशांत हा होमगार्डमध्ये असून त्याच्या अंगात येत असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. तो एका मांत्रिकाच्या संपर्कात असल्याचंही गावकरी सांगत आहेत.
ADVERTISEMENT