मुंबई: महाराष्ट्रातील बहुप्रतिक्षित पालकमंत्र्यांची यादी ही काल (18 जानेवारी) जाहीर झाली. या यादीची खऱ्या अर्थाने चर्चा ही बीडच्या पालकमंत्री पदावरूनच झाली. पण याशिवाय अशाही काही गोष्टी मागील 24 तासात घडल्या की, फडणवीस सरकारवर दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला थेट स्थगिती द्यावी लागली आहे. ज्याचा शासन निर्णय देखील सरकारने आता जारी केला आहे. ज्या दोन जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे तिथे दोन दिग्गज नेते आहेत. त्यामुळे हा त्यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
ADVERTISEMENT
गिरीश महाजन आणि आदिती तटकरेंना मोठा धक्का
सुरुवातीला जी यादी जाहीर करण्यात आली होती त्यानुसार,नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून आदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. पण या नियुक्तींवरून दोन्ही जिल्ह्यात आणि महायुतीमध्ये बराच वाद निर्माण झाल्याची जोरदार चर्चा सुरू. यामुळेच फडणवीस सरकारने आता या दोन्ही जिल्ह्यातील पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती दिली आहे.
हे ही वाचा>> सर्वात मोठी बातमी! फडणवीस सरकारच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर, सर्व नावं वाचा एका क्लिकवर
पालकमंत्री पदाच्या स्थगितीचा शासन निर्णय जसाच्या तसा...
नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला का दिली स्थगिती?
नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी जेव्हा गिरीश महाजन यांच्या नावाची घोषणा झाली तेव्हा सर्वांच्याच भुवया उंचावल्या. कारण इथे शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती होऊ शकते असा कयास अनेकजण वर्तवत होते. मात्र, गिरीश महाजन यांच्या नावाची घोषणा झाल्याने जिल्ह्यातील शिवसैनिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली.
हे ही वाचा>> CM फडणवीसांकडून धनंजय मुंडेंना मोठा हादरा, पालकमंत्र्यांची यादी जाहीर पण...
एवढंच नव्हे तर यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये धुसफूस निर्माण झाल्याची जोरदार चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली. आतापर्यंत शिवसेनेने नाशिक जिल्ह्यात आपलं बरंच वर्चस्व निर्माण केलं आहे. अशावेळी आपल्याकडेच या जिल्ह्याचं पालकमंत्री पद असावं असा शिवसेनेचा आग्रह होता. मात्र, तिथे भाजपने स्वत:चा पालकमंत्री दिल्याने महायुतीत वाद निर्माण झाल्यानेच आता येथील पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे.
रायगडच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला का दिली स्थगिती?
रायगडचं पालकमंत्रीपद हे मागील सरकारपासूनच चर्चेत आहे. येथील शिवसेनेचे आमदार भरत गोगावले हे सुरुवातीपासून रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही होते. दरम्यान, नव्या सरकारमध्ये मंत्रीपदाची लॉटरी लागल्यानंतर भरत गोगावले यांना रायगडचं पालकमंत्री पद मिळेल अशी आशा होती. पण त्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांना येथील पालकमंत्री बनविण्यात आलं होतं.
मात्र, या नियुक्तीनंतर भरत गोगावले आणि त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळाली. भरत गोगावले यांनी ही नाराजी उघडपणे बोलूनही दाखवली. दरम्यान, या सगळ्याचा परिणाम महायुतीवर होण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याने रायगडच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
