Pune BJP MLA Sunil Kamble: पुणे: पुण्यात ससून रुग्णालयात आयोजित एका कार्यक्रमात भाजप आमदाराने (BJP MLA) थेट पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजप आमदार सुनील कांबळे (Sunil Kamble यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमातच पोलिसांच्या श्रीमुखात भडकवल्याची घटना आता समोर आली आहे. (bjp mla sunil kamble slapped to policeman at ajit pawar event in pune what really happened)
ADVERTISEMENT
दरम्यान, याच कार्यक्रमाआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैद्यकीय पक्षाच्या मदत केंद्राचे पदाधिकारी जितेंद्र सातव यांना देखील आमदार सुनील कांबळे यांनी मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे एक मारहाणीची घटना ही उपमुख्यमंत्री अजित पवार व्यासपीठावर असतानाच घडली आहे.
‘कानशिलात अशी नाही मारत, कानशिलात कशी मारतात माहितीए ना..’
या सगळ्या घटनेनंतर माध्यमांशी बोलताना आमदार सुनील कांबळे यांनी आपण कानशिलात मारलीच नसल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले की, ‘सरकारी कार्यक्रमात अशी पद्धत नाही ना.. तिथे कोणाचा कोणाला ताळमेळ नव्हता. नुसती धक्काबुक्की.. काही प्रोटोकॉल आहेत की नाही.. आमदारांना धक्काबुक्की.. हे काही जाणूनबुजून झालेलं नाही..’
‘एकाने माझा शर्टच ओढला.. कोण होता ते मला माहिती नाही. त्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मी नाही मारलं.. पोलिसांनी मारलं त्याला.. मी त्याला सोडवलं उलट त्याला..’
‘कोनशिलेवर नाव नाही हे मी कलेक्टरशी सुरुवातीलाच बोललो मी. ते म्हणाले की, आमच्याकडून तपासून पाठवलं होतं. हे प्रशासनाने जाणूनबुजून काय केलं ते माहीत नाही. आता डीनचे फोन येत आहे मला त्यासाठी..’
‘कानशिलात कशी मारतात माहितीए ना.. त्याला मी.. असं हे केलं उलट्या हाताने.. कानशिलात मारायची म्हणजे.. मी झोपडपट्टीतला कार्यकर्ता आहे. माझं आयुष्य झोपडपट्टीत गेलं. कानशिलात मारायचा प्रकार हा वेगळा असतो. त्याला कानशिलात नाही मारली. त्याला मी असं ढकललं.. मला असं ओढलं म्हणून.’
‘मला माहितीच नाही तो कोण आहे ते.. ठरवून कानशिलात मारायची म्हणजे काही तरी राग आलेला असतो.. किंवा अशा वेळेस कानशिलात मारतात.. मी फक्त त्याला ढकललं..’ असं म्हणत भाजप आमदार सुनील कांबळे यांनी स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान, या सगळा कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर याबाबत विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरलं आहे.
हे ही वाचा>> दारू आणि मांस… भाजप आमदार राम कदमांची मोठी मागणी, एकनाथ शिंदे काय करणार?
थेट खाकी वर्दीला हात घालण्याची हिंमत सत्ताधारी आमदारमध्ये आली कशी? – वडेट्टीवार
‘काल अब्दुल सत्तार, आज भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी दाखवला सत्तेचा माज… भाजप आमदाराची मस्ती इतकी की ड्युटीवर असलेल्या पोलीस जवानाच्या थोबाडीत हाणली, थेट खाकी वर्दीला हात घालण्याची हिंमत सत्ताधारी आमदारमध्ये आली कशी?’
‘गृहमंत्री याची दखल घेणार का? पोलिस अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी भाजप आमदार सुनील कांबळे यांच्यावर कारवाई करावी, नाहीतर पोलिसांवर तक्रार न करण्याचा दबाव ही टाकला जाऊ शकतो…’ असं ट्विट करत वड्डेटीवार यांनी या घडलेल्या प्रकाराचा व्हीडिओच ट्विटरवर शेअर केला आहे.
भाजप आमदार एवढे का संतापले?
पुण्यातील ससून रुग्णालयात काल (4 जानेवारी) तृतीयपंथीयांच्या वार्डचं पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार होतं. या कार्यक्रमाची पत्रिका आणि कोनशिलेवर भाजपचे पुणे कॅन्टोन्मेंटचे आमदार सुनील कांबळे यांचं नाव नव्हतं. त्यामुळे सुनील कांबळे संतप्त झाले आणि त्यांनी सुरुवातीला कार्यक्रमाचे आयोजन केलेल्या जितेंद्र सातव यांना मारहाण केल्याचा आरोप आता केला जात आहे.
हे ही वाचा>> अजितदादांचे पदाधिकारी ऐटीत फिरणार, 40 बोलेरो आणि 40 स्कॉर्पिओ दिल्या गिफ्ट
तर याच कार्यक्रमातून व्यासपीठावरून खाली उतरताना सुनील कांबळे यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या देखील कानशिलात लगावली. जो प्रकार हा कॅमेऱ्यात कैद झाला.. ज्यावरून आता त्यांच्यासह सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली जात आहे.
ADVERTISEMENT