विधानपरिषद निवडणूक: 'या' आकड्याने वाढवली महायुतीची धडधड, कोणाची मतं फुटणार?

मुंबई तक

03 Jul 2024 (अपडेटेड: 03 Jul 2024, 05:01 PM)

Vidhan Parishad Election: विधानपरिषद निवडणुकीमुळे महायुतीचं टेन्शन वाढलं आहे. कारण गुप्त मतदान पद्धत असल्याने आमदार फुटण्याचा धोका नक्कीच वाढला आहे.

कोणाची मतं फुटणार?

कोणाची मतं फुटणार?

follow google news

Vidhan Parishad Election: मुंबई: महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या निवडणुका या 12 जुलै रोजी होणार असून त्याकडे आता अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. कारण विधानपरिषदेची निवडणुकीत काय घडू शकतं हे अवघ्या राज्याने दोन वर्षांपूर्वी पाहिलं आहे. कारण 2022 साली विधानपरिषद निवडणुकीनंतरच राज्यातील ठाकरे सरकार कोसळलं होतं त्यामुळेच आता याच 'विधानपरिषद पॅटर्नची' राज्यातील नेत्यांनाही धडकी भरली आहे. (12 candidates for 11 seats of legislative council whose mla votes will be split tension of mahayuti increased)

हे वाचलं का?

विधानपरिषदेच्या 11 जागा रिक्त होत आहेत. पण या 11 जागांसाठी आता 12 उमेदवार रिंगणात आहेत. जर 5 जुलैपर्यंत कुणीही आपला अर्ज मागे घेतला नाही तर निवडणूक होणं अटळ आहे. अशावेळी क्रॉस व्होटिंग होऊन मतं फुटण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सध्या सत्ताधाऱ्यांची चिंता काहीशी वाढली आहे.

हे ही वाचा>> Pune News : "पुरुषांनो, कुणी कसेही कपडे घातले तरी...", पुण्यात बघा काय घडलं?

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीने 9 उमेदवार दिले आहेत. तर महाविकास आघाडीने 3 उमेदवार दिले आहेत. अशावेळी कोणत्या एका उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागणार याविषयी अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. यामुळे विधानपरिषदेतील निवडणुकीचं नेमकं गणित काय आहे हे आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. 
 
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून काही आमदार हे निवडून गेले आहेत. तर काही विधानसभा सदस्यांच्या जागा या निधनामुळे रिक्त आहेत. विधानसभेतील अशा एकूण 14 जागा रिक्त असल्याने आता विधानपरिषद निवडणुकीत निवडून येण्यासाठी उमेदवाराला 23 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे.

विधानपरिषद निवडणुकीचं नेमकं गणित कसं?

महायुतीने विधानपरिषदेसाठी 9 उमेदवार दिले आहेत. त्यापैकी भाजपने 5, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांनी प्रत्येकी 2-2 उमेदवार दिले आहेत. 

हे ही वाचा>> Mazi Ladki Bahin Yojana : चुका टाळा! 1500 रुपये मिळवण्यासाठी कसा भरायचा अर्ज? 

निवडून येण्यासाठी मतांचा कोटा 23 आहे. त्यामुळे महायुतीच्या एकूण 9 उमेदवारांसाठी 207 मतांची गरज आहे. महायुतीकडे एकूण संख्याबळ हे 181 आहे. ज्यापैकी भाजप 103, शिवसेना (शिंदे गट) 38 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्याकडे 40 आमदार आहेत. मात्र, याशिवाय काही अपक्ष किंवा घटक पक्षांच्या साथीने महायुती 207 चा आकडा पार करू शकतं. मात्र, असं असलं तरीही हे मतदान गुप्त पद्धतीने पात्र पडतं. अशावेळी शेवटच्या क्षणी काहीही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच महायुतीतील नेत्यांचं टेन्शन नक्कीच वाढलं आहे.

विधानपरिषदेनं वाढवलं महायुतीचं टेन्शन

भाजपकडे स्वत:चे 103 आमदार आहेत. तर अपक्ष 5 आणि घटक पक्षांचे 7 आमदार त्यांच्यासोबत आहेत. म्हणजेच भाजपचे एकूण संख्याबळ हे 116 आहे. त्यामुळे त्यांचे पाच उमेदवार सहज निवडून येतील.

शिवसेना (शिंदे गट) यांनी 2 उमेदवार दिले आहेत. ज्यामध्ये शिंदेंकडे स्वत:चे 38 आमदार आहेत. तर अपक्ष 6 आणि प्रहारचे 2 आमदार असं एकूण संख्याबळ 46 इतकं आहे. म्हणजेच शिंदेंच्या शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून येऊ शकतात.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांनी देखील 2 उमेदवार दिले आहेत. अजित पवारांकडे एकूण 40 आमदार आहेत. तसेच इतर 3 आमदारही त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळे त्यांचे दोन उमेदवार निवडून येण्यासाठी त्यांना 3 अधिकच्या मतांची गरज लागणार आहे.

दुसरीकडे महाविकास आघाडीने 3 उमेदवार विधानपरिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने खरी चुरस निर्माण झाली आहे. 

उमेदवारांना निवडून येण्यासाठी मतांचा कोटा 23 आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या 3 उमेदवारांसाठी 69 मतांची गरज आहे. महाविकास आघाडीकडे एकूण संख्याबळ हे 64 आहे. ज्यापैकी काँग्रेसकडे 37, शिवसेना (UBT) 15 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्याकडे 12 आमदार आहेत. अशावेळी योग्य रणनिती आखल्यास महाविकास आघाडी आपले तीनही उमेदवार हे निवडून आणू शकतं. 

महाविकास आघाडी 'त्या' पराभवाचं उट्टं काढणार?

काँग्रेसकडे सध्या 37 आमदार आहेत. पण त्यांनी केवळच एकच उमेदवार या निवडणुकीत दिला आहे. त्यामुळे त्यांचा उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतो. पण कोणत्याही दगाफटका होऊ नये यासाठी काँग्रेस 23 ऐवजी मतांचा कोटा वाढवू शकतं. 

दुसरीकडे शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाने मिलिंद नार्वेकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून निवडणुकीची रंगत वाढवली आहे. मात्र ठाकरे गटाकडे स्वत:चे 15 आमदार आहे. त्यांच्यासोबत एक अपक्ष आमदार शंकरराव गडाख हे देखील आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे सध्याच्या घडीला 16 आमदारांचं पाठबळ आहे. म्हणजे मिलिंद नार्वेकरांना जर निवडून आणायचं असेल तर त्यांना 7 मतांची गरज आहे. मिलिंद नार्वेकर यांचे सर्व पक्षातील नेत्यांशी सलोख्याचे संबंध आहेत. अशावेळी नार्वेकर त्यांच्या याच गुडविलचा फायदा घेऊन या निवडणुकीत चमत्कार घडवू शकतात.

याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांनी आपल्या पक्षातून कोणालाही उमेदवारी दिलेली नाही. त्याऐवजी त्यांनी शेकापच्या जयंत पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. सध्या शरद पवार यांच्यासोबत 12 आमदार आहेत. त्यामुळे जयंत पाटलांना निवडून येण्यासाठी 13 मतांची गरज आहे. अशावेळी जयंत पाटील हे देखील त्यांच्या एवढ्या वर्षाच्या अनुभवाच्या जोरावर काही मतांची नक्कीच जुळवाजुळव करू शकतील. 

यामुळे आता या निवडणुकीत नेमका कोणाला पराभवाचा फटका बसणार आणि त्याच्या राज्यातील शिंदे सरकारवर काय परिणाम होणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

    follow whatsapp