नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात एक मोठी घोषणा केली. ती म्हणजे राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल पटेल आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना कार्यकारी अध्यक्ष करण्याची. ज्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली. यावेळी अशीही चर्चा सुरू झाली की, अजित पवार (Ajit Pawar) यांना कोणतीच जबाबदारी न दिल्याने ते नाराज झाले आहेत. मात्र, आता या सगळ्या चर्चांबाबत स्वत: शरद पवारांनीच काय ते नेमकं सांगितलं आहे. (ajit pawar is upset working president supriya sule ncp sharad pawar decision new delhi marathi political news)
ADVERTISEMENT
कार्याध्यक्ष पदाची घोषणा केल्यानंतर शरद पवार यांनी राजधानी दिल्लीत एक पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांना अजित पवारांच्या नाराजीबाबत प्रश्न विचारण्यात आला.. तेव्हा शरद पवारांनी पक्षात काय सुरू आहे आणि कार्याध्यक्ष पदाचा निर्णय का घेण्यात आला याविषयी नेमकं काय ते सांगून टाकलं.
पाहा शरद पवार अजितदादांबाबत नेमकं काय म्हणाले:
‘मला स्वत:ला वाटत होतं की, सगळ्या सहकाऱ्यांवर जबाबदारी द्यावी. पण माझ्या राजीनाम्याचा स्वीकार काही केला नाही. त्यामुळे मला अध्यक्ष म्हणून कायम राहावं लागलं. पण आता इतर राज्यांमधील जबाबदारी घेण्याची गरज आहे. म्हणून सहकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अध्यक्षाची जागा काही खाली नाही.. जेव्हा जागा रिकामी होईल तेव्हा बोलू.’
‘अजित पवार किंवा इतर सहकाऱ्यांबाबत आपण ज्या बातम्या चालवत आहात. त्यात एक टक्केही तथ्य नाही. काही मीडियामध्ये अशा बातम्या आल्या आहेत की, दोन लोकं खुश नाहीत.. एक जयंत पाटील.. जयंत पाटील हे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यासाठी त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. तर अजित पवार हे महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते आहेत. आज त्यांच्यावर तिकडची जबाबदारी आहे.’
‘आणि तसंही सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्ष करा याबाबतचा प्रस्तावच अजित पवारांनी दिला होता. तर आता त्यांच्या खुश असण्याचा किंवा नसण्याचा प्रश्नच कुठे येतो?’
‘प्रफुल पटेल किंवा सुप्रिया पवार यांची जी निवड करण्यात आली आहे त्यांच्याकडे अशी काही खास जबाबदारी नव्हती. जबाबदारी घेण्याची त्यांची तयारी होती. त्यामुळेच कोणी नाखूश आहे खुश आहे या गोष्टी चुकीच्या आहेत. जी इथे निवड झाली ती नावं सर्व सीनियर नेत्यांनी महिन्याभरापूर्वी घेतली होती. ज्याचा निर्णय आज झाला. एका महिन्यापूर्वी याबाबतचा प्रस्ताव माझ्यापुढे आमच्या सहकाऱ्यांनी मांडला होता.’ असं म्हणत शरद पवार यांनी अजित पवार नाराज असल्याच्या वृत्ताचं खंडन केलं आहे.
ADVERTISEMENT