Assembly election 2023 schedule : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराममध्ये विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यातील निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, मिझोराममध्ये 7 नोव्हेंबरला पहिल्यांदा मतदान होणार आहे. यानंतर 17 नोव्हेंबरला मध्य प्रदेशात मतदान होणार आहे. छत्तीसगडमध्ये 7 नोव्हेंबर आणि 17 नोव्हेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. तर राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबरला आणि तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. पाचही राज्यांचे निकाल 3 डिसेंबरला लागणार आहेत. त्यामुळे पुन्हा देशात राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाचा पारा वाढणार आहे.
ADVERTISEMENT
राज्याचे मतदान किती जागा
मिझोराम 7 नोव्हेंबर 40 जागा
मध्य प्रदेश 17 नोव्हेंबर 230 जागा
छत्तीसगडमध्ये 7 आणि 17 नोव्हेंबरला 90 जागा
राजस्थान 23 नोव्हेंबर 200 जागा
तेलंगणात 30 नोव्हेंबर 119 जागा
सर्व 5 राज्यांचे निकाल 3 डिसेंबरला लागतील.
मिझोराममध्ये 7 नोव्हेंबरला मतदान
40 जागा असलेल्या मिझोराममध्ये एकाच टप्प्यात म्हणजे 7 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मिझोरम विधानसभेचा कार्यकाळ 17 डिसेंबर 2023 रोजी संपत आहे. राज्यातील शेवटच्या विधानसभा निवडणुका नोव्हेंबर 2018 मध्ये झाल्या होत्या, ज्यामध्ये मिझो नॅशनल फ्रंटने विजय मिळवला आणि राज्यात सरकार स्थापन केले होते. त्यानंतर झोरमथांगा मुख्यमंत्री झाले होते.
हेही वाचा >> शरद पवारांना झटका! एक खासदार झाला कमी, ECI सुनावणी आधीच कोर्टात धक्का
मध्य प्रदेशच्या जागा 230, 17 नोव्हेंबरला मतदान
230 जागा असलेल्या मध्य प्रदेशात पहिल्या टप्प्यात 17 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. राज्यातील विधानसभेचा कार्यकाळ 6 जानेवारी 2024 रोजी संपत आहे. राज्यात शेवटच्या विधानसभा निवडणुका नोव्हेंबर 2018 मध्ये झाल्या होत्या. त्या निवडणुकीत काँग्रेसने राज्यात सरकार स्थापन केले आणि कमलनाथ मुख्यमंत्री झाले होते. परंतु मार्च 2020 मध्ये 22 काँग्रेस आमदारांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह भारतीय जनता पक्ष (BJP) मध्ये सामील झाले. यानंतर मध्य प्रदेशातील काँग्रेसचे सरकार पडले आणि मुख्यमंत्री कमलनाथ यांना राजीनामा द्यावा लागला. यानंतर राज्यात भाजपने सरकार स्थापन केले आणि शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्री झाले.
छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान
छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. येथे 7 आणि 17 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. 90 जागांच्या छत्तीसगड विधानसभेचा कार्यकाळ 3 जानेवारी 2024 रोजी संपणार आहे. विधानसभेची शेवटची निवडणूक नोव्हेंबर 2018 मध्ये झाली होती. या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली आणि भूपेश बघेल राज्याचे मुख्यमंत्री झाले होते.
हेही वाचा >> OBC Politics Election 2024 : ओबीसी व्होट बँक राजकारणात किती मोठी गेमचेंजर?
राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबरला मतदान
राजस्थान विधानसभेचा कार्यकाळ 14 जानेवारी 2024 रोजी संपत आहे. राज्यातील 200 जागांसाठी 23 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने राज्यात सरकार स्थापन केले आणि अशोक गेहलोत मुख्यमंत्री झाले.
तेलंगणात 30 नोव्हेंबरला मतदान
तेलंगणा विधानसभेचा कार्यकाळ 16 जानेवारी 2024 रोजी संपत आहे. 30 नोव्हेंबर रोजी 119 जागांसह तेलंगणात मतदान होणार आहे. डिसेंबर 2018 मध्ये येथे शेवटच्या विधानसभा निवडणुका झाल्या आणि तेलंगणा राष्ट्र समितीने राज्यात सरकार स्थापन केले. त्याचे नाव बदलून आता भारत राष्ट्र समिती असे करण्यात आले. चंद्रशेखर राव दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेले आहेत.
हेही वाचा >> Rajasthan : वसुंधरा राजेंना भाजपने शोधला पर्याय! कोण आहेत महाराणी दिया कुमारी?
5 राज्यांमध्ये 16 कोटी मतदार
निवडणुकीच्या तारखांची घोषणा करताना निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, 5 राज्यांमध्ये 679 जागांवर 16 कोटी मतदार आहेत. त्यापैकी 60 लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. मध्य प्रदेशात 5.6 कोटी, राजस्थानमध्ये 5.25 कोटी, तेलंगणात 3.17 कोटी, छत्तीसगडमध्ये 2.03 कोटी आणि मिझोराममध्ये 8.52 लाख मतदार आहेत. या राज्यांमध्ये 1.77 लाख मतदान केंद्रे असणार आहेत.
ADVERTISEMENT