अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरेंसमोर मोठा पेच निर्माण झालाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करण्यात आलेला नाही. याप्रकरणात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तर दुसरीकडे ऋतुजा लटके यांना आपल्या गटात नेण्यासाठी शिंदे गटाकडून मंत्रिपदाची ऑफर देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ गटाचे नेते अनिल परब यांनी केलाय.
ADVERTISEMENT
ऋतुजा लटके यांचा राजीनामा महापालिका प्रशासनाकडून मंजूर करण्यात आला नसल्यानंत ठाकरे गटाने पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटावर गंभीर आरोप केले. अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, “रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व पोटनिवडणूक लागलीये. शिवसेनेच्या वतीने उद्धव ठाकरे यांनी ऋतुजा रमेश लटके यांची उमेदवारी जाहीर केलीये. सर्वात लहान शाखाप्रमुख म्हणून त्यांनी शिवसेनेत काम सुरू केलं होतं. त्या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून हा निर्णय घेतला गेला होता. ऋतुजा रमेश लटके या लिपीक म्हणून काम करतात. निवडणूक लढवण्याबद्दल त्यांना आम्ही सांगितलं. त्यानंतर २ सप्टेंबर २०२२ रोजी त्यांनी राजीनामा दिला. पदाचा राजीनामा देताना त्यांनी असं म्हटलं होतं की, निवडणूक झाल्यावर मंजूर करावा.”
ठाकरे गटाचे मुंबई महापालिका आयुक्तांवर आरोप, अनिल परबांनी सांगितला घटनाक्रम
“महापालिकेकडून त्याला कोणतंही उत्तर दिलं गेलं नाही. १ महिना संपल्यानंतर त्या ज्यादिवशी राजीनामा आणण्यासाठी गेल्या. त्यादिवशी त्यांना सांगण्यात आलं की, तुम्ही चुकीच्या पद्धतीने राजीनामा दिला आणि मंजूर करता येणार नाही. मग त्यांनी ३ ऑक्टोबरला नव्याने राजीनामा दिला”, असं अनिल परब यांनी ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याबद्दल सांगितलं.
“मुंबई महापालिकेच्या ज्या सेवाशर्ती आहेत, त्यात म्हटलेलं आहे की राजीनामा द्यायचा असेल, तर एक महिना आधी सूचना द्यावी लागते. खरं म्हणजे त्यांनी ती दिलेली होती, पण त्यांनी ती स्वीकारली नाही. त्यानंतर त्यांनी ३ ऑक्टोबरला राजीनामा दिला आणि नियमानुसार १ महिना होत नाहीये. परंतु सेवाशर्तींमध्ये स्पष्ट केलंय की १ महिन्यापूर्वी राजीनामा दिला नसेल, तर १ महिन्याचा पगार कोषागारात जमा करावा लागेल. ऋतुजा रमेश लटके यांच्यावर कोणतीही शिस्तभंगाची कार्यवाही नाही. सगळ्या नियमांचं पालन करून राजीनामा मंजूर करावा, अशी विनंती त्यांनी केली. त्यांनी कागदपत्रे महापालिकेला सादर केले”, असंही अनिल परब यांनी सांगितलं.
शिंदे गटाकडून महापालिका आयुक्तांवर दबाव, ठाकरे गटाचा थेट आरोप
“ही फाईल तयार आहे. परंतु महापालिका आयुक्तांवर दबाव आहे की हा राजीनामा मंजूर करू नये. मी स्वतः तीन वेळा महापालिका आयुक्तांना भेटलो. दररोज ते टोलवाटोलवी करताहेत. वरून दबाव असल्याचं चित्र मला स्पष्ट दिसतंय. या दबावापोटी राजीनामा मंजूर होत नाहीये. खरंतर हा राजीनामा आयुक्तांकडे जाण्याचा प्रश्नच नाही कारण त्या क प्रवर्गात आहे. त्यांचा राजीनामा सह आयुक्त पातळीवरच मंजूर होतो”, असं सांगत अनिल परब यांनी महापालिका आयुक्तांवर शिंदे गटाकडून दबाव टाकला जात असल्याचा आरोप केला.
“मी सह आयुक्त मिलिंद सावंतांना परंतू ही फाईल इकडून तिकडे तिकडून इकडे पाठवली जात आहे. फाईल फिरवण्याचा खेळ महापालिकेत सुरूये. जाणूनबुजून राजीनामा मंजूर करायचा नाही, हे त्यांचं ठरलंय. माझी मागणी आहे की, ऋतुजा लटके यांना घाबरण्याचं काही कारण नाही. परंतू ऋतुजा लटके यांच्यावर शिंदे गट दबाव टाकतोय”, असा खळबळजनक आरोप अनिल परब यांनी केलाय.
ऋतुजा लटकेंना मंत्रिपदाची ऑफर देण्याचा प्रयत्न -अनिल परब
“आमच्याकडून तुम्ही निवडणूक लढवणार असाल, तरच तुमचा राजीनामा मंजूर होईल. काही जणांनी तर मला असं सांगितलंय की त्यांना मंत्रिपदाची ऑफर देण्याचा प्रयत्न चालू आहे. आम्हाला खात्री आहे की रमेश लटकेंचं कुटुब शिवसेनेशी एकनिष्ठ आहे”, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.
“मी आयुक्तांना विचारलं की आम्हाला लेखी लिहून द्या. राजीनामा मंजूर का करत नाही आहात? कारण दिलं तर पुढचा विचार करता येईल. ते काही कारण सांगत नाहीयेत. उमेदवारी अर्ज भरायला दोन दिवस बाकी आहेत. जाणूनबुजून रमेश लटके यांच्या पत्नीला निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर काढण्यासाठी किंवा त्यांना त्या गटात खेचण्यासाठी शिंदे गटाकडून प्रयत्न केला जातोय. याचा आम्ही निषेध करतो. आज आम्ही न्यायालयात गेलेलो आहोत. आम्ही कोर्टाकडे न्याय मागू “, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT