उद्धव ठाकरेंना आव्हान देत बंड केल्यानंतर शिंदे गटाकडून शिवसेना पक्षावरच दावा करण्यात आलाय. सध्या हे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगात न्यायप्रविष्ट असताना आता शिंदे गटाने आदित्य ठाकरेंच्या युवा सेनेला मोठं खिंडार पाडलंय. पूर्व विर्दभातील युवा सेनेच्या सात जिल्हाप्रमुखांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. ४० बंडखोर आमदारांविरोधात महाराष्ट्रभर फिरत असलेल्या आदित्य ठाकरेंना हा मोठा धक्का असल्याचं म्हटलं जात आहे.
ADVERTISEMENT
एकनाथ शिंदेंनी शिवसेनेविरोधात बंड केलं. भाजपसोबत घरोबा करत सत्ता स्थापन केली आणि मुख्यमंत्रीही झाले. त्यानंतर शिंदेंनी थेट शिवसेनेवरचा ताबा घेण्याचा प्रयत्न केलाय. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आता शिंदे गटाने विदर्भात आणखी झटका दिलाय.
शिवसेनेचे ४० आमदार आणि अनेक जिल्हाप्रमुख आणि पदाधिकारी आपल्या बाजूने वळवल्यानंतर शिंदेंच्या सेनेनं उद्धव ठाकरेंना विदर्भातच आदित्य ठाकरेंना जबर धक्का दिलाय. बाळासाहेबांची शिवसेना गटाचे विदर्भाचे प्रमुख किरण पांडव यांनी ‘मुंबई Tak’ याबद्दलची माहिती दिली.
‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत तसेच डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर विश्वास दाखवत पूर्व विदर्भातील युवासेनेचे हे पदाधिकारी शिंदे गटामध्ये सहभागी झाले’, असल्याचं ते म्हणाले.
युवा सेनेच्या कोणत्या जिल्हाधिकाऱ्यांनी शिंदे केला प्रवेश?
हर्षल शिंदे (युवासेना जिल्हाप्रमुख, चंद्रपूर), शुभम नवले (युवासेना जिल्हाप्रमुख, नागपूर ग्रामीण), रोशन कळंबे (युवासेना जिल्हाप्रमुख, भंडारा), दीपक भारसाखरे (युवासेना जिल्हाप्रमुख, गडचिरोली), कगेश राव (युवासेना जिल्हाप्रमुख, गोंदिया), नेहा भोकरे (युवती सेना जिल्हाप्रमुख, नागपूर), सोनाली वैद्य (युवती सेना जिल्हाप्रमुख, नागपूर ग्रामीण) प्रफुल सरवान (जिल्हा समन्वयक आणि नगरसेवक भद्रावती, चंद्रपूर) राज तांडेकर (जिल्हा समन्वयक, नागपूर), लखन यादव (जिल्हा समन्वयक, रामटेक), कानाजी जोगराणा (जिल्हा चिटणीस, नागपूर), अभिषेक गिरी (उप-जिल्हा प्रमुख, नागपूर ग्रामीण), सुनील यादव (रामटेक विधानसभा समन्वयक)
शिंदे गट युवा सेनेवर ठोकणार दावा?
आमचा गट हाच खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाकडून सातत्यानं केला जातोय. निवडणूक आयोगाकडून यावर अजून निकाल येणं बाकी आहे. दरम्यान, शिंदे गटाने युवा सेना ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू केल्याचं दिसत आहे. एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांच्या बंडखोरीनंतर युवा सेनेच्या अनेक पदाधिकारी शिंदे गटात आले आले आहेत.
युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे असून, ही जबाबदारी आता खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर सोपवण्याची मागणी शिंदे गटातून झालेली आहे. आदित्य ठाकरेंविरुद्ध श्रीकांत शिंदे यांना शिंदे गटाकडून उभंही केलं जात आहे. त्यातच आता पूर्व विर्दभात युवा सेनेला मोठं खिंडार पडल्यानं शिंदे गटात युवा सेनेवर दावा ठोकण्याच्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा सुरू झालीये.
ADVERTISEMENT