Maharashtra Politics : खैरे-दानवेंनी वाढवला ठाकरेंचा ताण, मातोश्रीवरील बैठकीत काय झालं?

ऋत्विक भालेकर

• 10:00 AM • 27 Dec 2023

Chhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha election 2024 : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे हे दोन नेते लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यांच्यात यावरून जुंपली असून, ठाकरेंना मातोश्रीवर बैठक घ्यावी लागली.

Ambadas Danve and chandrakant khaire willing to contest lok sabha election 2024 from Chhatrapati Sambhaji Nagar.

Ambadas Danve and chandrakant khaire willing to contest lok sabha election 2024 from Chhatrapati Sambhaji Nagar.

follow google news

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Constituency : शिवसेनाचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचा औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ) लोकसभा मतदारसंघात दोन नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ताण वाढवला आहे. शिवसेनेचे वर्चस्व राहिलेल्या या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास ठाकरेंचे दोन नेते इच्छुक असून, दोन्ही नेत्यांमध्येच जुंपलीये.त्यामुळे ठाकरेंना तातडीने मातोश्रीवर बैठक बोलवावी लागली. दरम्यान, ठाकरेंना दोन्ही पैकी एकाच नेत्याला संधी देता येणार आहे. ज्या नेत्याला तिकीट मिळणार त्याला शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑफर दिली जाऊ शकते, अशी माहिती समोर आलीये… पडद्यामागे काय घडलं हेच समजून घ्या…

हे वाचलं का?

ठाकरे गटातीलच दोन नेत्यांमध्ये लोकसभा निवडणूक लढवण्यावरून जुंपलीये. माजी खासदार चंद्रकांत खैरे पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. दुसरीकडे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हेही मैदानात उतरले आहेत.

दानवे-खैरेंची भूमिका काय?

लोकसभा निवडणुकीसंदर्भात बोलताना अंबादास दानवे म्हणालेले की, “मी शिवसैनिक आहे. पक्षप्रमुख जिथे सांगतील तिथे लढण्याची माझी तयारी आहे. कुठेही लढायला सांगितलं… फक्त निवडणूक नाही, तर कोणतीही लढाई लढायला सांगितली तरी ती लढण्याची माझी शंभर टक्के तयारी आहे. मागच्या १० वर्षांपासून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे.”

हेही वाचा >> ‘वंचित’ने सांगितलं किती हव्यात जागा? मांडला ‘मविआ’चा फॉर्म्युला

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलेल्या चंद्रकांत खैरेंनी मात्र वेगळी भूमिका मांडली. “अंबादास दानवेंना निवडणूक लढवण्याची इच्छा होती म्हणून मागच्या निवडणुकीत माझा पराभव झाला. छत्रपती संभाजीनगरची निवडणूक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सांगतील ते लढवतील. होईल ना चांगलं. कशाला काळजी करायची. जनतेची जी इच्छा आहे, ती उद्धव ठाकरे मान्य करतील”, असं म्हणत खैरेंनी त्यांची इच्छा बोलून दाखवली.

उद्धव ठाकरेंसमोर मोठा पेच

पक्षातील दोन महत्त्वाचे नेते एकाच लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याने उद्धव ठाकरेंसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. चंद्रकांत खैरे शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. त्याचबरोबर त्यांनी या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्वही केलेलं आहे. दुसरीकडे अंबादास दानवे हे मागील अनेक वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांचंही या मतदारसंघात मोठा समर्थक गट आहे.

हेही वाचा >> अजित पवारांचं चॅलेंज, कोल्हेंना शरद पवारांचा ‘मेसेज’, काय झाली चर्चा?

अंबादास दानवे यांनी लोकसभा लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. सध्या ते विधान परिषदेत विरोधी पक्षनेते आहेत. शिवसेनेत झालेल्या बंडानंतर दानवेंवर ही मोठी जबाबदारी दिली गेली. पण, आता पेच असा निर्माण झाला आहे की, खैरे किंवा दानवे यांच्यापैकी एकालाच उमेदवारी देणे शक्य आहे. एकाची निवड करण्याबरोबरच दुसऱ्याला विरोधात जाण्यापासून रोखण्याचं आवाहनही ठाकरेंसमोर आहे.

मातोश्रीवरील बैठकीत काय झाली चर्चा?

खैरे आणि दानवे यांच्या विधानानंतर उद्धव ठाकरेंनी छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत बहुतांश पदाधिकाऱ्यांचा कल चंद्रकांत खैरेंच्या बाजूने होता, मात्र इम्तियाज जलील यांनी पराभूत केल्याने दानवेंना उमेदवारी मिळावी, असा सूरही बैठकीत उमटला. याच बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनी दोघांपैकी एका नेत्याला जालना लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा प्रस्ताव ठेवला.

शिंदेंच्या शिवसेनेचे लक्ष

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात भाजपही तयारी करत आहे. गेल्या काही महिन्यांपासून केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड सक्रिय झाले आहेत. मात्र, भाजप येथून निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचे समजते. हा मतदारसंघ युतीत कायम शिवसेनेकडे राहिला आहे. त्यामुळे शिंदेंना ही जागा सोडली जाणार असल्याचे कळते. या मतदारसंघातून कुणाला उमेदवारी द्यायची याबाबत शिंदेंच्या शिवसेनेकडून चाचपणी सुरू आहे.

या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे खैरे ठाकरेंच्या शिवसेनेत आहे. दानवेही ठाकरेंच्या बाजूने आहे. मात्र, ठाकरेंकडून ज्या नेत्याला तिकीट मिळणार नाही, त्याला शिंदे येथून लोकसभेच्या मैदानात उतरवण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सध्या खैरे आणि दानवे यांच्यावर शिंदेंची सेना लक्ष ठेवून आहे.

    follow whatsapp