Amit Shah Vishnu Deo Sai : छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रिपदी कोण बसणार? यावरून सुरू असलेली कोंडी रविवारी फुटली. भाजपने मुख्यमंत्रीपदासाठी विष्णू देव साय यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले. रविवारी (10 डिसेंबर) झालेल्या 54 नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड करण्यात आली. साय यांच्या निवडीनंतर अमित शाह यांचं एक विधान चर्चेत आले.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्रिपदासाठी विष्णू देव साय यांच्या नावाला मंजुरी दिल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. खरे तर त्यांनी गेल्या महिन्यात कुणकुरी विधानसभा मतदारसंघात विष्णु देव साय यांच्या प्रचारार्थ रॅली काढली होती.
या रॅलीत अमित शाह यांनी मतदारांना विष्णू देव साय यांना आमदार करण्याचे आवाहन केले होते. राज्यात पुन्हा पक्षाची सत्ता आल्यास साय यांना ‘मोठा माणूस’ बनवू, असे वचन शाह यांनी दिले होते.
अमित शाह यांनी विष्णू देव साय यांच्याबद्दल काय केले होते विधान?
“विष्णू देव साय हे आमच्या पक्षाचे अनुभवी नेते आहेत”, असे अमित शाह सभेत म्हणाले होते. “त्यांनी खासदार, आमदार आणि प्रदेशाध्यक्षपदही भूषवले आहे. आता तुम्ही त्यांना आमदार करा. साय यांना ‘मोठा माणूस’ बनवण्यासाठी आम्ही काम करू”, असे विधान शाह यांनी केले होते.
हेही वाचा >> बसपा अध्यक्षा मायावतींचा वारसदार ठरला! कोण आहे आकाश आनंद?
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने छत्तीसगडच्या 90 सदस्यीय विधानसभेत 54 जागा जिंकल्या, तर काँग्रेसने 35 जागांवर विजय मिळवला. 2018 मध्ये आदिवासी बहुल जागांवर भाजपला मोठा धक्का बसला होता, परंतु यावेळी पक्षाने या भागात चांगली कामगिरी केली आणि अनुसूचित जमाती (ST) उमेदवारांसाठी राखीव असलेल्या 29 जागांपैकी 17 जागा जिंकल्या.
हेही वाचा >> महंत बालकनाथांचा पत्ता कट? मोदींचं नाव घेत केला मोठा खुलासा
आदिवासीबहुल सुरगुजा भागातील सर्व 14 विधानसभेच्या जागा आणि बस्तर या आदिवासी पट्ट्यातील 12 पैकी 8 जागा भाजपने जिंकल्या. 2 आदिवासी भागातील भाजपच्या विजयाने 5 वर्षांच्या वनवासानंतर राज्यात भाजपच्या पुनरागमनाची पटकथा लिहिली गेली आहे.
सरपंच ते मुख्यमंत्री
विष्णू देव साय यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात एका गावचे सरपंच म्हणून केली होती. यानंतर त्यांनी महत्त्वपूर्ण संघटनात्मक भूमिका बजावल्या. केंद्रीय मंत्री आणि लोकसभेचे खासदारही राहिले आहेत. त्यांच्या कुटुंबाचा समृद्ध राजकीय वारसा असूनही आणि केंद्रीय मंत्री म्हणून महत्त्वाची पोर्टफोलिओ धारण करूनही, 59 वर्षीय आदिवासी नेते विष्णू देव साय हे त्यांच्या नम्रता, विनम्र स्वभाव, कामासाठी समर्पण आणि ध्येय साध्य करण्याच्या दृढनिश्चयासाठी ओळखले जातात.
ADVERTISEMENT