मुंबई: राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर महायुतीतील अनेक नेते हे नाराज आणि अस्वस्थ असल्याचं समोर आलं. त्याचं कारण म्हणजे त्यांची मंत्रिपदाची हुकलेली संधी. पण दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेच स्वत: अस्वस्थ असल्याचं आता समोर आलं आहे. कारण मागील 24 तासांपासून ते कुणाच्याही संपर्कात नव्हते. एवढंच नव्हे तर कुणालाही फारशी कल्पना न देता अजितदादा नागपूरमधील हिवाळी अधिवेशन सोडून ते अचानक दिल्लीला रवाना झाले.
ADVERTISEMENT
'यासाठी' अजित पवार अस्वस्थ?
मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार कालपासूनच दिल्लीत आहेत. ते कालपासून कोणालाच भेटले नव्हते. सुरुवातीला ते आपल्या बंगल्यातच आहेत अशी माहिती देण्यात येत होती. पण ते कालपासून राजधानी दिल्लीतच आहेत. अशी माहिती आता समोर आली आहे. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनला कालपासून सुरूवात झाली आहे. मात्र, अधिवेशन सोडून अजितदादा हे तडकाफडकी दिल्लीला का गेले? याबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.
हे ही वाचा>>Maharashtra News Live: परभणी घटनेचे पडसाद, सोलापूर आगारातील शिवशाही बस अज्ञातांनी पेटवली!
खातेवाटपाचा तिढा हा कायम आहे. त्यामुळेच त्यासंबंधी चर्चा करण्यासाठी अजितदादा हे दिल्लीत गेले असल्याचं आता बोललं जात आहे. महिला आणि बालविकास तसंच अर्थ खात्याबाबतचा पेच हा कायम आहे. त्यामुळेच अजितदादा हे आता थेट दिल्लीला गेले आहेत.
महायुतीचा खातेवाटपाचा पेच हा कायम आहे. कालपासूनच अजित पवार हे त्यांच्या नागपूरमधील बंगल्यावर नसल्याचं समोर आल्यानंतर अनेक चर्चांना सुरुवात झाली होती. अखेर ते दिल्लीत असल्याचं आज सकाळी समोर आलं आहे.
अर्थ आणि महिला-बालविकास खात्यांसाठी अजित पवार हे प्रचंड आग्रही आहेत. तर दुसरीकडे भाजप ही खाती सोडण्यास तयार नाही. पण या खात्याऐवजी सार्वजनिक बांधकाम खातं देण्यास भाजप तयार आहे. पण यावरच तोडगा निघत नसल्याने अजितदादा हे दिल्लीला गेले आहेत. जिथे ते भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांशी चर्चा करतील.
हे ही वाचा>> भाजपने खासदारांना बजावला व्हीप, काँग्रेसनेही... लोकसभेत काय घडतंय?
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की, येत्या दोन दिवसात खातेवाटप जाहीर होईल. पण अद्यापही खातेवाटप काही जाहीर झालेलं नाही. याचा अर्थ असा की, महायुतीतील तीनही पक्षांमध्ये अद्यापही खाते वाटप निश्चित झालेलं नाही. हाच पेच सोडविण्यासाठी अजित पवारांनी दिल्ली वारी केली आहे.
दुसरीकडे शिवसेना नेते हे अजूनही गृहखात्यावर दावा करत आहेत. पण हे खातं सोडण्यास भाजप अजिबात तयार नाही. तसंच अजितदादांना हवं असणारं अर्थ खातं हे भाजपला हवं आहे. कारण निधी वाटपाचा प्रश्न आहे. त्यामुळे अर्थ खातं हे आपल्याला मिळावं यासाठी भाजप प्रयत्नशील आहे.
ADVERTISEMENT